पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 17 OCT 2023 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2023

 

नमस्कार, जगभरातून आलेले अतिथिगण, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, महाराष्ट्र, गोव्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, अन्य मान्यवर, स्त्री आणि पुरुष गण,

तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी 2021 मध्ये जेव्हा आपण भेटलो होतो, तेव्हा कोविड महामारीच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण जग  त्रस्त झाले होते. कुणालाही माहीत नव्हते की कोरोना नंतरचे जग कसे असेल. मात्र आज एक नवीन जागतिक व्यवस्था आकार घेत आहे आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेत संपूर्ण जग भारताकडे नव्या आशेने पाहत आहे.  आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. आपण सर्वजण जाणतो की जगातील बहुतांश व्यापार सागरी मार्गाने होतो. कोरोना पश्चात काळात आज जगालाही विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळीची गरज आहे. म्हणूनच यंदाची  जागतिक भारतीय सागरी परिषद अतिशय  महत्वपूर्ण आहे.

मित्रहो,

भारताची  सागरी क्षमता मजबूत असून देशाला आणि जगाला त्याचा नेहमीच फायदा झाला आहे याला  इतिहास साक्षीदार आहे. याच विचाराने गेल्या  9-10 वर्षांपासून आम्ही हे क्षेत्र बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहोत. अलिकडेच, भारताच्या पुढाकाराने असे एक पाऊल उचलण्यात आले आहे , ज्यात 21 व्या शतकात जगभरातील सागरी उद्योगाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य आहे. जी -20 शिखर परिषदेदरम्यान भारत-मध्य पूर्व- युरोप आर्थिक कॉरिडॉरवर ऐतिहासिक सहमती झाली. शेकडो वर्षांपूर्वी  रेशीम मार्गाने (सिल्क रुट) जागतिक व्यापाराला गती दिली होती, हा मार्ग जगातील अनेक देशांच्या विकासाचा आधार बनला होता. आता हा ऐतिहासिक कॉरिडॉरही प्रादेशिक आणि जागतिक व्यापाराचे चित्र बदलून टाकेल. नव्या पिढीचे भव्य बंदर (नेक्स्ट जनरेशन मेगा पोर्ट), आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्स-शिपमेंट बंदर, बेटांचा विकास, अंतर्देशीय जलमार्ग आणि बहुआयामी केंद्रांचा विस्तार अशी अनेक मोठी कामे या योजनेअंतर्गत केली जातील. या कॉरिडॉरमुळे व्यवसाय खर्चात कपात होईल, दळणवळण कार्यक्षमता सुधारेल,  पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल आणि मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण होतील. या मोहिमेत भारताबरोबर सहभागी होण्याची गुंतवणूकदारांना उत्तम संधी आहे.

मित्रहो,

पुढील 25 वर्षांत विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आजचा भारत काम करत आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणत आहोत. भारताच्या सागरी पायाभूत सुविधांची संपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी निरंतर काम करत आहोत. मागील एक दशकात भारतातील प्रमुख बंदरांची क्षमता दुप्पट झाली आहे . कंटेनर जहाजांचा बंदरातील हाताळणीचा वेळ 9-10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये अंदाजे 42 तास होता, तो 2023 मध्ये  24 तासांपेक्षा कमी झाला आहे . बंदरांची संपर्क व्यवस्था वाढवण्यासाठी आम्ही हजारो किलोमीटरचे नवे रस्ते बांधले. सागरमाला प्रकल्पाद्वारे आमच्या  किनारी भागातील पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. या प्रयत्नांमुळे रोजगाराच्या संधी आणि राहणीमान सुलभता अनेक पटींनी वाढवत आहोत.

मित्रहो,

"समृद्धीसाठी बंदरे आणि प्रगतीसाठी बंदरे' ही सरकारची दूरदृष्टी प्रत्यक्षात परिवर्तनात्मक बदल घडवून आणत आहे. मात्र आमच्या कामाने 'उत्पादकतेसाठी बंदरे' या मंत्रालाही चालना दिली आहे. आर्थिक उत्पादकता वाढवण्यासाठी आमचे  सरकार दळणवळण क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि प्रभावी बनवत आहे. भारत आपल्या किनारी नौवहन मार्गांचेही आधुनिकीकरण करत आहे.

किनारपट्टीवरील मालवाहतूक गेल्या दशकात दुप्पट झाली आहे आणि यामुळे लोकांना किफायतशीर लॉजिस्टिक पर्यायही उपलब्ध होत आहेत. देशांतर्गत जलमार्गांच्या विकासामुळे भारतातही मोठा बदल होत आहे.गेल्या दशकात, राष्ट्रीय जलमार्गावरील माल हाताळणीत जवळपास 4 पट वाढ झाली आहे. आमच्या प्रयत्नांमुळे, लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकामधील  भारताची क्रमवारी  गेल्या 9 वर्षांत सुधारली आहे.

मित्रांनो,

जहाज बांधणी आणि दुरुस्ती क्षेत्रावरही आम्ही मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. आपली  स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस  विक्रांत ही भारताच्या सामर्थ्याची   आणि क्षमतेची साक्ष आहे. पुढील दशकांमध्ये भारत जगातील पाच अव्वल  जहाज बांधणी राष्ट्रांपैकी एक होणार आहे.आपला  मंत्र आहे: मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड आम्ही सागरी क्लस्टर्सच्या विकासाद्वारे जहाजबांधणीतील हितसंबंधितांना  एकत्र आणण्याच्या एकात्मिक दृष्टिकोनावर काम करत आहोत.आगामी काळात देशात अनेक ठिकाणी जहाज बांधणी आणि दुरुस्ती केंद्रे विकसित करणार आहोत. जहाज पुनर्वापराच्या क्षेत्रात भारत आधीच जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपली प्रमुख बंदरे कार्बन उत्सर्जन शून्य करण्याच्या दृष्टीने, भारत सागरी क्षेत्रात निव्वळ शून्य उत्सर्जन धोरणावर काम करत आहे. जिथे नील अर्थव्यवस्था हा हरित पृथ्वी बनण्याचे साधन असेल अशा भविष्याकडे आपण वाटचाल करत आहोत.

मित्रांनो,

जगातील सर्वात मोठे सागरी परिचालक भारतात यावेत आणि भारतातून परिचालन करावे  यासाठी भारतात वेगाने काम केले जात आहे.गुजरातच्या आधुनिक गिफ्ट सिटीने एक प्रमुख आर्थिक सेवा म्हणून जहाज भाडेतत्वाववर देणे सुरू केले आहे.गिफ्ट आयएफएससीच्या माध्यमातून  जहाज भाड्याने देणाऱ्या कंपन्यांना अनेक प्रकारच्या सवलती देखील दिल्या जात आहेत. मला आनंद आहे की,  जहाज भाड्याने देणाऱ्या जागतिक  4  कंपन्यांनी गिफ्ट  आयएफएससीच्या  मध्ये नोंदणी देखील  केली आहे. मी या शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या इतर जहाज भाड्याने देणाऱ्या कंपन्यांनाही गिफ्ट आयएफएससीशी जोडले जाण्यासाठी आवाहन करेन.

मित्रांनो,

भारताला विस्तीर्ण किनारपट्टी, बळकट  नदीपात्र परिसंस्था  आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हे सर्व मिळून सागरी पर्यटनासाठी  एक नवीन संधी निर्माण करतात. भारतातील सुमारे 5 हजार वर्षे जुनी असलेली  लोथल गोदी हा एक जागतिक वारसा आहे. एक प्रकारे, लोथल हे नौवहनाचे  उगमस्थान  आहे.हा जागतिक वारसा जतन करण्यासाठी, लोथलमध्ये राष्ट्रीय सागरी वारसा संकुल देखील बांधले जात आहे. लोथल मुंबईपासून फार दूर नाही.  एकदा लोथलला भेट देण्याची मी तुम्हाला आवाहन करतो.

मित्रांनो,

सागरी पर्यटन वाढवण्यासाठी आपण जगातील सर्वात मोठी नदी क्रूझ सेवाही सुरू केली आहे. भारत आपल्या वेगवेगळ्या बंदरांवर याच्याशी संबंधित अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. मुंबईत नवीन आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल बांधले जात आहे.या वर्षी आम्ही विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे असे आधुनिक क्रूझ टर्मिनल्सही बांधले आहेत. भारत त्याच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांद्वारे जागतिक क्रूझ केंद्र  बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मित्रांनो,

विकास, लोकसंख्या, लोकशाही आणि मागणी यांचा मिलाफ असलेल्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे.ज्यावेळी भारत 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे, तेव्हा तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. मी पुन्हा एकदा जगभरातील तुम्हा सर्व गुंतवणूकदारांना भारतात येण्यासाठी आणि विकासाच्या मार्गावर आमच्यासोबत वाटचाल करण्यासाठी आमंत्रित करतो.आम्ही एकत्र वाटचाल करूया , आपण एकत्र एक नवीन भविष्य घडवूया, खूप खूप धन्यवाद.

 

* * *

Jaydevi PS/Sushma/Sonal C/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968919) Visitor Counter : 124