ग्रामीण विकास मंत्रालय

नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्यातर्फे कृषी सखींच्या प्रशिक्षणाला प्रारंभ

Posted On: 24 NOV 2023 5:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023

नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आणि केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी संयुक्तपणे दीनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानाद्वारे (डीएवाय-एनअरएलएम) ‘कृषी सखी’  प्रशिक्षणाची सुरुवात केली.

केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालयाचे दुय्यम कार्यालय असलेले सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीसाठीचे राष्ट्रीय केंद्र (एनसीओएनएफ) हे या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोडल संस्था म्हणून काम करणार असून या केंद्राच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने 50,000 कृषी सखींना प्रशिक्षित करून प्रमाणपत्र देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण 5 दिवस कालावधीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एनसीओएनएफने काही प्रशिक्षण मॉड्यूल्स तयार केली असून अंतिम पुनरावलोकनासाठी ती राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेकडे (एमएएनएजीई) पाठवण्यात आली आहेत.

ग्रामीण रोजगार विभागाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंह यांनी या कार्यक्रमात बोलताना नैसर्गिक शेती उपक्रमाची भूमिका अधोरेखित केली. आपल्या गावांना समृध्द गावांमध्ये रुपांतरीत करण्याच्या आणि स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्यांना लखपती करून पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम दोन्ही मंत्रालयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असे ते म्हणाले.

ग्रामीण रोजगार विभागाच्या सहसचिव स्वाती शर्मा म्हणाल्या कीपंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील घोषणेप्रमाणे  2 कोटी दीदींना लखपती करणे शक्य होण्यासाठी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून या दोन्ही मंत्रालयाचे समन्वयीत प्रयत्नांची भूमिका महत्वाची ठरणार आहे .

केंद्रीय कृषी तसेच शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या एकात्मिक पोषण व्यवस्थापन विभागाच्या सहसचिव योगिता राणा यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्यात महिलांचे योगदान तसेच क्षमता निर्मितीच्या मदतीने कृषी सखींना सक्षम केल्यामुळे नैसर्गिक शेती पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे कशा प्रकारे सुनिश्चिती होईलयाची माहिती ठळकपणे मांडली. या कृषी सखींना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देऊन प्रमाणित करण्यात येईल आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे विविध सरकारी योजनांच्या अंतर्गत त्यांच्या सेवांचा वापर वापर करून घेतला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

डीएवाय-एनअरएलएमचे उपसंचालक रमण वाधवा यांनी नैसर्गिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांसह उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती दिली. स्वयंसहाय्यता बचत गटांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने त्यांच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले.

 

S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979501) Visitor Counter : 184