आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते आयसीएमआर - एनआयएमआर येथे नवीन अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन
जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान - संशोधन आणि नवोन्मेष एक मजबूत आरोग्य संशोधन परिसंस्था निर्माण करेल आणि आपल्या जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी दुहेरी इंजिन ठरेल: डॉ मनसुख मांडविया
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2023 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
“जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान - संशोधन आणि नवोन्मेष हे एक मजबूत आरोग्य संशोधन परिसंस्था निर्माण करेल आणि आपल्या जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी दुहेरी इंजिन ठरेल, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केले. ते आज नवी दिल्ली येथे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्था (ICMR-NIMR) येथे पाच नवीन सुविधांचे उद्घाटन करताना बोलत होते. भारताला स्वावलंबी बनवण्याच्या प्रयत्नात ‘जय संशोधन’ हे अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे, असेही ते म्हणाले. आज उद्घाटन झालेल्या पाच नव्या सुविधांमध्ये चाचणी संशोधन प्रयोगशाळा, एक नवोन्मेष कॉम्प्लेक्स, कॉन्फरन्स हॉल कॉम्प्लेक्स आणि 300 आसनांचे सभागृह यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि डॉ. भारती प्रवीण पवार हे देखील उपस्थित होते.

"भारताच्या आरोग्य क्षेत्राचा संपूर्ण विकास करण्यासाठी आणि या क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार काम करत आहे." असे केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले.
आरोग्य हे एक अतिशय गतिमान क्षेत्र आहे जिथे रोज नवनवीन संशोधन, विकास आणि नवनवीन संशोधन होत असते, असे आरोग्य क्षेत्राबाबत बोलताना डॉ. मांडविया म्हणाले. “आज देशाच्या सेवेत रुजू होण्यासाठी ज्या सुविधांचे उद्घाटन करत आहोत, त्यावरून भारत जगाच्या गतीशी ताळमेळ राखण्यास तयार आहे हे सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे सारख्या संस्था आज अधिकाधिक मजबूत होत आहेत आणि त्यांच्या कार्याच्या बळावर भारत जगभरात एक वेगळे स्थान मिळवत आहेत.” हे डॉ. मांडविया यांनी अधोरेखित केले.

हिवतापाशी सामना करण्यासाठी संशोधनात पुढाकार घेतल्याबद्दल डॉ. मांडविया यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - राष्ट्रीय हिवताप संशोधन संस्थेची प्रशंसा केली. "संस्थेच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण हे 2030 पर्यंत देशातील हिवताप निर्मूलनाच्या दिशेने एक पाऊल आहे" असे ते म्हणाले. केवळ हिवताप नाही तर डेंग्यू, जपानी मेंदूज्वर, चिकुनगुनिया, हत्तीपाय यांसारख्या रक्त शोषक किटक -जनित रोगांचे निर्मूलन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य सेवेमध्ये डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणावर भर दिला. लस आणि औषध वितरणासाठी ड्रोनचा नाविन्यपूर्ण वापर आणि ड्रोनद्वारे अवयव हस्तांतरणाचा शोध घेण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. अशा कामात ड्रोनचा वापर आरोग्यसेवा सुलभता आणि कार्यक्षमतेत मोठी झेप दर्शवतो, असे त्यांनी सांगितले.

* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1986379)
आगंतुक पटल : 145