माहिती आणि प्रसारण मंत्रालय

54 व्या इफ्फीमध्ये प्रथमच सुरु करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार 2023 ‘पंचायत सीझन 2’ ने पटकावला

Posted On: 28 NOV 2023 8:34PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2023

 

गोवा येथे आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पंचायत सीझन 2 या हृदयस्पर्शी हिंदी विनोदीनाट्य मालिकेने प्रतिष्ठित  पहिला सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी ) पुरस्कार 2023 पटकावला आहे.

दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित आणि चंदन कुमार लिखित पंचायत सीझन 2 मध्ये अभिषेक त्रिपाठी या उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील फुलेरा या दुर्गम काल्पनिक गावात एका मोडकळीस आलेल्या पंचायत कार्यालयात नाईलाजाने सचिव म्हणून काम स्वीकारलेल्या शहरी पदवीधराची गुंतागुंतीची कथा आहे.

पहिल्या सीझनच्या घवघवीत यशानंतर, दुसरा सीझन फुलेरातील अभिषेकच्या जीवनावर पूर्णपणे केंद्रित आहे. त्याच्या कॅट परीक्षेची तयारी करताना, कॉर्पोरेट भविष्यासाठी प्रयत्नशील असताना तो   गावातील राजकारणातल्या नवीन आव्हानांमधून मार्ग काढत असतो. भावणारे  क्षण आणि  विनोदाची पखरण असलेला हा सीझन, ग्रामीण  जीवनातील दैनंदिन समस्यांचे चित्रण करतो,  गावातील समस्या मांडताना  प्रधान, विकास, प्रल्हाद आणि मंजू देवी यांच्याशी अभिषेकचे  संबंध उलगडून दाखवतो. ही प्रचंड लोकप्रिय मालिका ओटीटी पोर्टल Amazon Prime Video वर प्रसारित केली जात आहे.

54 व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की ओटीटी उद्योगाने भारतात तेजी पाहिली आहे आणि भारतात तयार केलेला हा मूळ आशय हजारो लोकांना रोजगार देत आहे. या क्षेत्रातील वार्षिक 28% वाढ अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले होते की,या  प्लॅटफॉर्मवरील असाधारण डिजिटल सामग्री निर्मात्यांना सन्मानित करण्यासाठी ओटीटी  पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.

अभय पन्नू यांचा रॉकेट बॉईज सीझन 1, राहुल पांडे आणि सतीश नायर यांचे निर्मल पाठक की घर वापसी आणि विपुल अमृतलाल शाह आणि मोजेझ सिंग दिग्दर्शित ह्यूमन यांचा समावेश असलेल्या या श्रेणीतील अंतिम नामांकनांतून  पंचायत सीझन 2 ही वेब सिरीज उत्कृष्ट ठरली.

निवड समितीने  एकमताने Sony Liv वर दाखवल्या जाणाऱ्या  रॉकेट बॉईज सीझन 1 या वेब सिरीजला विशेष उल्लेख म्हणून गौरवण्याची शिफारस केली आहे.

या पुरस्कारासाठी  15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 10 भाषांमधील 32 प्रवेशिका आल्या होत्या.

 

* * *

PIB Mumbai | JPS/S.Kane/D.Rane



(Release ID: 1980575) Visitor Counter : 125