विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते (टेक्नोक्रॅट) नागरी सेवा पुरवठा दर्जेदार करु शकतात-केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
29 OCT 2023 6:59PM by PIB Mumbai
तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते (टेक्नोक्रॅट म्हणजेच तंत्रज्ञानाचे चांगले जाणकार आणि वापरकर्ते) नागरी सेवांच्या वितरणात मोलाची भर घालू शकतात, असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या अनेक फ्लॅगशिप अर्थात प्रमुख मोठ्या योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात, टेक्नोक्रॅट्सची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि त्यांचे कौशल्य हातभार लावू शकतात, कारण यापैकी स्वामित्व, गति शक्ती, थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी), डिजिटल हयातीच्या दाखल्यासाठी(डी एल सी) आवश्यक असलेले व्यक्ती ओळखण्याचे तंत्रज्ञान, अशा बहुतेक योजना, तंत्रज्ञानावर आधारीत आहेत, असे ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान,तसेच कार्मिक राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह,आज, आयआयटी दिल्लीच्या माजी विद्यार्थी सार्वजनिक सेवा दिन कार्यक्रमाला संबोधित करत होते.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबाबतीत जगाचे नेतृत्व करत आहे. आपण हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याच्या आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहोत.
भारत आज विजेवर चालणारी वाहने,पवन आणि सौर ऊर्जेसह अपारंपरिक ऊर्जा यांचा एक अग्रगण्य वापरकर्ता आहे आणि जगातील हायड्रोजनवर चालणारी पहिली बस भारतात बनवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. “ याबाबत आपण पुढाकार घेऊन नेतृत्व करावे, अशी जगाची आपल्याकडून अपेक्षा आहे," असेही जितेंद्र सिंह म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंह यांनी पुढे असेही सांगितले की आयआयटी अभियंत्यांची भूमिका आजच्या काळात 'ऍक्टिव्ह' म्हणजे 'सक्रीय' आणि 'पॅसिव्ह' म्हणजे निष्क्रिय असूनही मार्गदर्शन करणारे, अशी दोन्ही आहे. 'सक्रिय' अशासाठी, कारण समाज त्यांच्याकडे उच्च पात्रता, तज्ञ बुद्धिमत्ता असलेले आणि तंत्रज्ञानाचे जाणकार म्हणून पाहतो, तर पॅसिव्ह अशासाठी कारण आयआयटी पदवीधर देखील एकाच समाजाचा भाग असल्याने, ते ज्या समाजात राहतात आणि त्याचा एक भाग आहेत, त्या समाजाची तंत्रज्ञान आणि इतर सर्व क्लिष्ट बाबीं बाबतची भीती दूर करून, त्यांना प्रेरित करण्याची, मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
***
S.Kane/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1972870)
Visitor Counter : 114