रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने विवाद से विश्वास II (कंत्राटी विवाद) साठी मोहीम घेतली हाती
Posted On:
14 OCT 2023 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम निर्माते महासंघापुढील समस्यांचे निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. सर्व पात्र दाव्यांना मार्गी लावण्याच्या उद्दिष्टासह विवाद से विश्वास II मोहीम अभियान स्तरावर राबविण्यावर यावेळी सहमती झाली. सर्व कंत्राटदारांनी 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांचे दावे दाखल करावेत, अशी विनंती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम निर्माते महासंघाला करण्यात आली.
वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या, विवाद से विश्वास दोन (कंत्राटी विवाद) योजनेमध्ये कंत्राटदारांना देऊ केलेल्या तडजोड रकमेची पूर्तता करण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया / पद्धती दिल्या आहेत आणि जिथे दाव्याची रक्कम 500 कोटी रुपये किंवा त्याहून कमी आहे, अशा प्रकरणी मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून दावा केला असेल तर खरेदी करणाऱ्या संस्थांना तो दावा स्वीकारावा लागेल. दावा 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास, सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने कारणे नोंदवून कंत्राटदाराकडून तडजोड किंवा सेटलमेंटची विनंती न स्वीकारण्याचा निर्णय घेता येईल. दावे 31.10.2023 पर्यंत GeM पोर्टलवर सादर करायचे आहेत.
सध्याची मार्गदर्शक तत्त्वे अशा सर्व प्रकरणांच्या विवादांना लागू असतील जिथे न्यायालय/प्राधिकरणाने हा निवाडा केवळ आर्थिक मूल्यासाठी दिला आहे आणि लवादाचा निवाडा 31.01.2023 पर्यंत जारी केला असेल किंवा न्यायालयाने 30.04.2023 पर्यंत निवाडा दिला असेल.
जुन्या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी विवाद से विश्वास योजना राबवत असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव, अनुराग जैन यांनी सांगितले. या योजनेमुळे खेळते भांडवल मुक्त होण्यास आणि नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967707)
Visitor Counter : 121