गृह मंत्रालय
आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमात सहभागी झालेल्या युवकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची घेतली भेट
आपली लोकशाही व्यवस्था सर्वांना समान संधी प्रदान करते, त्यामुळे देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवण्याचा राष्ट्रपतींचा या युवकांना सल्ला
Posted On:
05 NOV 2023 7:24PM by PIB Mumbai
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील युवकांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. नक्षल प्रभावित भागातील तरुणांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे तरुण दिल्लीत आले आहेत.
शिष्टमंडळातील सदस्यांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी या युवकांना देशाच्या संविधानावर आणि लोकशाहीवर पूर्ण विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. आपली लोकशाही व्यवस्था सर्वांना समान संधी देते, असेही त्यांनी सांगितले. युवकांनी केवळ मेहनत आणि समर्पणाच्या बळावर आपला मार्ग आखायचा आहे, असे त्या म्हणाल्या. भारतीय युवकांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. हिंसाचारातून कधीच विकास साधता येत नाही, यावर त्यांनी भर दिला.
सरकार देशाच्या आणि सर्व नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधी देण्यासाठी देखील सरकार कटिबद्ध आहे. अतिदुर्गम भागातही सर्वांचा विकास साधण्यासाठी शासन रस्ते, दळणवळण, शिक्षण, आरोग्य सुविधा यांची निर्मिती करत आहे, असे त्यांनी सांगितले. तरुणांची व्यावसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, यांचा उल्लेख त्यांनी केला.
शिक्षण हा व्यक्ती आणि समाजाच्या विकासाचा पाया आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे 18 ऑक्टोबर 2023 रोजी आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमा अंतर्गत 200 आदिवासी तरुणांशी संवाद साधला होता. हिंसाचार नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकत नाही, तर विकास आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणे आवश्यक आहे, असे गृहमंत्र्यांनी याप्रसंगी युवकांना सांगितले होते. स्वतः चुकीच्या मार्गाचा अवलंब न करणे तसेच इतरांनाही चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्यापासून रोखणे ही आदिवासी तरुणांची जबाबदारी आहे, असेही शहा म्हणाले होते.
गृह मंत्रालय गेल्या 15 वर्षांपासून आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम राबवत आहे. हा कार्यक्रम युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र संघटने मार्फत चालवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत, नक्षल प्रभावित दुर्गम भागातील आदिवासी समुदायाच्या युवक आणि युवतींना देशभरातील प्रमुख शहरे आणि महानगरांच्या भेटीवर नेले जाते.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1974914)
Visitor Counter : 124