पंतप्रधान कार्यालय
केवडिया येथील राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
31 OCT 2023 11:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2023
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
तुम्हा सर्व तरुणांचा, साहसी लोकांचा हा उत्साह, ही राष्ट्रीय एकता दिवसाची खूप मोठी ताकद आहे. एकप्रकारे लघु भारताचे, मिनी इंडियाचे रूप मला समोर दिसते. राज्ये वेगळी आहेत, भाषा वेगळी आहे, परंपरा वेगळ्या आहेत, पण इथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती एकतेच्या मजबूत धाग्याने जोडलेली आहे. मणी अनेक आहेत, पण माळ एक आहे. शरीरे अनेक आहेत, पण मन एकच आहे. ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट हा आपल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे आणि 26 जानेवारी हा आपल्या प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्याचा दिवस आहे, त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादाच्या संवादाचा उत्सव बनला आहे.
15 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होणारा कार्यक्रम, 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या कर्तव्यपथावर आयोजित संचलन आणि 31 ऑक्टोबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सानिध्यात नर्मदामाईच्या किनारी राष्ट्रीय एकता दिनाचा हा मुख्य कार्यक्रम, राष्ट्रीय उत्थानाची त्रिशक्ती झाले आहेत. आज या ठिकाणी जे संचलन झाले, जे कार्यक्रम सादर झाले, त्या सादरीकरणाने सर्वांना भारावून टाकले आहे. एकता नगरात येणाऱ्यांना हा भव्य पुतळा बघायला मिळतो, आणि त्याचबरोबर त्यांना सरदार साहेबांचे जीवन, त्यांचे बलिदान आणि एक भारत घडवण्याच्या कामी त्यांनी दिलेल्या योगदानाची झलकही पाहायला मिळते. या पुतळ्याच्या निर्मितीच्या कथेमध्येच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचे प्रतिबिंब आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी लोहपुरुषाच्या पुतळ्यासाठी शेतीची अवजारे दिली, लोहपुरूषाच्या प्रतिमेसाठी लोखंड दिले. देशाच्या कानाकोपऱ्यातून माती आणून येथे वॉल ऑफ युनिटी बांधण्यात आली. ही केवढी मोठी प्रेरणा आहे. या प्रेरणेने ओतप्रोत, कोट्यवधी देशवासी या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत.
लाखो लोक देशभरात आयोजित 'रन फॉर युनिटी' मध्ये सहभागी होत आहेत. एकतेसाठीच्या या स्पर्धेमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लाखो लोक सहभागी होत आहेत. देशातील एकात्मतेचा हा प्रवाह जेव्हा आपण पाहतो, 140 कोटी भारतीयांमध्ये एकात्मतेची ही भावना पाहतो, तेव्हा असे वाटते की सरदार साहेबांचा आदर्श 'एक भारत-श्रेष्ठ भारत'च्या संकल्पाच्या रूपाने आपल्या नसानसांतून धावतो आहे. या शुभ प्रसंगी मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणी वंदन करतो आहे. सर्व देशवासियांना मी राष्ट्रीय एकता दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियांनो,
आगामी 25 वर्षे भारतासाठी या शतकातील सर्वात महत्त्वाची 25 वर्षे आहेत. या 25 वर्षांत आपल्याला आपल्या भारत देशाला समृद्ध करायचे आहे, आपल्या भारताला विकसित करायचे आहे. स्वातंत्र्यापूर्वी गेल्या शतकात 25 वर्षांचा काळ असा होता, जेव्हा प्रत्येक देशवासीयाने स्वतंत्र भारतासाठी बलिदान दिले. आता त्याचप्रकारे समृद्ध भारतासाठी, पुढच्या 25 वर्षांचा अमृतकाळ एक संधी म्हणून आपल्यासमोर आला आहे. सरदार पटेलांच्या प्रेरणेसह आपल्याला प्रत्येक ध्येय गाठायचे आहे.
आज अवघे जग भारताकडे पाहते आहे. आज भारत यशाच्या नव्या शिखरावर आहे. जी-20 मध्ये भारताचे सामर्थ्य पाहून जग थक्क झाले आहे. आम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची विश्वासार्हता नवीन उंचीवर नेत आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. अनेक जागतिक संकटे उद्भवली असतानाही आमच्या सीमा सुरक्षित आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. येत्या काही वर्षात आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक सत्ता बनणार आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अभिमान वाटतो की आज भारत चंद्रावर अशा ठिकाणी पोहोचला आहे जिथे जगातील इतर कोणताही देश पोहोचू शकला नाही. आम्हाला अभिमान वाटतो की आज भारत तेजस लढाऊ विमानांपासून आयएनएस विक्रांतपर्यंत स्वतःची विमाने बनवत आहे. आम्हाला अभिमान वाटतो की आज भारत, आमचे व्यावसायिक, जगातील अब्ज-ट्रिलियन डॉलरची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. आज जगातील मोठमोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये तिरंग्याची शान सतत वाढत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. देशातील युवा, सुपुत्र आणि सुकन्या विक्रमी संख्येने पदके जिंकत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.
मित्रहो,
या अमृत काळात भारताने गुलामगिरीची मानसिकता त्यागून पुढे जाण्याचा संकल्प केला आहे. आम्ही विकसित होत आहोत आणि आमच्या वारशाचेही जतन करत आहोत. भारताने आपल्या नौदल ध्वजावरून गुलामगिरीचे चिन्ह काढून टाकले आहे. गुलामगिरीच्या काळात केलेले अनावश्यक कायदेही काढून टाकले जात आहेत. IPC च्या जागी भारतीय न्याय संहिता आणली जाते आहे. एकेकाळी इंडिया गेटवर परकीय सत्तेच्या प्रतिनिधीची प्रतिमा होती, तिथे आता नेताजी सुभाष यांचा पुतळा आपल्याला प्रेरणा देत आहे.
मित्रहो,
आज भारत साध्य करू शकत नाही, असे कोणतेही ध्येय नाही. असा कोणताही संकल्प नाही जो आपण भारतीय मिळून साध्य करू शकत नाही. गेल्या नऊ वर्षात देशाने पाहिले आहे की सगळे मिळून प्रयत्न करतो तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य नसते. काश्मीर कलम 370 च्या विळख्यातून मुक्त होऊ शकेल, असा विचारही कोणी केला नसेल. पण आज काश्मीर आणि देशाच्या मध्ये असणारी कलम 370ची भिंत ढासळली आहे. सरदार साहेब जिथे असतील तिथे ते अत्यंत आनंदी असतील आणि आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत असतील. आज काश्मीरमधले माझे बंधू-भगिनी दहशतवादाच्या छायेतून बाहेर पडत आहेत, मोकळ्या हवेत श्वास घेत आहेत आणि देशाच्या विकासाच्या वाटेवर सर्वांसोबत पुढे पाऊल टाकत आहेत. माझ्या एका बाजूला असलेले सरदार सरोवर धरणही 5-6 दशके प्रलंबित होते. सर्वांच्या प्रयत्नांतून गेल्या काही वर्षांत या धरणाचे कामही पूर्ण झाले आहे.
मित्रहो,
आपले एकता नगर सुद्धा निर्धारातून यश मिळवण्याचे उत्तम उदाहरण आहे. 10-15 वर्षांपूर्वी केवडीया इतके बदलेल, असा विचारही कुणी केला नव्हता. आज जागतिक हरीत शहर म्हणून एकता नगर ओळखले जाते आहे. जगभरातील देशांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मिशन लाईफची सुरुवात याच शहरातून झाली. जेव्हा-जेव्हा मी इथे येतो, तेव्हा या ठिकाणाचे आकर्षण आणखी वाढल्याचे दिसते. इथली रिव्हर राफ्टिंग, एकता क्रुझ, एकता नर्सरी, एकता मॉल, आरोग्य वन, निवडुंग आणि फुलपाखरांची बाग, जंगल सफारी, मियावाकी फॉरेस्ट, मेझ गार्डन या बाबी पर्यटकांना आकर्षित करत आहेत. गेल्या सहा महिन्यांत येथे दीड लाखांपोक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. सौरऊर्जा निर्मितीमध्ये आणि शहर गॅस वितरणामध्येही एकता नगर आघाडीवर आहे.
आजपासून इथे एक विशेष वारसा ट्रेनचे नवे आकर्षण देखील असणार आहे.एकता नगर स्थानक आणि अहमदाबाद यांच्या दरम्यान चालणारी ही विशेष रेल्वेगाडी आपल्या वारशाचे दर्शन घडवणारी आहे आणि यात आधुनिक सुविधा देखील आहेत. त्याच्या इंजिनला वाफेच्या इंजिन सारखे स्वरूप देण्यात आले आहे, मात्र ही ट्रेन धावणारा विजेवरच. एकता नगर मधे पर्यावरण स्नेही वाहतुकीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
आता इथे पर्यटकांना ई - बस, ई गोल्फ कार्ट आणि ई सायकल सोबत सार्वजनिक बाईक शेअरिंग ची सुविधा देखील मिळेल.गेल्या पाच वर्षात दीड कोटी पेक्षा जास्त पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. याचा खूप मोठा लाभ आदिवासी बंध भगिनींना होत आहे, त्यांना रोजगाराची नवनवी साधने उपलब्ध होत आहेत.
मित्रांनो,
आज संपूर्ण जग भारताचा दृढ संकल्प, भारतीयांचे पौरुष आणि प्रखरता, भारतीय लोकांची चिकाटी याकडे आदर आणि विश्वासाने बघत आहे. भारताचा विस्मयकारक, अतुलनीय प्रवास आज प्रत्येकासाठी प्रेरणा स्रोत बनले आहे.
मात्र माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपण काही गोष्टी कधीच विसरता कामा नये, या सदा सर्वकाळ लक्षातही ठेवायच्या आहेत. मी आज राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने प्रत्येक देशवासियाला, या बाबतीत माझ्या मनात असलेली भावना, आज त्यांच्या समोत ठेवण्याचा प्रयत्न करू इच्छितो. आज संपूर्ण जगत उलथापालथ होत आहे. कोरोना नंतर अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, अतिशय खराब झाली आहे. अनेक देश 30 – 40 वर्षांतल्या सर्वात भयानक महागाईचा सामना करत आहेत. त्या देशांमध्ये बेकारी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत भारत जगात आपला झेंडा रोवत आहे. आपण एकामागून एक आव्हानाचा सामना करत सातत्याने पुढे जात आहोत. आपण नवनवे विक्रम केले आहेत, आपण नवीन मानके देखील प्रस्थापित केली आहेत. गेल्या 9 वर्षांत देश जी धोरणे आणि निर्णयांसोबत पुढे जात आहे, त्याचा प्रभाव देखील आज आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर दिसून येत आहे. भारतात गरिबी होत आहे. तसेच 5 वर्षांत साडे 13 कोटींपेक्षा जास्त लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आमची खात्री वाटू लागली आहे की आपण गरीबीचे समूळ उच्चाटन करू शकतो आणि आपल्याला याच दिशेने सातत्याने प्रवास करत राहायचा आहे. आणि यासाठी प्रत्येक भारतीयासाठी हा काल देखील खूप महत्वपूर्ण आहे. देश अस्थिर होईल अशी कुठलीच कृती कोणीच करता कामा नये. जर आपण वात चुकलो तर आपण ध्येयापासून दूर जाऊ. भारताला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी 140 कोटी भारतीयांनी जे परिश्रम घेतले आहेत, ते कधीच व्यर्थ ज्यात कामा नये. आपल्याल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, आणि आपल्या संकल्पांवर काम करायचे आहे.
माझ्या देशबांधवांनो,
देशाचे पहिले गृहमंत्री म्हणून सरदार पटेल, देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत अतिशय कडक होते. लोह पुरुष होते ना ते. गेल्या 9 वर्षांत देशाच्या अंतर्गत सुरक्षेला अनेक स्तरांवरून आव्हान देण्यात आले. मात्र आपल्या सुरक्षा दलांनी दिवस रात्र मेहनत केली आणी त्यामुळे देशाच्या शत्रूंचे मनसुबे आधी सारखे पुनर होत नाहीत. लोक अजूनही तो काळ विसरले नाहीत, जेव्हा गजबजलेल्या आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याच्या आधी मनात अनेक शंका येत असत. सणांची गर्दी, बाजार, सार्वजनिक ठिकाणं आणि आर्थिक व्यवहारांची जी क्षेत्रे होती, त्यांना लक्ष्य करून विकास थांबविण्याचे षड्यंत्र होत असे. बॉम्बस्फोट झाल्यानंतरचा विध्वंस बघितला आहे. त्यानंतर तपासाच्या नावावर सरकारचा आळस देखील बघितला आहे. तुम्ही देश पुन्हा त्याच काळात परत जाऊ देऊ नका, आपल्या शक्तीने हे थांबवतच राहायला हवे. जे लोक देशाच्या एकात्मतेवर हल्ले करत आहेत, आपण सर्व देशबांधवांनी त्यांना ओळखायचं आहे, त्यांचे हेतू समजून घ्यायचे आहेत आहे आणि त्यांच्यापासून सतर्क देखील राहायचं आहे.
मित्रांनो,
देशाच्या एकतेच्या मार्गात, सगळ्यात मोठा अडथळा आहे, लांगुलचालनाचे राजकारण. भारतात गेली अनेक दशके याची साक्षीदार आहेत की तुष्टीकरण करणाऱ्यांना दहशतवाद, त्याची भयानकता, त्याचं विक्राळ स्वरूप कधीच दिसत नाही. तुष्टीकरण करणाऱ्यांना मानवतेच्या शत्रूंसोबत उभं राहण्यात काहीही वाटत नाही. ते दहशतवादी कारवायांच्या तपासात निष्काळजीपणा करतात, ते देशविरोधी शक्तींवर कडक कारवाई करणे टाळतात. हे तुष्टीकरण इतके धोकादायक आहे, की ते दहशतवाद्यांना वाचवायला कोर्टात देखील जातात. अशा विचारांनी कुठल्याच समाजाचे भले होऊ शकत नाही. यामुळे देशाचे भले कधीच होऊ शकत नाही. एकता संकटात आणणाऱ्या अशा विचारांपासून प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक देशबांधवाने सतर्क राहायलाच हवे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
सध्या देशात निवडणुकांचे वातावरण आहे. राज्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे आणि पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत. तुम्ही बघितलं असेल, की देशात राजकारण्यांचा एक खूप मोठा गट आहे, ज्याला सकारात्मक राजकारणात अजिबात रस नाही. दुर्दैवाने हा गट अशा कारवाया करत असतो, ज्या समाज आणि देश विरोधी आहेत. हा गट आपल्या स्वार्थासाठी देशाची एकता भंग झाली तरी त्यान त्यांच्यासाठी स्वार्थ सर्वात महत्वाचा असतो. म्हणून या आव्हानांचा सामना करण्यात तुम्ही, माझे देशवासी, जनता जनार्दन, तुमची भूमिका अतिशय महत्वाची झाली आहे. हे लोक देशाच्या एकतेवर आघात करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण यांच्यापासून सावध राहिलो, तरच विकासाचे आपले ध्येय साध्य करता येईल. आपल्याला विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाची एकता अबाधित ठेवावी लागेल. आपली एकी टिकवून ठेवण्याचे प्रयत्न एका क्षणासाठीही सोडायचे नाहीत, त्यात एक पाऊलही मागे राहायचे नाही. आपल्याला निरंतर एकतेच्या मंत्रावर चालायचे आहे. एकता साकार करण्यासाठी, आपल्याला निरंतर आपले योगदान द्यायचे आहे. आपण ज्या कुठल्या क्षेत्रात आहोत, त्यात आपलं शंभर टक्के द्यायचं आहे. येणाऱ्या पिढ्यांना उत्तम भविष्य देण्याचा केवळ हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आणि हीच सरदार साहेबांची आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा देखील आहे.
मित्रांनो,
आज पासुन MyGov वर सरदार साहेबांशी संबंधित एक राष्ट्रीय स्पर्धा देखील रुरु होत आहे. सरदार साहेब प्रश्नमंजुषा या माध्यमातून, देशातल्या युवकांना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल.
माझ्या कुटुंबियांनो,
आजचा भारत नवा भारत आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीमध्ये आज प्रचंड आत्मविश्वास आपल्याला दिसतो. हा आत्मविश्वास कायम राहील आणि देश प्रगती ही करत राहील, हे आपल्याला सुनिश्चित करायला हवे. हीच भावना, हीच भव्यता कायम राहिली पाहिजे. या सोबतच, मी पुन्हा एकदा, आदरणीय सरदार पटेल यांना 140 कोटी देशबांधवांच्या वतीने विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सगळे राष्ट्रीय एकतेचा हा राष्ट्रीय उत्सव, पूर्ण उत्साहाने साजरा करूया. जीवनात एकतेच्या मंत्रावर जगण्याची सवय लावून घ्या. आयुष्याचा प्रत्येक क्षण एकतेसाठी समर्पित करावा, अशीच इच्छा व्यक्त करून, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो.
भारत माता की जय !
भारत माता की जय !
भारत माता की जय !
खूप खूप धन्यवाद ।
* * *
H.Akude/Madhuri/Radhika/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973905)
Visitor Counter : 134
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam