इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

नव भारताने संधींचे लोकशाहीकरण आणि त्याबरोबरच यश आणि समृद्धीसाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे: राजीव चंद्रशेखर

Posted On: 02 DEC 2023 6:45PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी कोझिकोड येथे नालंदा सभागृहात सनदी लेखापाल  विद्यार्थ्यांना सत्संग 2023 या महापरिषदेत मार्गदर्शन केले.

भारतीय युवक आणि स्टार्टअपसाठी संधी निर्माण करण्यासाठी नव भारत  तंत्रज्ञानाची सांगड  घालत असल्याच्या  मुद्द्यावर त्यांनी भर दिला.

गेल्या दशकात संधींच्या झालेल्या लोकशाहीकरणाचे महत्त्व त्यांनी विशद केले.  मंत्री म्हणाले, “आज कालिकत, विझाग, बेंगळुरू, कोहिमा, सुरत किंवा काश्मीर सारख्या शहरांतील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. केवळ गेल्या पाच वर्षांत, आपण  1.2 लाख स्टार्टअप आणि 108 युनिकॉर्नचा उदय पाहिला आहे. यशस्वी होण्यासाठी गॉडफादर किंवा प्रसिद्ध आडनावाची आवश्यकता नाही. नवभारताने संधीचे लोकशाहीकरण केले आहे, यशासाठी सक्षम वातावरण निर्माण केले आहे. सेमीकंडक्टर, वेब3, इलेक्ट्रॉनिक्स, एचपीसी किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणतेही क्षेत्र असो, भारतीय सर्वच गोष्टींमध्ये तंत्रज्ञानात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि युवक त्यात आघाडीवर आहेत.

सनदी लेखापाल  विद्यार्थ्यांनी डिजिटल कौशल्ये आत्मसात करावीत असे आवाहन चंद्रशेखर यांनी केले. विशेषत: कोविड नंतर डिजिटलायझेशन, डिजिटल तंत्रज्ञान आणि अभूतपूर्व इलेक्ट्रोनिफिकेशनच्या गतिशील जगात पंतप्रधानांनी पदवी आणि ज्ञानाबरोबरच कौशल्याच्या महत्त्वावर भर दिला आहे, असे ते म्हणाले. या  विद्यार्थ्यांनी डिजिटल कौशल्ये आत्मसात करावीत असे आवाहन त्यांनी केले. ही कौशल्ये सध्याच्या अकाऊंटन्सीच्या ज्ञानाशी जोडली तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असे ते पुढे म्हणाले.   आज सनदी लेखापालांकडे  स्वतः यश मिळवण्याच्या क्षमतेबरोबरच  एकूण भारतीय अर्थव्यवस्थेला प्रेरणा द्यायची क्षमता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1981983) Visitor Counter : 72


Read this release in: Hindi , English , Urdu , Tamil