संरक्षण मंत्रालय
भारताच्या समृद्ध लष्करी संस्कृतीचा उत्सव: संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या पहिल्या वारसा महोत्सवाचे उद्घाटन
हा दोन दिवसीय महोत्सव देशातील युवकांना प्रेरित करेल : राजनाथ सिंग
लष्करी क्षेत्रातील भारताच्या प्राचीन सामरिक दृष्टिकोनाला आणि ज्ञानाला एकत्र करून स्वदेशी रणनीतीला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते ‘उद्भव’ प्रकल्पाचे उद्घाटन
Posted On:
21 OCT 2023 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 21, ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या पहिल्या वारसा महोत्सवाचे उदघाटन केले. गेल्या अनेक शतकांपासून परिसंवाद, कला, नृत्य, नाट्य, कथा कथन आणि प्रदर्शन यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली भारतीय लष्कराची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि वारसा साजरा करणे हे दोन दिवसीय महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. याद्वारे मुख्यत्वे करून प्रख्यात विद्वान, अभ्यासक आणि सेवेत असलेले तसेच सेवानिवृत्त अधिकारी यांच्या पॅनेल चर्चेच्या माध्यमातून विविध विषयांवरचे दृष्टिकोन आणि आकलन समजून घेतले जाईल.
या कार्यक्रमादरम्यान संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते प्रोजेक्ट उद्भव चे देखील उदघाटन झाले. लष्करी क्षेत्रातील भारताच्या प्राचीन सामरिक दृष्टिकोनाला आणि ज्ञानाला एकत्र करून समकालीन स्वदेशी रणनीतील चालना देण्यासाठी प्रोजेक्ट उद्भव आखण्यात आले आहे. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ टू चेअरमन, चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी (सीआयएससी) लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू आणि व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ व्हाइस अॅडमिरल संजय जसजित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताच्या सशस्त्र दलाने गेल्या काही दशकांमध्ये देशाच्या सुरक्षेच्या कार्यात बजावलेली अमूल्य भूमिका आणि त्यांचे अतुलनीय साहस दर्शवणारा भारतीय लष्करी वारसा महोत्सव देशातील तरुणांना प्रेरणा देईल, असे राजनाथ सिंग यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. तसेच भारतीय लष्कराबद्दल अधिक जाणून घेण्यासह त्यांची अफाट कामगिरी समजून घेण्यासाठी ते अधिक उत्सुकता दाखवतील, असे ते म्हणाले.
लष्कराचा वारसा महोत्सव
गेल्या अनेक शतकांपासून देशाला गौरवशाली लष्करी इतिहास आणि सामरिक संस्कृती लाभली असली तरी अनेक जण अजूनही त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. 21 व्या शतकात सशस्त्र दलांच्या विकासाच्या उद्दिष्टांचे पालन करताना हा महोत्सव परस्परसंवाद वाढवून लष्कराचा वारसा आणि इतिहास यांचा सामान्य माणसाशी परिचय करून देण्यात एक नवीन बेंचमार्क तयार करेल.
भारतीय लष्कराची संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा अभ्यास करण्याची जिज्ञासा वाढीस लावून आत्मनिर्भर भारत आणि मेक एन इंडिया उपक्रमांना अधिक पाठबळ देण्याच्या दिशेने हा महोत्सव उपयुक्त ठरेल. याशिवाय भारत आणि जगाच्या दृष्टीने सुरक्षा, धोरणात्मक आणि आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी विविध समकालीन मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ असेल.
या महोत्सवात लष्करी सिम्फनी बँड सादरीकरण आणि ब्रास बँड डिस्प्ले तसेच सांस्कृतिक गाला संध्याकाळ कार्यक्रम यासह लष्करी बँड च्या सादरीकरणाच्या माध्यमातून लष्करी संस्कृतीचे दर्शन होईल. याशिवाय सांस्कृतिक मंत्रालयाच्या भारतीय वारसा संस्थेच्या सहयोगाने देशाच्या दीर्घ आणि गौरवशाली अशा लष्करी इतिहासातील कामगिरी आणि निवडक टप्पे आणि यश साजरे करण्यासाठी एक प्रदर्शन आयोजित केले जात आहे.
प्रोजेक्ट ‘उद्भव’
या प्रकल्पाची आवश्यकता महत्वपूर्ण दृष्टिकोनावर आधारित आहे: सध्या अस्तित्वात असलेल्या लष्करी संकल्पना, ज्या जगभर वापरल्या जातात, त्या मुख्यत्वे पाश्चिमात्य देशातील लष्कराच्या गरजेनुसार संशोधित आणि विकसित केल्या आहेत. त्यामुळे त्या भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण, स्थानिक गरजा लक्षात घेत नाहीत तसेच भारतीय लष्कराच्या समृद्ध - सामरिक वारशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
आपले राष्ट्र हे प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखितांचा एक खजिना असून अत्याधुनिक, वैविध्यपूर्ण आणि संदर्भानुसार समृद्ध धोरणे, युद्ध आणि मुत्सद्देगिरी यांचे त्यात वर्णन केले आहे, हे या प्रकल्पाद्वारे भारतीय लष्कराला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे लष्कराच्या दृष्टीने स्वदेशी संकल्पनांचा वापर, सध्या अस्तित्वात असलेल्या युद्धनीती आणि रणनीतीला देशाच्या समृद्ध, गौरवशाली आणि विविधांगी अशा ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये असलेलया धोरणात्मक ज्ञानाची जोड देणे यादिशेने घेतलेली एक मोठी झेप ठरणार आहे.
‘उद्भव’ प्रकल्प स्वदेशी धोरणात्मक घडामोडींचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे. भारताच्या तात्विक आणि सांस्कृतिक वारशामध्ये अंतर्भूत असलेली धोरणात्मक शब्दसंग्रह आणि वैचारिक चौकट अलगद गुंफण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याशिवाय याद्वारे मजबूत, प्रगतीशील आणि भविष्यासाठी सज्ज अशा भारतीय लष्करामध्ये देशाच्या ऐतिहासिक लष्करी कौशल्याचे प्रतिबिंब दिसेल जे समकालीन युद्ध आणि मुत्सद्देगिरीच्या गरजा आणि गतिशीलतेशी सुसंगत आहे. हा प्रकल्प म्हणजे भारताचा सामरिक विचार आणि लष्करी इतिहासाच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि अनभिज्ञ खजिन्याचा शोध आणि प्रसार करण्यासाठी सखोल संशोधन, चर्चा, अभ्यास आणि उपक्रमांची मालिका आहे.
* * *
S.Tupe/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969769)
Visitor Counter : 200