माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘आर्ची’ कॉमिक हे माझ्यासाठी सर्वस्व होते, त्याबद्दल एका चित्रपटासाठी लिहिणे हा सन्मान असला तरी ते आव्हानात्मक होते: इफ्फी 54 मध्ये झोया अख्तर
आर्ची कॉमिकच्या इतिहासातील पहिला चित्रपट; भारतात आर्चीज ही स्वर्गात बांधलेली गाठ आहे: जॉन गोल्डवॉटर, मुख्य कार्यकारी अधिकारी, आर्ची कॉमिक्स
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2023
आर्चीज चित्रपटाद्वारे आर्ची कॉमिकची निरागसता, भाबडेपणा आणि मैत्री आजच्या युवा पिढीसाठी दोन तासांच्या कथेत सादर करण्याचा हा प्रयत्न आहे, असे सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणाऱ्या दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी गोव्यात काल 54 व्या इफ्फीमध्ये 'द आर्चीज - मेड इन इंडिया ' वरील 'इन कॉन्व्हर्सेशन' सत्रात सांगितले.
एका कॉमिक कथेचे चित्रपटात रूपांतर करण्याच्या आव्हानांबद्दल बोलताना झोया अख्तर यांनी स्पष्ट केले की आर्ची कॉमिकचे प्रचंड यश लक्षात घेऊन त्यातील सारांश आणि बारकावे टिपणे आणि प्रेक्षकांसाठी तो एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव बनवणे खूप आव्हानात्मक होते. “आर्चीने माझे बालपण व्यापून टाकले होते. यातील पात्रे प्रतिकात्मक आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय आहेत, आणि कॉमिक वाचून मोठ्या झालेल्या आजच्या पिढीला पुन्हा त्या भावविश्वात नेणारा आणि आजच्या युवकांना त्याच्याशी जोडणारा चित्रपट सादर करताना पटकथा लेखनाचा संपूर्ण नवीन अनुभव दिला ’’ असे त्या म्हणाल्या.
आर्ची कॉमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन गोल्डवॉटर म्हणाले, “आर्ची कॉमिक्सची पात्रे आणि कथा 50 वर्षांहून अधिक काळ लोटूनही जागतिक स्तरावर आणि विशेषत: भारतातल्या चाहत्यांना आपलीशी वाटते ही अभिमानाची गोष्ट आहे. चित्रपट निर्मात्यांनी संपूर्ण चित्रपटात प्रत्येक काल्पनिक पात्रांचा भाबडेपणा आणि खरेपणा अबाधित ठेवला. न्यूयॉर्कमधील आर्ची टीमला या चित्रपटाचा खूप अभिमान आहे.’’
नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट डायरेक्टर रुचिका कपूर शेख म्हणाल्या, “नेटफ्लिक्स इंडियासाठी हा एक महत्वाचा क्षण आहे , इथे आम्हाला आर्ची कॉमिक्सच्या इतिहासातील पहिला चित्रपट केल्यावर जागतिक फ्रेंचाइजी मिळाली आहे . भारतात निर्मित हा एक सांस्कृतिक चित्रपट आहे जो जगभरातील प्रेक्षकांनाही भावेल.’
'द आर्चिस ' हे आयकॉनिक कॉमिक सिरीज 'द आर्चीज' चे भारतीय रूपांतरण आहे; हे 1960 च्या भारतातील रिव्हरडेल या काल्पनिक डोंगराळ शहरामध्ये साकारले आहे , आणि यात किशोरवयीन मुलांचे प्रेम, मनातील दुःख , मैत्री आणि बंडखोरी दाखवली आहे . हा संगीतमय चित्रपट 7 डिसेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978796)
Visitor Counter : 116