विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि धोरण संशोधन संस्थेने साजरा केला 82 वा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद स्थापना दिवस
Posted On:
11 OCT 2023 4:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2023
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि धोरण संशोधन संस्थेने (सीएसआयआर-एनआयएससीपीआरने) 10 ऑक्टोबर 2023 रोजी सीएसआयआर-एनआयएससीपीआर प्रांगणात सीएसआयआरचा 82 वा स्थापना दिवस साजरा केला. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक आणि एनर्जी स्वराज मूव्हमेंटचे संस्थापक प्रा.चेतन सिंग सोलंकी ( सोलर मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जातात ) यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एनआयएससीपीआरच्या संचालक प्रा.रंजना अग्रवाल यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करुन कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
त्यांनी यावेळी सीएसआयआर स्थापना दिनाची माहिती दिली.सर्व सीएसआयआर प्रयोगशाळांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत एकत्रितपणे त्यांच्या उद्दीष्टपूर्तीचे प्रदर्शन केले या अर्थाने यंदाचा स्थापना दिवस अद्वितीय होता असे त्या म्हणाल्या. देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये सीएसआयआर प्रयोगशाळांची भूमिका आणि आत्मनिर्भर भारतासाठी त्या कसे योगदान देत आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकला.

यानंतर प्रमुख पाहुणे प्रा.चेतनसिंग सोळंकी यांचे व्याख्यान झाले. हवामान बदल आणि सुधारात्मक कृतींचे सहा-मुद्द्यांचे आकलन हे व्याख्यानाचे शीर्षक होते. प्रा सोळंकी यांनी उपस्थितांसमोर ऊर्जा संवर्धनावरील अमूल्य ज्ञान सामायिक केले. ऊर्जा वापरण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे हवामान बदलासारख्या समस्या निर्माण होत आहेत असे ते म्हणाले. उर्जेचा विवेकपूर्वक वापर करण्याचा मंत्र देखील त्यांनी दिला. त्यांनी याला ए जी एम (टाळा, कमी करा आणि निर्माण करा) दृष्टिकोन असा संदर्भ दिला. आपण अनावश्यकपणे वापरतो किंवा आपल्या घरातील सहज टाळू शकतो अशा एक तृतीयांश ऊर्जेचा वापर टाळला पाहिजे, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरून उर्जेचा अपव्यय कमी करायला हवा आणि शेवटी, एक तृतीयांश ऊर्जा निर्माण करायला हवी. अशा प्रकारे आपण उर्जेची बचत करू शकतो आणि त्याद्वारे हवामान बदलासारख्या मोठ्या समस्यांना तोंड देऊ शकतो असे ते म्हणाले. ऊर्जा संवर्धनाच्या संपूर्ण योजनेत व्यक्ती म्हणून आपण बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.

सीएसआयआर स्थापना दिनाचे व्याख्यान देताना प्रमुख पाहुणे प्रा चेतनसिंह सोलंकी
या प्रतिष्ठित वक्त्यांव्यतिरिक्त, कार्यक्रमात अनेक प्रमुख उपक्रम देखील राबवण्यात आले:
- पुस्तक प्रकाशन: सीएसआयआर-एनआयएससीपीआर ची विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान धोरण क्षेत्रातील कामगिरी तसेच योगदान प्रदर्शित केलेला सीएसआयआर-एनआयएससीपीआरचा पहिला द्वैवार्षिक अहवाल (2021-2023) प्रमुख पाहुणे आणि एनआयएससीपीआर संचालकांच्या हस्ते संयुक्तपणे प्रकाशित करण्यात आला. या व्यतिरिक्त, डॉ सुकन्या दत्ता यांच्या ‘वार्षिक प्रवास: स्थलांतराची जादू’ या शीर्षकाच्या आणखी एका पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
- सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार: गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या यशाचा आधार आहेत आणि ज्यांनी सेवेची 25 वर्षे पूर्ण केली आहेत अशा एनआयएससीपीआरच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला,
- सांस्कृतिक कार्यक्रम: सीएसआयआर-एनआयएससीपीआरच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यी आणि कर्मचार्यांच्या आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, नृत्य आणि इतर कलात्मक सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
- पारितोषिक वितरण: सीएसआयआर-एनआयएससीपीआर कुटुंबातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी, या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

विजेते त्यांच्या बक्षिसांसह
सीएसआयआर स्थापना दिवस हा केवळ त्याच्या भूतकाळातील यशस्वी कामगिरीचा उत्सव नाही तर नवोन्मेष, उत्कृष्टता आणि चिकाटीच्या आशादायक भविष्याची झलक आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या ध्येय आणि मूल्यांप्रती कायम असलेल्या वचनबद्धतेची आठवण करून देतो.
पूर्वीच्या सीएसआयआर-राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि माहिती संसाधन संस्था (सीएसआयआर-एनआयएससीएआयआर), नवी दिल्ली आणि पूर्वीचे सीएसआयआर- राष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास अभ्यास संस्था (सीएसआयआर-एनआयएसटीएडीएस), नवी दिल्ली. यांच्या विलीनीकरणासह सीएसआयआर-राष्ट्रीय विज्ञान दूरसंवाद आणि धोरण संशोधन संस्था (सीएसआयआर-एनआयएससीपीआर),नवी दिल्ली 2021 मध्ये अस्तित्वात आली. ही भारतातील एक प्रमुख संशोधन संस्था आहे. विज्ञान संप्रेषण आणि धोरण अभ्यास क्षेत्रात ती विशेष मानली जाते. अनेक संशोधन निबंध संस्था प्रकाशित करते. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विविध विषयांचा समावेश आहे.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1966670)
Visitor Counter : 144