राष्ट्रपती कार्यालय

महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 19 OCT 2023 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (19 ऑक्टोबर 2023 रोजी) बिहारमधील मोतीहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की महात्मा गांधींनी भारतात केलेल्या पहिल्या सत्याग्रहाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या विद्यापीठाचे ते विद्यार्थी आहेत. या विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी म्हणून ते सर्वजण जगभरात सन्मान्य असलेल्या अनमोल वारशाशी जोडले गेले आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

गांधीजींचा वारसा समजून घेऊन तो आत्मसात करण्यासाठी साधेपणा आणि सत्य यांचे उत्तम परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. साधेपणा आणि सत्य यांचा मार्ग हाच खरा आनंद, शांतता आणि प्रसिद्धी यांच्याकडे नेणारा मार्ग आहे यावर त्यांनी अधिक भर दिला. बापूंच्या शिकवणीनुसार मन, वाणी तसेच कृतीतून सत्याचा मार्ग अनुसरण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की गांधीजींनी अहिंसा, करुणा, नैतिकता आणि निःस्वार्थी सेवा या आदर्शांवर लोकांचा असलेला विश्वास आणखी वाढवला. त्यांनी आपला समाज, राजकारण आणि अध्यात्म यांना भारतीयत्वाशी दृढतेने जोडले.जागतिक समुदायातील अनेक लोक गांधीजींना भारताचे मूर्त रुप मानतात असे त्या म्हणाल्या.

ऐतिहासिक चंपारण्य सत्याग्रहाचा देखील आपल्या समाजमनावर खोलवर परिणाम झाला याकडे राष्ट्रपतींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्या चळवळीदरम्यान, जातीभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र स्वयंपाक करून एकत्र भोजन करण्यास सुरुवात केली.राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले की सुमारे 106 वर्षांपूर्वी गांधीजींच्या सांगण्यावरून चंपारण्यातील लोकांनी सामाजिक समानता आणि एकात्मतेचा मार्ग स्वीकारला आणि ब्रिटीश सत्तेला झुकण्यास  भाग पाडले. आजच्या काळात देखील सामाजिक समानता आणि एकात्मतेचा हाच मार्ग आपल्याला आधुनिक आणि विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत करेल असे मत राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा 

 

* * *

R.Aghor/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1969115) Visitor Counter : 105