संसदीय कामकाज मंत्रालय
नवी दिल्ली येथे 9 व्या जी 20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेचे (पी -20) आयोजन; पंतप्रधानांच्या हस्ते 13 ऑक्टोबर रोजी होणार उदघाटन
जी -20 देशांव्यतिरिक्त, इतर 10 देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था या शिखर परिषदेत सहभागी होतील: लोकसभा अध्यक्ष
संपूर्ण आफ्रिकन संसदेचे अध्यक्ष प्रथमच पी -20 कार्यक्रमाला राहणार उपस्थित
12 ऑक्टोबर रोजी लाईफ (LiFE) संदर्भात संसदीय मंचाचे आयोजन
Posted On:
06 OCT 2023 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत द्वारका येथे नव्याने बांधलेल्या भारत आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्रात (आयआयसीसी) 13 ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 9वी जी -20 संसदीय अध्यक्षांची शिखर परिषद (पी -20) आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबर 2023 रोजी शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
जी -20 देशांव्यतिरिक्त, अन्य 10 देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था या शिखर परिषदेत सहभागी होतील आणि आतापर्यंत 26 राष्ट्राध्यक्ष 10 उपराष्ट्राध्यक्ष , 01 समिती अध्यक्ष आणि आयपीयू अध्यक्षांसह 50 संसद सदस्य आणि 14 महासचिवांनी या परिषदेत सहभागी होण्याविषयी संमती दिली आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. ,संपूर्ण आफ्रिकन संसदेचे अध्यक्ष प्रथमच भारतात होणाऱ्या पी--20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत, असे बिर्ला यांनी सांगितले.
'वसुधैव कुटुंबकम् - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या भावनेने, भारताचे उद्दिष्ट हे अधिक समावेशक, शांततापूर्ण आणि न्याय्य जगाच्या दिशेने जटील जागतिक समस्यांवर सहमती-आधारित उपाय प्रदान करण्याचे आहे, असे ओम बिर्ला यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बिर्ला यांनी माहिती दिली की , पी-20 शिखर परिषदेदरम्यान चार उच्चस्तरीय सत्रे आयोजित केली जातील:
• शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेला गती देणे
• शाश्वत ऊर्जा संक्रमण
• महिलांच्या नेतृत्वाखालील विकास
• सार्वजनिक डिजिटल मंचाद्वारे लोकांच्या जीवनात परिवर्तन
ही सत्रे "पी -20 ची उद्दिष्टे संसद प्रभावीपणे कशाप्रकारे पुढे नेऊ शकते " यावर विस्तृत चर्चा करण्यासाठी जी -20 सदस्य आणि अतिथी देशांना एकत्र आणतील. समता, सर्वसमावेशकता आणि शांतता यावर आधारित प्रमुख जागतिक आव्हानांवर उपाय प्रदान करण्यासाठी जी -20 सरकारांना आवाहन करणाऱ्या संयुक्त निवेदनाने शिखर परिषदेचा समारोप होईल, अशी माहिती बिर्ला यांनी दिली.
शिखर परिषदेपूर्वी 12 ऑक्टोबर 2023 रोजी लाईफ ( LiFE ) (पर्यावरणस्नेही जीवनशैली) अभियानाअंतर्गत एक संसदीय मंच आयोजित केला जाईल. गेल्यावर्षी 20 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी , गुजरातमधील केवडिया येथे लाईफ अभियानाचा प्रारंभ केला होता. हा उपक्रम पर्यावरणाविषयी जागरूक जीवनशैली आणि 'कमी वापर , पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया ' या तत्त्वावर आधारित शाश्वत विकासासाठी प्रभावीपणे कार्य करत आहे.
शिखर परिषदेदरम्यान, भारताच्या प्राचीन आणि सहभागात्मक लोकशाही परंपरांना अधोरेखित करण्यासाठी 'लोकशाहीची जननी ' प्रदर्शन देखील आयोजित केले जाईल.
***
S.Bedekar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965158)
Visitor Counter : 181