माहिती आणि प्रसारण मंत्रालय

54 व्या इफ्फीमधील समारोपाचा चित्रपट 'द फेदरवेट' चा आशिया प्रीमियर


मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांशी जोडला जाणारा चित्रपट खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय असतो : दिग्दर्शक रॉबर्ट कोलोड्नी

Posted On: 28 NOV 2023 6:15PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2023

 

“54 व्या इफ्फीमध्ये आमचा चित्रपट प्रदर्शित करणे हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे, अनेक वर्षांच्या संशोधन आणि कठोर परिश्रमानंतर हा चित्रपट तयार केला आहे असे 'द फेदरवेट' चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबर्ट कोलोनी म्हणाले. महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट म्हणून आज गोव्यात 54 व्या इफ्फीमध्ये  या अमेरिकन चित्रपटाचा आशिया प्रीमियर झाला.

पत्र सूचना कार्यालयाद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना, चित्रपट निर्माते रॉबर्ट कोलोनी यांनी सांगितले की हा चित्रपट इटालियन-अमेरिकन बॉक्सर विली पेप याच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे ज्याचा बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक लढतींचा विक्रम आहे. त्याचा कारकिर्दीत 241 फाईट्सचा विक्रम आहे. “दिवंगत बॉक्सरच्या गावी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यापासून ते त्यांचे बॉक्सिंग ग्लोव्हज वापरण्यापर्यंत, हा चित्रपट सत्य आणि काल्पनिकता, वास्तव आणि सिनेमा यांच्यातील दोलायमानता आहे” असे  दिग्दर्शकाने स्पष्ट केले.

दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना  बॉक्सिंगचे कथानक निवडण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कोलोनी यांनी सांगितले की विली पेप यांचा  गतिमान जीवनाचा इतिहास, क्रीडा नाट्यातील उत्सुकता आणि मानवी नाट्याचे वास्तव यामुळे माहितीपूर्ण, मनोरंजक आणि वास्तव  कथा सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. "आंतरराष्ट्रीय मंचावर चित्रपटाद्वारे संवाद साधणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे", असे त्यांनी नमूद केले.

निर्माती  बेनेट इलियॉट हिने  तिचा अनुभव सामायिक करताना आठवण करून दिली, “दिवंगत बॉक्सरच्या गावी चित्रीकरण  करणे आणि स्थानिक लोकांचा पाठिंबा मिळणे आनंददायक होते. त्यांच्या आत्म्याची उपस्थिती नेहमीच आम्हाला जाणवत होती. , आम्ही स्वतंत्र चित्रपट म्हणून या प्रकल्पासाठी खूप मेहनत केली आहे आणि स्वप्ने रंगवली आहेत.

अभिनेता जेम्स मॅडिओ म्हणाले की विली पेप यांचे जीवन अनुभवणे आणि त्यांची भूमिका साकारणे हा एक अभिनेता म्हणून कल्पनेपलिकडचा  अनुभव होता.“ “बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणे आणि हा स्वतंत्र चित्रपट बनवणे हा एक चमत्कार आहे. बॉक्सर विली पेप यांच्या भूमिकेत शिरण्यासाठी आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी इतकी वर्षे समर्पित वृत्तीने केलेले संशोधन मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक होते मात्र त्याच वेळी मुक्त करणारे होते.”

"हा अनेक वर्षांच्या संशोधनाचा परिणाम आहे आणि आमच्या चित्रपटाने  54 व्या  इफ्फीचा समारोप होणे हा आमच्यासाठी सन्मान आहे," असे लेखक स्टीव्ह लॉफ यांनी सांगितले.

 

अधिक माहितीसाठी येथे पहा:

 

चित्रपटाचा सारांश:

1960 च्या दशकाच्या मध्यावधीची पार्श्वभूमी असलेला द फेदरवेट हा चित्रपट इटालियन-अमेरिकन बॉक्सर विली पेप यांच्या खर्‍या-आयुष्यातील मनोरंजक  अध्याय सादर करतो- ज्यांच्या नावावर सर्वाधिक लढतींचा विक्रम आहे ; वयाच्या चाळीशीत वैयक्तिक आयुष्यात खचलेले असताना ते रिंगमध्ये परतण्याचा निर्णय घेतात. त्याचवेळी  एक माहितीपटाचा चमू त्यांच्या आयुष्यात येतो. परिश्रमपूर्वक संशोधन आणि बांधणी केलेला हा चित्रपट विसाव्या शतकातील अमेरिकन पुरुषत्व, प्रसिद्धी आणि आत्म-धारणा यांच्या असंतोषाचे चित्रण आहे.

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane



(Release ID: 1980489) Visitor Counter : 91