राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची काश्मीर विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती
Posted On:
11 OCT 2023 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 ऑक्टोबर, 2023) श्रीनगर येथे काश्मीर विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, काश्मीरच्या जबाबदार तरुणांचा देशाला अभिमान आहे. काश्मीर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर सामाजिक सेवेतही सक्रीय सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. असे करून ते सामाजिक बदल घडवून आणू शकतात आणि इतरांसमोर आपला आदर्श ठेवू शकतात, असे त्या म्हणाल्या. माजी विद्यार्थ्यांनी देशसेवा करून या विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आपले तरुण जेवढे शिक्षणाच्या आणि शांततेच्या प्रकाशमय दिशेने वाटचाल करतील, तेवढा आपला देश प्रगती करेल. ज्या समाजाचा आणि देशाचा युवक विकास आणि शिस्तीचा मार्ग अवलंबतो, तो समाज आणि देश प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जातो, असेही त्या म्हणाल्या.
काश्मीर विद्यापीठात 55 टक्के मुली आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करून त्या म्हणाल्या की, या विद्यार्थिनी आपला देश आणि देशाच्या भविष्याचे चित्र दर्शवतात. 'नारी शक्ती वंदन कायदा' 2023 हा आपल्या देशातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काश्मीर विद्यापीठाने हिमालयीन परीसंस्थेचे जतन करण्यासाठी सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान प्रणालीवर भर देण्यात आला असून, आपल्या तरुणांना त्याबद्दल चांगली माहिती मिळाली, तर त्यांना त्यामध्ये अनेक प्रेरणादायी उदाहरणे दिसून येतील. त्या म्हणाल्या की, आपल्या देशात ज्ञान आणि विज्ञानाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात अनमोल खजिना दडला आहे. आजच्या काळात, टप्प्याटप्प्याने विकसित होत गेलेल्या या ज्ञान प्रणालींचा पुन्हा वापर करण्याचे मार्ग शोधणे, ही शैक्षणिक जगताची जबाबदारी आहे.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1966813)
Visitor Counter : 106