राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार 2023 चे वितरण
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2023 1:51PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2023) आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे 2023 चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "राष्ट्रीय पुरस्कार हे दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक प्रशंसनीय माध्यम आहे. कारण वैयक्तिक आणि संस्थात्मक कार्याला मान्यता मिळाल्याने प्रत्येकालाच प्रोत्साहन मिळते. विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या दिव्यांग व्यक्तींनी इतर दिव्यांग व्यक्तींना आपआपल्या क्षमतेनुसार मदत करावी"
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "जगातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 15 टक्के लोक दिव्यांग आहेत आणि त्यांच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. योग्य सुविधा, संधी आणि सक्षमीकरणाच्या प्रयत्नांच्या मदतीने सर्व दिव्यांग व्यक्ती समानतेने आणि सन्मानाने जीवन जगू शकतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "नवीन संसद भवनाचा प्रत्येक भाग हा दिव्यांगांसाठी सोयीचा आहे आणि ही अभिमानाची बाब आहे. यातून इतर सर्वांनी बोध घ्यावा आणि दिव्यांगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरवातीपासूनच प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. फक्त नूतनीकरणाऐवजी नावीन्यपूर्ण दृष्टिकोन ठेवून काम केले पाहिजे."
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "गरिबी निर्मूलन, आरोग्य आणि कल्याण, चांगले शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता आणि पिण्याचे पाणी इत्यादींशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य केल्याने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल. भारताने याविषयक उद्दिष्टांना उच्च प्राधान्य दिले आहे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने भारत सातत्याने वाटचाल करत आहे."
आशियाई पॅरा स्पर्धांमधील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, "आपल्या खेळाडूंनी त्यांच्या अदम्य विजयाच्या बळावर एक नवा इतिहास घडवला आहे, तसेच सर्व खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याने उल्लेखनीय प्रगती होत आहे. याबाबत डॉ. दीपा मलिक आणि अवनी लेखरा या खेळाडूंच्या प्रेरणादायी भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले."
राष्ट्रपतींच्या भाषणासाठी कृपया इथे क्लिक करा -
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1982134)
आगंतुक पटल : 240