युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे बोधचिन्ह आणि शुभंकर उज्वलाचे केले अनावरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच खेलो इंडिया हे नाव घराघरात पोहचले आहे: अनुराग सिंह ठाकूर

Posted On: 26 NOV 2023 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023

दिव्यांगासाठीच्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023  चे बोधचिन्ह आणि शुभंकर उज्ज्वला यांचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री  अनुराग सिंह ठाकूर तसेच अनेक नामवंत खेळाडू आणि पॅरा ऍथलीट्स यांच्या हस्ते करण्यात आज नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आले.

खेलो इंडिया - पॅरा गेम्स 2023 चा अधिकृत शुभंकर म्हणून 'उज्ज्वला'- एक चिमणी चे अनावरण करण्यात आले.  छोटी चिमणी दिल्लीच्या अभिमानाचे प्रतीक आहे आणि तिचे वेगळेपण दृढनिश्चय आणि सहानुभूती दर्शवते.  खेलो इंडिया – पॅरा गेम्स 2023 ची शुभंकर उज्वला, आठवण करून देते की शक्ती अनेक रूपात येते आणि मानवी चैतन्य  अतूट आहे.

यावेळी उपस्थित खेळाडूंमध्ये, भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल, भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त, भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू सरिता मोर आणि भारतीय व्यावसायिक मुष्टियोद्धा अखिल कुमार उपस्थित होते.

त्याचबरोबर प्रमोद भगत, भाविना पटेल, अवनी लेखरा, सुमित अंतिल या प्रमुख  पॅरा ॲथलीट्सच्या उपस्थितीने  सोहळ्यात रंगत आणली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक क्रीडा परिसंस्थेच्या कल्पनेबाबत अनुराग ठाकूर म्हणाले, पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या उद्घाटनाच्या निमित्ताने  मी सर्वांचे अभिनंदन करू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळेच खेलो इंडिया हे नाव घराघरात पोहचले आहे.ही एक चळवळ बनली आहे आणि  गेली काही वर्षे खेलो इंडियामध्ये  पॅरा गेम्सचा समावेश नव्हता.  2018 पासून आजपर्यंत आपल्याकडे 11 खेलो इंडिया स्पर्धा झाल्या आहेत, या वर्षी पॅरा गेम्सचा समावेश करताना  आम्हाला आनंद होत आहे.

केंद्रीय मंत्री  म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून खेलो इंडियासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3,000 कोटी रुपये मंजूर केले होते आणि मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, पुढील पाच वर्षांसाठी त्यात वाढ करून ते 3300 कोटींहून अधिक करण्यात आले आहे.

2018 पासून एकूण 11 खेलो इंडिया स्पर्धांचे  यशस्वीरित्या  आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 5  खेलो इंडिया युवा स्पर्धा , 3 खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धा आणि 3 खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचा समावेश आहे.  या खेळांमुळे देशभरातील प्रतिभावंत खेळाडू ओळखण्यात मदत झाली आहे आणि प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यात मदत झाली आहे असे ठाकूर यांनी सांगितले. आता, पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समुळे , पॅरा स्पोर्ट्समध्ये करिअर करण्यास उत्सुक असलेले प्रतिभावान पॅरा अॅथलीट्स निवडता येतील आणि देशासाठी अपेक्षित परिणाम आणण्यासाठी त्यांना आणखी सहाय्य पुरवता येईल.

याप्रसंगी बोलताना, भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त यांनी सांगितले , केंद्र सरकार इतका सुंदर उपक्रम घेऊन येत आहे हे पाहून खूप आनंद झाला. या सर्व खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.

खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या अनावरण कार्यक्रमानंतर आपला आनंद सामायिक करताना,  2020 उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये पॅरा-बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकणारा प्रमोद भगत म्हणाला, माझा विश्वास आहे की पॅरा गेम्सला विशेषतः युवक आणि पॅरा ऍथलीट्ससाठी खूप आशादायक भविष्य आहे.  खेलो इंडियाने सुरू केलेल्या  सर्वात महत्त्वाच्या उपक्रमांपैकी हा एक आहे."

सेवा क्रीडा नियंत्रण मंडळासह 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1400 हून अधिक खेळाडू पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सहभागी होण्याची शक्यता  आहे ,ज्यामध्ये पॅरा नेमबाजी, पॅरा तिरंदाजी, पॅरा फुटबॉल, पॅरा ‍फुटबॉल, पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा वेट लिफ्टिंग यासह 7 क्रीडा प्रकारांमध्ये  पॅरा ऍथलीट्स आपले कौशल्य पणाला लावतील. या स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या 3  स्टेडियममध्ये - इंदिरा गांधी स्टेडियम, तुघलकाबादमधील शूटिंग रेंज आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे आयोजित केल्या जातील .

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1980021) Visitor Counter : 141