माहिती आणि प्रसारण मंत्रालय

गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी नामांकन मिळणे हा कांतारा टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे: अभिनेते आणि चित्रपट निर्माते ऋषभ शेट्टी


भारतातील प्रेक्षक कांताराशी जोडला गेला कारण ही कथा भारताच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे: ऋषभ शेट्टी

दर्जेदार आशय भाषेच्या अडथळ्यांना पार करतो; भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडत आहे: ऋषभ शेट्टी

Posted On: 28 NOV 2023 5:20PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2023

 

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी आज गोव्यामध्ये आयोजित  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) आयोजित संवाद सत्रात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. गतिशील आणि दिमाखदार कन्नड चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्त्व करणारे ऋषभ शेट्टी, हे कांतारा या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. कांतारा हा चित्रपट इफ्फी 54 मधील प्रतिष्ठेच्या गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी यंदाच्या 15 लक्षवेधी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या तीन भारतीय चित्रपटांपैकी एक आहे.

कांतारा या 150 मिनिटे लांबीच्या कन्नड भाषेतील चित्रपटाने गेल्या वर्षी प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक आणि समीक्षकांना झपाटून सोडले आहे. संस्कृती आणि लोककला प्रकारांना मानवंदना देणाऱ्या कांतारा या चित्रपटात नृत्य आणि भावनांचा अद्भुत मेळ साधत, चित्रित करण्यात आलेला मानव आणि निसर्गामधील गुंतागुंतीचा संघर्ष प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो, आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ रेंगाळत राहतो.    

“प्रेक्षक कांताराशी जोडले गेले कारण ही कथा भारताच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे,” शेट्टी म्हणाले. “प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला, आणि खर्‍या अर्थाने आपलासा केला,” ते पुढे म्हणाले. आपला मूळ गाभा कायम ठेवत, कांताराने पारंपरिक कोला नृत्य आणि ते सादर करणाऱ्या समुदायाला व्यक्त होण्याची नवीन संधी दिली.

ऋषभ म्हणाले की, त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही ते सातत्याने या समाजाच्या संपर्कात आहेत. “ही माझी परंपरा, माझा या विधीवर विश्वास आहे आणि मी या देवाची पूजा करतो. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली आणि संस्कृती किंवा समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेतली,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कांताराच्या यशाचे श्रेय श्रद्धेला देत शेट्टी म्हणाले की, स्वतःवर आणि आपण केलेल्या कामावर श्रद्धा असली, तरच खऱ्या अर्थाने चांगले काम करता येते. ते असेही म्हणाले की आपले काम प्रामाणिकपणे करावे, यशाच्या मागे धावू नये.  

कन्नड सिनेमाबद्दल बोलताना, ऋषभ शेट्टी यांनी ओटीटी माध्यमाच्या आव्हानाबद्दल सांगितले. हे व्यासपीठ अजूनही कन्नड प्रेक्षकांबाबत सावध भूमिका घेत आहे, आणि कन्नड चित्रपटांसाठी अजूनही खुले नाही, ज्यामुळे कन्नड चित्रपट उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे, असे ते म्हणाले.

आपल्याला जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळायला हवी, असे ते म्हणाले.  “चित्रपटाने आपल्याला खूप काही दिले, आपणही कन्नड सिनेमासाठी काही करायला हवे.” शेट्टी यांनी आवाहन केले. भारतीय चित्रपटातील दर्जेदार आशय आज खर्‍या अर्थाने जगभर पोहोचला आहे, यावर आपला विश्वास असल्याचे ते म्हणाले. “सध्या मोठी क्रांती घडत आहे. भाषेच्या अडथळ्यावर मात करत चांगल्या आशयाला मोठी स्वीकृती मिळत आहे,” शेट्टी म्हणाले.

इफ्फी बरोबर आपण कसे जोडले गेलो, हे सांगताना ऋषभ शेट्टी यांनी नमूद केले की इफ्फी चित्रपट महोत्सवात येण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. चित्रपट महोत्सव, चित्रपट पाहण्याची आणि शिकण्याची संधी देतात, असे ते म्हणाले.  इफ्फीसारखे महोत्सव आपल्याला एक विस्तारित कुटुंबच वाटते असे ते म्हणाले. त्यांनी चित्रपट महोत्सवांची प्रशंसा केली आणि छोट्या चित्रपटांना ओळख मिळवून देण्यासाठी या व्यासपीठांचा वापर करायला हवा असे आवाहन केले.

शेट्टी यांनी अलीकडेच कांतारा या चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित प्रीक्वलची घोषणा केली होती, ज्याचे पोस्टर काल प्रकाशित करण्यात आले. त्यांनी हे स्पष्ट केले की, सुरुवातीपासूनच हा चित्रपट दोन भागांमध्ये असावा, अशी कल्पना होती.  

दिग्दर्शन, लेखन, अभिनय यापैकी सर्वात प्रिय काय, यावर बोलताना शेट्टी म्हणाले, “दिग्दर्शन हे माझे पहिले प्रेम आहे.” “मी जीवनाच्या अनुभवांवर विश्वास ठेवतो, मी लोकांशी जोडलेला आहे आणि माझ्या चित्रपटांमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतो".

 

पत्रकार परिषद येथे पहा: 

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane



(Release ID: 1980453) Visitor Counter : 98