आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि डॉ. भारती पवार यांनी, ‘बुडून होणाऱ्या मृत्यूला प्रतिबंध घालण्यासंदर्भात धोरणात्मक आराखड्याचे' केले प्रकाशन

Posted On: 13 DEC 2023 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2023

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  प्रा. एस.पी. सिंह  बघेल आणि डॉ. भारती पवार यांनी, ‘बुडून होणाऱ्या मृत्यूला प्रतिबंध घालण्यासंदर्भात धोरणात्मक आराखड्याचे'  आज प्रकाशन केले. 

याप्रसंगी  प्रा.एस.पी.सिंह बघेल यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. "बुडणे टाळता येण्यासारखे आहे आणि बुडण्याच्या घटना कमी करण्यासाठी सर्वांकरिता पाण्यातील  सुरक्षिततेसंदर्भात  प्रतिबंधात्मक उपाययोजनांना चालना देण्यासाठीच्या प्रयत्नानांवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे बघेल यांनी सांगितले." जनजागृती मोहिमेची गरज त्यांनी  अधोरेखित केली. "बुडण्याच्या  38,000 घटना देशात नोंदवल्या गेल्या आहेत. ही संख्या मोठी आहे. अशा घटना टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे." असे त्यांनी सांगितले.

“बुडून होणारे मृत्यू रोखण्यासाठी योग्य सल्लात्मक सूचना महत्त्वपूर्ण आहेत. मी राज्यांना विशेषत: सणांच्या दिवसात अत्यंत  सावधगिरी आणि सतर्कता ठेवण्याचे आवाहन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.” असे ते म्हणाले. प्रा. एस. पी. सिंह बघेल  यांनी विशेषत: उत्सवाच्या वेळी आणि काही प्रथापरंपरांच्या  वेळी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. अशा वेळी  बुडण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. 

राष्ट्रीय धोरणात्मक आराखडा  दस्तऐवजात समाविष्ट केलेल्या धोरणांबाबत डॉ. भारती  पवार यांनी अधिक तपशीलवार माहिती दिली.  “ बहु-क्षेत्रीय सहकार्याला चालना देणे, सुयोग्य संप्रेषणाद्वारे  बुडण्याविषयी जनजागृती करणे, बुडण्याच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कृती योजना राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर  तयार करणे आणि पुरावाआधारित माहितीसाठी आणि प्रासंगिक कृतीसाठी  संशोधन करणे, या बाबी असंख्य जीव वाचवण्यासाठी आणि  बुडण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी पाण्याच्या ठिकाणी सुरक्षितता निर्माण करण्याकरिता महत्त्वपूर्ण  कृती स्तंभ ठरतील, असे त्या म्हणाल्या. 

पाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत माहिती  आणि जागरूकता नसल्यामुळे  बुडण्याच्या अनेक घटना घडतात हे  डॉ. पवार यांनी अधोरेखित केले. “बुडण्यापासून घटना रोखण्यासाठी जागरूकता, शिक्षण, डेटा-आधारित हस्तक्षेप, पायाभूत सुविधांचा विकास, सहयोग, आणि मजबूत आपत्कालीन प्रतिसाद यांचा समावेश असलेल्या  व्यापक आणि धोरणात्मक दृष्टीकोनाची आवश्यकता आहे, ”यावर पवार यांनी भर दिला. 

सुरक्षित मनोरंजनाच्या जागांचा विकास करणे आणि जलसाठ्याभोवती सुरक्षा पायाभूत सुविधा वाढवणे यासोबतच उच्च जोखमीची क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि योग्य हस्तक्षेपांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर एक मजबूत सूचना प्रणाली स्थापन करणे, यामुळे बुडण्याच्या घटना रोखण्यात मोठी मदत मिळेल, असे डॉ. भारती पवार यांनी सांगितले. 

 

* * *

S.Tupe/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1985818) Visitor Counter : 63