कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
किश्तवार हे उत्तर भारतातील प्रमुख 'ऊर्जा केंद्र' म्हणून उदयाला येईल- डॉ जितेंद्र सिंह
पद्दर परिसरातील गुलबगर या दुर्गम गावात लष्करातर्फे मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय शिबिराचे आयोजन
डॉ जितेंद्र सिंह यांनी किश्तवार जिल्ह्यातील दुर्गम खेड्यांपैकी एक मस्सू नावाच्या गावात शिक्षा भारती शाळेचे केले उद्घाटन
Posted On:
11 NOV 2023 6:19PM by PIB Mumbai
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार हे उत्तर भारतातील प्रमुख "ऊर्जा केंद्र " म्हणून उदयास येण्यास सज्ज असून विद्यमान वीज निर्मिती प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 6,000 मेगावॅट वीज निर्मिती करेल असा विश्वास केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे.
किश्तवारच्या डोंगराळ जिल्ह्याच्या दुर्गम भागाच्या विशेष दौऱ्यावर असलेले डॉ जितेंद्र सिंह यांनी पद्दार भागातील गुलाबगड आणि मस्सू या दुर्गम गावाला भेट दिली आणि तिथल्या गावातील मुलांसाठी "शिक्षा भारती" द्वारे उभारण्यात आलेल्या नवीन शाळेचे उद्घाटन देखील केले.
प्रसिद्ध फिजिशियन आणि मधुमेहतज्ञ असलेले केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह, गुलाबगढ गावात भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या मल्टी स्पेशालिटी वैद्यकीय शिबिरात देखील सहभागी झाले.
त्यानंतर डॉ जितेंद्र सिंह यांनी गुलाबगड येथे जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिथल्या जनतेशी संवाद साधला. तसेच बीडीसी सदस्य, नगरसेवक, सरपंच तसेच प्रदेशातील प्रमुख कार्यकर्त्यांसह स्थानिक पंचायती राज संस्थांनाही संबोधित केले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून 9 ते 10 वर्षांच्या अल्प कालावधीत या प्रदेशात 6 ते 7 मोठे जलविद्युत प्रकल्प आले आहेत, अशी माहिती आपल्या भाषणादरम्यान आणि नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.
दरम्यान, गुलाबगढ येथे लष्कराने आयोजित केलेल्या मल्टी स्पेशालिटी वैद्यकीय शिबिरात जवळपास 2,000 रुग्णांना वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आली. शिबिरासाठी नोंदणी केलेल्या सर्व गावकऱ्यांना सामान्य बाह्य रुग्ण विभागात नेण्यात आले, जिथे वैद्यकीय अधिकारी आणि तज्ञांनी त्यांचे वैद्यकीय तपशील नोंदवले आणि आवश्यक तेथे तपासणीचा सल्ला दिला. रक्तक्षय , उच्च रक्तदाब, मधुमेह, मायग्रेन, मणक्यांचे आजार आणि फुप्फुसाचा क्षयरोग यासारख्या प्रकरणांचे निदान आणि व्यवस्थापन करण्यात आले. वैद्यकीय तज्ञांनी रुग्णांना योग्य सल्ला आणि उपचार प्रदान केले. मधुमेह असलेल्या रुग्णांना आहारात बदल करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. ज्ञात उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना रोगांबद्दल शिक्षित केले गेले आणि आरोग्यदायी आहाराच्या सल्ला देऊन शिबिरात नोंदल्या गेलेल्या रक्तदाबानुसार त्यांना उच्च रक्तदाबविरोधी औषधे घेण्याचा सल्ला देण्यात आला. क्षयरोग असलेल्या रुग्णांना डॉट्स केंद्रांवर भेट देण्याच्या सल्ल्यासह त्यांचे क्षयरोगविरोधी औषध उपचारांसाठी समुपदेशन करण्यात आले.
डॉ. जितेंद्र सिंग यांनी या दुर्गम डोंगराळ ग्रामीण भागात अत्यंत आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्याबद्दल लष्कर आणि मेजर जनरल शिवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील चमूचे आभार मानले. दहशतवादाच्या काळात आपल्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आणि शांततेच्या काळात त्यांच्या सेवेसाठी पुढे आलेल्या लष्कराचे या भागातील लोक मनापासून आभारी आहेत, असेही डॉ. सिंग म्हणाले.
***
S.Patil/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976437)
Visitor Counter : 95