अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
भारत ही एक झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून येथे विशेषतः अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या अपार संधी उपलब्ध आहेत यावर केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी भर दिला
वर्ल्ड फूड इंडिया-2023 ची दुसरी आवृत्ती नवी दिल्लीत येत्या 3 ते 5 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार
Posted On:
18 OCT 2023 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2023
भारत ही एक झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था असून येथे विशेषतः अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या अपार संधी उपलब्ध आहेत असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी म्हटले आहे. वर्ल्ड फूड इंडिया-2023 संदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की वर्ल्ड फूड इंडिया म्हणजे या क्षेत्रातील जागतिक हितधारकांसमोर आपल्या क्षमता मांडण्याचा एक प्रयत्न आहे, संपूर्ण सरकार हा दृष्टिकोन अनुसरून आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे एक अनोखे उदाहरण असून यामध्ये 11 केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि त्यांच्याशी संबंधित स्वायत्त संस्था सहभागी होत आहेत.
आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तसेच 16 राष्ट्रांमधील प्रदर्शकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संमती दिली आहे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी आणखी काही भागधारक सहभागी होण्याची शक्यता आहे, असे पटेल यांनी सांगितले.

या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व दिसून येईल आणि सुमारे 10 देशांचे परराष्ट्र मंत्री आणि अधिकृत शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वाणिज्य विभागाच्या सहकार्याने आणि संबंधित कमोडिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वेगळ्या प्रकारच्या ग्राहक आणि विक्रेता बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले असून यामध्ये 75 देशातील सुमारे 1000 परदेशी नागरिक सहभागी होतील असा अंदाज आहे. एकंदरीतच या कार्यक्रमात 900 हुन अधिक प्रदर्शक सहभागी होतील असे पटेल यांनी सांगितले.
जागतिक भव्य अन्न महोत्सव कार्यक्रमाची दुसरी आवृत्ती, वर्ल्ड फूड इंडिया 2023, नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 3 ते 5 नोव्हेंबर 2023 दरम्यान अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (MoFPI) आयोजित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील प्रतिष्ठित भारत मंडपम येथे 3 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे, यावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 नोव्हेंबर रोजी समारोपाच्या सत्राला संबोधित करतील. वर्ल्ड फूड इंडियाच्या या आवृत्तीत नेदरलँड्स ‘भागीदार राष्ट्र’ असेल, तर जपान आणि व्हिएतनाम हे ‘फोकस कंट्री-विशेष राष्ट्रे’ आहेत.

ख्यातनाम शेफ रणवीर ब्रार यांनी आखलेला एक्सपेरिअन्शिअल फूड स्ट्रीट, खाद्यप्रेमी आणि उद्योग व्यावसायिकांसाठी मुख्य आकर्षण ठरेल. याची विभागणी तीन भागांमध्ये केली असून श्री अन्न किंवा भरड धान्य वापरून केलेले पौष्टिक पदार्थ, देशातील सर्व भागांमधील खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या दालनाची सफर, स्ट्रीट फूड तसेच भारताच्या शाही पाककृती वारशातील अन्नपदार्थ यांची रेलचेल असणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात जागतिक विक्रम घडवण्याच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा डोसा बनवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद करण्याच्या दृष्टीने आयोजन सुरु आहे. श्री अन्नाने बनवलेला सुमारे 100 फूट लांब मिलेट डोसा बनवण्यासाठी 60 ते 80 शेफ एकत्र येणार असून त्याद्वारे समर्पण आणि सांघिक भावना यांचे कौशल्य दिसून येईल.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करण्यासाठी, भरड धान्ययुक्त शीतपेयांचे 50,000 टेट्रा-पॅक कंटेनर तयार केले जाणार असून ते वंचित घटकातील मुलांना वितरित केले जातील. या तीन दिवसांमध्ये सुमारे 75,000 लोक या कार्यक्रमाला भेट देतील अशी अपेक्षा असून त्यांना संगीत आणि नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आस्वाद घेता येणार आहे. वर्ल्ड फूड इंडिया 2023 च्या यशस्वी आयोजनामुळे जगभरातील तत्सम भव्य दिव्य कार्यक्रमांच्या बरोबरीने देशात देखील ग्लोबल फूड इव्हेंट साजरा होईल.
* * *
S.Tupe/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1968904)