विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

दिल्ली औषधनिर्मिती आणि संशोधन केंद्रात 13 ऑक्टोबर 2023 रोजी “सीआरटीडीएचएस एम्पॉवरिंग एमएसएमईज” या विषयावरील चिंतन शिबिराचे उद्घाटन होणार


केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या सहकार्याने दिल्ली विद्यापीठातर्फे (डीपीएसआरयु) शिबिराचे आयोजन

Posted On: 12 OCT 2023 2:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023


उद्योगांच्या संशोधन आणि विकास कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (डीएसआयआर) विविध कार्यक्रम राबवत असते आणि त्यातून जागतिक पातळीवरील उच्च व्यावसायिक मूल्यांच्या अत्याधुनिक स्पर्धात्मक तंत्रज्ञानांचा विकास करण्यासाठी औद्योगिक एककांना मदत करत असते. यामुळे प्रयोगशाळेच्या पातळीवरील संशोधन आणि विकास कार्याच्या जलद व्यावसायीकीकरणाला चालना मिळते, तंत्रज्ञान हस्तांतरण तंत्रज्ञानाला मदत होते, एकंदर निर्यातीतील तंत्रज्ञानावर भर असलेल्या मालाच्या निर्यातीचा वाटा वाढतो, औद्योगिक विचारमंथन बळकट होते आणि देशातील वैज्ञानिक तसेच औद्योगिक संशोधन अधिक सोयीचे व्हावे यासाठी वापर करण्यास सोपे असे माहितीचे जाळे निर्माण करता येते.

देशभरात योग्य पद्धतीच्या विकासाला प्रोत्साहन देऊन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) भारताच्या समग्र अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच, या एमएसएमईजना सरकारी अनुदानातून चालणाऱ्या संशोधन आणि विकास कार्याचे रुपांतर उत्पादने आणि प्रक्रियांमध्ये करण्यासाठी जागरूक करणे गरजेचे आहे. याच ध्येयाचा मार्ग धरत, डीएसआयआरने वर्ष 2014 पासून  सामायिक संशोधन आणि तंत्रज्ञान विकास केंद्रे (सीआरटीडीएचएस) या सरकारी कार्यक्रमाअंतर्गत एमएसएमई समूहांच्या जवळ तसेच त्यांच्याशी संबंधित सरकारी अनुदानित संस्थांमध्ये सीआरटीडीएचएस राबवत आहे. आतापर्यंत देशभरात स्थापन झालेली 18 सीआरटीडीएचएस केंद्रे, एमएसएमई उद्योगांना तसेच संशोधन संस्थांना अत्याधुनिक संशोधन आणि विकास सुविधा पुरवत असून त्यातून वैज्ञानिक ज्ञान आणि कल्पना यांचे नवी उत्पादने तसेच प्रक्रियांमध्ये रुपांतर करत आहे. एमएसएमई, संशोधक आणि स्टार्ट अप उद्योग यांना या सुविधांचा उपयोग होतो आहे.

“स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” उपक्रमाचा एक भाग म्हणून तसेच “आत्मनिर्भर भारत”साकारण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासादरम्यान तसेच सीआरटीडीएचएस आणि एमएसएमई/संशोधक/स्टार्ट अप उद्योग यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्यासाठी डीएसआयआरने देशभरात स्थापन झालेल्या सर्व सीआरटीडीएचएसमध्ये “चिंतन शिबिर - सीआरटीडीएचएस एम्पॉवरिंग एमएसएमईज” चे आयोजन केले आहे. यापैकी, आयआयटी-खरगपूर, सीएसआयआर-आयआयटीआर, लखनौ, सीएसआयआर-सीएमईआरआय दुर्गापुर आणि सीएसआयआर-आयएमएमटी भुवनेश्वर येथे यापूर्वीच चिंतन शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, यातील पाचवे शिबीर  13 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील दिल्ली औषधनिर्मिती आणि संशोधन विद्यापीठ (डीपीएसआरयु) येथे आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात डीपीएसआरयुचे उपकुलगुरु प्रा.रमेश के.गोयल यांच्या संबोधनाने होणार असून ते डीपीएसआरयु आणि डीपीएसआरयु- सीआरटीडीएच यांच्या संकल्पनांबद्दल बोलणार आहेत. त्यानंतर, डीएसआयआरचे सचिव आणि सीएसआयआरचे महासंचालक डॉ.एन.कलाईसेल्वी यांचे उद्घाटनपर भाषण होईल. या उद्घाटनपर सत्रात, त्यानंतर, वैज्ञानिक-जी आणि सीआरटीडीएच, डीएसआयआर प्रमुख डॉ.सुजाता चकलनोबीस यांचे चिंतन शिबिराविषयी विचार मांडणारे भाषण होईल. डीपीएसआरयुचे रजिस्ट्रार प्रा.(डॉ.)हरविंदर पोपली आणि डीपीएसआरयुमधील सीआरटीडीएच प्रकल्प समन्वयक प्रा.गीता अगरवाल यांची देखील भाषणे होणार आहे. या शिबिरात, डीएसआयआरच्या सीआरटीडीएच योजना विभागातील डॉ.विपिन सी शुक्ला, डॉ. रणजीत बैरवा आणि डॉ.सुमन मझुमदार यांच्यासह डीपीएसआरयु तसेच डीपीएसआरयुमधील नवोन्मेष आणि चिंतन संस्थेच्या संघातील सीआरटीडीएच पथकाचे सदस्य देखील उपस्थित राहणार आहेत. संशोधन आणि विकास कार्यात सीआरटीडीएचच्या होणाऱ्या लाभांची माहिती करून घेण्यासाठी या शिबिरामध्ये एमएसएमई उद्योग, स्टार्ट अप उद्योग तसेच औद्योगिक संघटना यांचे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत. उद्घाटनपर सत्रानंतर, उपस्थित सदस्य प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेटी देतील.

“संशोधन आणि विकास कार्यासाठी तसेच उत्पादनासाठी एमएसएमई उद्योगांना सीआरटीडीएचतर्फे पाठबळ यंत्रणेची उभारणी” या विषयावर गटचर्चांना सुरुवात होईल. वैज्ञानिक -एफ आणि सीआरटीडीएच, डीएसआयआर चे सदस्य सचिव डॉ.विपिन सी.शुक्ला या चर्चेचे संचालन करतील. या चर्चांमध्ये सहभागी प्रतिनिधी एमएसएमई उद्योगांपुढील आव्हाने समजून घेऊन त्यावरील उपायांची चर्चा करताना समस्या सोडवण्याचे साधन म्हणून संशोधन आणि विकास कार्याच्या जोपासनेवर अधिक भर देतील.सरकारच्या ध्येयांना अनुसरून,नवी धोरणे, कार्यक्रम तसेच उपक्रम यांचे विकसन तसेच अंमलबजावणीसाठी योगदान देऊ शकणाऱ्या नवीन संकल्पना, विचार आणि दृष्टीकोन मांडणे हा या शिबिराच्या आयोजनामागील उद्देश आहे. एमएसएमई, स्टार्ट अप्स आणि उद्योगांना क्षमता वाढवणे, उत्पादकतेमध्ये सुधारणा करणे तसेच किफायतशीर आरोग्य सुविधांच्या क्षेत्रातील नवोन्मेष पुढे नेणे यासाठी सीआरटीडीएचमध्ये उपलब्ध स्रोतांचा वापर कसा करून घेता येईल यादृष्टीने हे शिबीर मंच उपलब्ध करून देईल. या शिबिरात आयोजित विविध सत्रांतून एमएसएमई आणि इतर भागधारकांना सक्षम करण्यात सीआरटीडीएचची भूमिका अधोरेखित करण्यात येणार असून त्याद्वारे संशोधनविषयक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञाने, भविष्यवेधी तंत्रज्ञाने आणि देशात त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या संधींची माहिती करून दिली जाईल.

समग्रपणे विचार करता, सखोल चर्चा, परखड विश्लेषण आणि धोरणात्मक नियीजनाच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, डीपीएसआरयु आणि इतर भागधारकांची  सूज्ञता, माहिती आणि तज्ञता यांचा एकत्रितपणे वापर करणे हे या कार्यक्रमाचे ध्येय असेल. देशातील एमएसएमई, स्टार्ट अप्स आणि संशोधकांसमोर उभी राहणारी आव्हाने सोडविण्यासाठी संभाव्य उपायांबाबत सखोल विचारमंथन करण्याचा उद्देश या शिबिराच्या आयोजनातून साध्य होणार आहे. तसेच किफायतशीर आरोग्यसेवा क्षेत्रातील औद्योगिक संशोधन आणि उत्पादन यासाठीचे प्रमुख जागतिक केंद्र म्हणून देशाला स्थापित करण्यासाठीच्या संधींचा वापर करून घेण्यासाठी देखील हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे.

N.Meshram/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967003) Visitor Counter : 98


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil