वस्त्रोद्योग मंत्रालय

वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने 10 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ आयोजित


भारतातील हातमाग साडी संस्कृतीला चालना देणे हा या वॉकेथॉनचा उद्देश

चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणी तसेच क्रीडा आणि इतर क्षेत्रातील 5000 हून अधिक महिला या वॉकेथॉनमध्ये सहभागी होणार

Posted On: 08 DEC 2023 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2023

 


वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने 10 डिसेंबर 2023 रोजी रविवारी, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे देशातील सर्वात मोठी ‘वन भारत सारी वॉकेथॉन’ आयोजित केली जात आहे .या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा असून त्यासाठी देशभरातील महिलांच्या साड्या परिधान करण्याच्या विशिष्ट पद्धतींचा परिचय होण्याबरोबरच  भारताची “विविधतेतील एकता असलेला देश’ ही प्रतिमा अधोरेखित करणे हा आहे. हे पारंपारिक वस्त्रप्रावरणाविषयी अभिमानाची भावना वृध्दिंगत करण्यास प्रोत्साहन देईल, "वोकल फॉर लोकल"च्या संकल्पनेला समर्थन देईल आणि महिलांमध्ये आरोग्यस्वास्थ्याबद्दल जागरुकता वाढवून आणि त्यांना निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहित करेल.

सांस्कृतिक विविधता आणि सक्षमीकरणाच्या या उपक्रमात, आघाडीच्या व्यावसायिक, चित्रपट सृष्टी आणि दूरचित्रवाणीवरील तारका, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय महिला, उद्योग विश्वातील स्त्रिया,संगीत क्षेत्रातील महिला,डिझाइनर,सामाजिक प्रभावशाली स्त्रिया, गृहिणी, आणि इतर क्षेत्रा सह 5000 हून अधिक महिला त्यांच्या पारंपारिक पोशाखात उत्साहात सहभागी होतील. यापूर्वी सुरतमध्ये अशा  साडी  वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश आणि खासदार पूनम महाजन एमएमआरडीसी ग्राउंड, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई येथे संयुक्तपणे ‘वन  भारत सारी  वॉकेथॉन’ च्या मुंबईतील उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवून आरंभ करतील.

वॉकेथॉनबद्दल बोलताना जरदोश म्हणाल्या की, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व आहे, जिथे स्त्रीत्वाची भावना स्त्रीच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूमध्ये खोलवर रुजलेली आहे. विविध क्षेत्रातल्या  महिलांचा सहभाग, त्यांच्या विशिष्ट प्रादेशिक शैलीचे प्रतिनिधित्व करत, विविधतेचे सुंदर चित्रदर्शी स्वरूप उमटवेल आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' च्या भावनेला समर्थन देईल. हे केवळ मुंबईच्या चैतन्यपूर्ण अभिव्यक्तीला प्रतिध्वनित करेल असे नाही तर वॉकथॉनला  सांस्कृतिक महत्त्वाचा पैलू देखील जोडेल. आर्थिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक घटकांना एकत्रित करून, 'वन  भारत सारी  वॉकेथॉन' एक प्रभावी चित्र निर्माण करण्यासाठी सज्ज आहे, ज्याने भारताचे वैशिष्ट्य असलेल्या विविधतेतील एकता देखील साजरी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर हातमाग कारागिरीच्या चिरस्थायी वारशाला प्रोत्साहन  मिळणार आहे.

या संदर्भात पूनम महाजन म्हणाल्या, “माझा विश्वास आहे की साडी हे केवळ वस्त्र नसून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे आणि मुक्तीचे प्रतीक आहे. भारतीय वस्त्रोद्योगाला पाठिंबा देणाऱ्या आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणार्‍या महिलांना एका व्यासपीठावर आणणे हे या  वॉकेथॉनचे उद्दिष्ट आहे.

हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, शिवाय मोठ्या संख्येने कारागिरांना, विशेष करून महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. भारतातील हातमाग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक लोक गुंतलेले आहेत. हातमागावर साडी विणण्याच्या कलेशी पारंपारिक मूल्ये जोडलेली आहेत आणि प्रत्येक प्रदेशात वैशिष्ट्यपूर्ण साड्यांचे प्रकार प्रचलित आहेत.

पैठणी, कोटपड, कोटा दोरिया, टंगेल, पोचमपल्ली, कांचीपुरम, थिरुभुवनम, जामदनी, संतीपुरी, चंदेरी, माहेश्वरी, पटोला, मोइरांगफी, बनारसी ब्रोकेड, तनछोई, भागलपुरी सिल्क, बावन बुटी, पश्मिना साडी असे काही साड्यांचे प्रकार आहेत जे आपल्या कला, विणकाम, डिझाईन्स आणि पारंपारिक आकृतिबंधांसह जगभराला आकर्षित करतात.

 

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1984066) Visitor Counter : 97


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil