पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या तुकडीला पंतप्रधानांनी केले संबोधित


"खेळात हार नाही, फक्त जिंकणे किंवा शिकणे आहे": पंतप्रधान

"तुमचे यश संपूर्ण देशाला प्रेरणा देते आणि नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते": पंतप्रधानांचे गौरवोद्गार

अलीकडच्या काळात खेळाला व्यवसाय म्हणून मान्यता मिळत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

दिव्यांगांचे यश हे केवळ क्रीडा क्षेत्राला प्रेरणा देणारे नसून, जीवनाला प्रेरणा देणारे आहे: पंतप्रधान

'सरकारसाठी खेळाडू', हा पूर्वीचा दृष्टीकोन मागे पडून आता, 'खेळाडूंसाठी सरकार' असा झाला आहे: पंतप्रधान

सरकारचा दृष्टीकोन खेळाडू केंद्रित असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

क्षमता आणि त्याला मिळणारे व्यासपीठ याचा एकत्रित परिणाम कामगिरीमधून प्रतिबिंबित होतो

क्षमतांना साजेसे व्यासपीठ उपलब्ध होते, तेव्हा कामगिरीला अधिक बळ मिळते: पंतप्रधान

“प्रत्येक स्पर्धेमधील तुमचा सहभाग हा मानवी स्वप्नांचा विजय आहे”: पंतप्रधानांचे गौरवोद्गार

Posted On: 01 NOV 2023 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 नोव्‍हेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये आशियाई पॅरा गेम्स, अर्थात दिव्यांगांसाठी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंच्या चमूशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करण्‍यासाठी आणि त्यांना भविष्‍यातील स्पर्धांसाठी प्रेरणा देण्यासाठी पंतप्रधानांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पॅरा-अॅथलीट्सना (दिव्यांग खेळाडूंना) संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असतात. “इथे येताना तुम्ही नेहमीच नव्या आशा आणि नवा उत्साह घेऊन येता”, पंतप्रधान म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की, आपण येथे केवळ एकाच गोष्टीसाठी आलो आहोत, ती म्हणजे, पॅरा-अॅथलीट्सचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करणे. ते म्हणाले की, ते केवळ पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील घडामोडी पाहत नव्हते, तर त्या प्रत्यक्ष जगत होते. त्यांनी खेळाडूंनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली, आणि त्याच बरोबर त्यांचे प्रशिक्षक आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या 140 कोटी नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

खेळाचे अत्यंत स्पर्धात्मक स्वरूप अधोरेखित करत, पंतप्रधानांनी खेळाडूंच्या एकमेकांबरोबर असलेल्या स्पर्धेवरही लक्ष केंद्रित केले. त्यांनी खेळाडूंचा उच्च पातळीवरील सराव आणि समर्पणाचा विशेष उल्लेख केला. "आपण इथे उपस्थित असलेल्यांपैकी काही जण विजय संपादन करून परतले, तर काही जणांनी अनुभव मिळवला, पण कोणीही पराभूत होऊन परतले नाही", पंतप्रधान म्हणाले. “खेळात हार नाही, फक्त जिंकणे किंवा शिकणे”, असे  अधोरेखित करून, त्यांनी खेळामधील शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. 140 कोटी जनतेमधून आपली निवड होणे, हे पॅरा-अॅथलीट्ससाठी एक मोठे यश असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्पर्धेतील एकूण 111 पदकांच्या विक्रमी यशाची नोंद घेत पंतप्रधान मोदी म्हणाले,

“तुमचे यश संपूर्ण देशाला प्रेरणा देते आणि नागरिकांमध्ये अभिमानाची भावना देखील जागृत करते”.

पंतप्रधानांनी खेळाडूंच्या विक्रमी कामगिरीबद्दल त्यांच्याशी संवाद साधताना, गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकांमधील आपल्या विक्रमी कामगिरीबद्दल अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले अभिनंदन केले होते, त्या वेळच्या भावनांचे स्मरण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “ही 111 पदके केवळ संख्या नसून, 140 कोटी स्वप्ने आहेत”, असेही ते म्हणाले. त्यांनी माहिती दिली की, 2014 मध्ये जिंकलेल्या पदकांच्या संख्येपेक्षा ही संख्या तिप्पट असून, सुवर्णपदकांची संख्या दहा पटीने जास्त आहे, आणि भारत पदकतालिकेत 15 व्या स्थानावरून पहिल्या 5 व्या स्थानावर पोहोचला आहे.

पंतप्रधानांनी गेल्या काही महिन्यांमधील भारताच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर प्रकाश टाकला आणि ते म्हणाले, "पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील तुमचे यश आधीच्या आशियाई स्पर्धेतील खेळाडूंच्या यशात अधिक भर घालणारे आहे". ऑगस्टमध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक, आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन पुरुष संघाचे पहिले सुवर्णपदक, टेबल टेनिसमधील महिला जोडीचे पहिले पदक, पुरुष बॅडमिंटन संघाने जिंकलेला थॉमस चषक, आशियाई क्रीडा स्पर्धेमधील 28 सुवर्ण पदकांसह मिळवलेली विक्रमी 107 पदके, आणि आशियाई पॅरा गेम्समधील पदकांची विक्रमी कमाई, या यशाचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.

पॅरा गेम्सचे विशेष स्वरूप जाणून पंतप्रधान म्हणाले की, दिव्यांगांनी क्रीडास्पर्धा जिंकणे ही केवळ खेळातील प्रेरणा नसून ती जीवनासाठीच प्रेरणादायी बाब आहे. "तुमची कामगिरी, कोणत्याही व्यक्तीला कितीही निराशेच्या गर्तेत असताना पुन्हा उत्साही करू शकते", पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी एक क्रीडा संस्था म्हणून भारताची प्रगती आणि तिची क्रीडा संस्कृती यावर प्रकाश टाकला. "आम्ही 2030 युवा ऑलिम्पिक आणि 2036 ऑलिंपिक आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहोत", ते म्हणाले. 

पंतप्रधान म्हणाले की खेळामध्ये कोणतेही शॉर्टकट नसतात आणि ते म्हणाले की खेळाडू त्यांच्या स्वत: च्या क्षमतेवरच प्रगती करत असतात मात्र, थोडी मदत त्यांच्या या प्रयत्नांना अधिक पाठबळ देते. कुटुंब, समाज, संस्था आणि इतर सहाय्यक व्यवस्थांच्या सामूहिक पाठबळाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. कुटुंबांमध्ये खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे त्यांनी नमूद केले.

“पूर्वीपेक्षा आता समाजाने खेळांना उपजीविकेचे साधन म्हणून मान्यता देण्यास सुरुवात केली आहे,” पंतप्रधानांनी नमूद केले. ‘सरकारसाठी खेळाडू’ वरून ‘खेळाडूंसाठी सरकार’ असा सध्याच्या सरकारच्या परिवर्तनकारी दृष्टिकोनावर त्यांनी प्रकाश टाकला आणि खेळाडूंच्या यशामागे सरकारच्या संवेदनशीलतेलाही श्रेय दिले. "जेव्हा सरकार खेळाडूंची स्वप्ने आणि संघर्ष ओळखते, तेव्हा त्याचा प्रभाव त्याच्या धोरणांवर, दृष्टिकोनावर आणि विचारांवर दिसून येतो", पंतप्रधान मोदींनी यावर जोर दिला. त्यांनी मागील सरकारांद्वारे खेळाडूंसाठी धोरणे, पायाभूत सुविधा, कोचिंग सुविधा आणि आर्थिक सहाय्य नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि ते म्हणाले की यश मिळविण्यात हा एक मोठा अडथळा होता. गेल्या 9 वर्षांत देशाने जुन्या पद्धती आणि दृष्टिकोनाची कात टाकली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज विविध खेळाडूंवर 4-5 कोटी रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकार अडथळे दूर करून खेळाडूंसाठी नवीन संधी निर्माण करत आहे हे अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले कि “सरकारचा आजचा दृष्टीकोन खेळाडू- केंद्री दृष्टिकोन आहे.” संधीयुक्त प्लॅटफॉर्म हा कामगिरी सारखाच उपयुक्त ठरतो. जेव्हा क्षमतांना उत्तम व्यासपीठाची जोड़ मिळते तेव्हा खेळाडूंची कामगिरी उंचावते”, असे सांगत, त्यांनी खेलो इंडिया योजनेचा उल्लेख केला जिने क्रीडापटूंना तळागाळातील स्तरावर ओळखून आणि त्यांचे नैपुण्य वाढवून यश मिळवून दिले. त्यांनी टॉप्स उपक्रम आणि दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्राचाही उल्लेख केला.

पंतप्रधान म्हणाले की, खेळाडूंनी अडचणींचा सामना करताना लवचिकता दाखविणे हे त्यांचे राष्ट्रासाठी सर्वात मोठे योगदान आहे. ते म्हणाले की, तुम्ही दुर्गम अडथळ्यांवर मात केली आहे. ही प्रेरणा सर्वत्र वाखाणली जाते, पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पॅरा-अॅथलीट्सच्या कौतुकाचा उल्लेख केला. समाजातील प्रत्येक घटक दिव्यांग खेळाडूंकडून प्रेरणा घेत आहे. “प्रत्येक स्पर्धेतील तुमचा सहभाग हा मानवी स्वप्नांचा विजय आहे. हा तुमचा सर्वात मोठा वारसा आहे. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की तुम्ही असेच कठोर परिश्रम करून देशाचा गौरव वाढवत राहाल. आमचे सरकार तुमच्या पाठीशी आहे, देश तुमच्या पाठीशी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी संकल्पशक्तीचा पुनरुच्चार करून भाषणाचा समारोप केला. ते म्हणाले की एक राष्ट्र म्हणून आम्ही कोणत्याही एका टप्प्यावर विसावत नाही आणि आमच्या गौरवाने हुरळून जात नाही. “आम्ही पहिल्या पांच अर्थव्यवस्थांमध्ये पोहोचलो आहोत, मी ठामपणे सांगतो की या दशकात आम्ही पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये असू आणि 2047 मध्ये हे राष्ट्र विकसित भारत होईल”, ते म्हणाले.

केंद्रीय युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर, भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्ष दीपा मलिक, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने 29 सुवर्ण पदकांसह एकूण 111 पदके जिंकली. आशियाई पॅरा गेम्स 2022 मधील एकूण पदकतालिकेत मागील सर्वोत्तम कामगिरीपेक्षा (2018 मधील) 54% वाढ झाली आहे आणि 2018 मध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकांपेक्षा जवळपास दुप्पट, म्हणजे 29 सुवर्ण पदके यावेळी जिंकली आहेत.

या कार्यक्रमाला खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, भारतीय पॅरालिम्पिक समिती आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

* * *

R.Aghor/Rajshree/Vasanti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1973949) Visitor Counter : 79