राष्ट्रपती कार्यालय
पारादीप येथे आयोजित बोईता बंदना समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी
Posted On:
27 NOV 2023 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (27 नोव्हेंबर 2023) पारादीप येथे पारादीप बंदर प्राधिकरणाने आयोजित केलेल्या बोईता बंदना समारंभात सहभागी झाल्या. त्यांनी यावेळी मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कचे दुरदृष्यप्रणाली द्वारे उद्घाटन केले. राष्ट्रपतींनी बंदर वसाहतीसाठी नवीन जलाशय आणि जल प्रक्रिया प्रकल्पाची तसेच अद्ययावत जहाज वाहतूक व्यवस्थापन आणि सूचना प्रणालीची पायाभरणीही केली.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताचे व्यापारी, वाणिज्य आणि आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यासाठी समुद्र हे प्रमुख माध्यम आहे. समुद्रावर आधारित साहित्यानेही भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. ओदिशा आणि इतर किनारी राज्यांमध्ये नौदल व्यापाराची दीर्घ आणि समृद्ध परंपरा राहिली आहे. या व्यापाऱ्यांनी व्यापार आणि वाणिज्य व्यवहारांबरोबरच, परदेशात भारतीय कला आणि संस्कृतीचा प्रसार करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की. सागरी व्यापार आपल्या देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्या म्हणाल्या की भारताच्या एकूण व्यापारी उलाढालीच्या 95 टक्के, तर एकूण मूल्याच्या दृष्टीने 65 टक्के व्यापार सागरी वाहतुकीद्वारे होतो. भारताच्या बंदरांनी जागतिक मानकांच्या अनुषंगाने अधिक कार्यक्षमतेने काम करायला हवे, आणि त्यासाठी भारतीय बंदरांच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सागरमाला कार्यक्रम हे या दिशेने टाकलेले प्रशंसनीय पाऊल असल्याचे त्या म्हणाल्या. भारत सरकार ‘समृद्धीसाठी बंदरे’ आणि ‘प्रगतीसाठी बंदरे’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1980221)
Visitor Counter : 113