वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल सौदी अरेबियामध्ये रियाध येथे होणाऱ्या सातव्या "फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह" मध्ये होणार सहभागी

Posted On: 23 OCT 2023 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल रियाध मध्ये सौदी अरेबिया येथे 24 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणाऱ्या सातव्या फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह (एफ आय आय) मध्ये सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते सौदी अरेबिया (KSA) चे ऊर्जा मंत्री, हिज रॉयल हायनेस (HRH) प्रिन्स अब्दुल अझीझ बिन सलमान अल-सौद, वाणिज्य मंत्री  महामहिम (एच.ई.) माजीद बिन अब्दुल्ला अलकसाबी; गुंतवणूक मंत्री महामहिम (एच.ई.) खालिद ए अल फलिह; उद्योग आणि खनिज संसाधन मंत्री महामहिम (एच.ई.) बंदर बिन इब्राहिम अल खोरायफ आणि पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (PIF) गव्हर्नर, महामहिम (एच.ई.) यासिर रुम्मय्यान यांच्यासह इतर मान्यवरांना भेटणार आहेत.

"जोखमीपासून संधींपर्यंत: नवीन औद्योगिक धोरणांच्या युगात उदयोन्मुख अर्थव्यवस्थांविषयी धोरणे" या विषयावरच्या परिसंवादात्मक सत्रात पीयूष गोयल, सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्र्यांसमवेत सहअध्यक्षपद भूषवतील. सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेतील एक प्रभावशाली घटक असलेल्या भारतीय समुदायाशी देखील ते संवाद साधणार आहेत. याशिवाय अनेक उद्योगांचे प्रमुख आणि जगभरातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही ते भेटणार आहेत.

सातव्या फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्हची संकल्पना "एक नवीन दिशादर्शक" अशी असून ती नवीन जागतिक व्यवस्थेवर केंद्रित आहे. या कार्यक्रमाला जगातील आघाडीचे गुंतवणूकदार, उद्योगजगतातील प्रमुख, धोरणकर्ते, संशोधक आणि गुंतवणूकदार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमाला येणारे सर्व मान्यवर विविध बैठकांच्या माध्यमातून नवीन बाजारपेठांचा शोध आणि त्यासंदर्भात चर्चा करतील तसेच आर्थिक वृद्धी आणि समृद्धीच्या प्रयत्नांना विचारमंथनातून  नवीन दिशा देतील.

सौदी अरेबिया हा भारताच्या महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे. दोन्ही देशांमधील व्यापाराने  2022-23 या आर्थिक वर्षात  52.75 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका उच्चांक गाठला. या अनुषंगाने सातव्या "फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह" मध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करून संयुक्त सहकार्य आणखी वाढवण्याची अपेक्षा आहे.

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1970045) Visitor Counter : 107