पंतप्रधान कार्यालय

मध्यप्रदेशात जबलपूर इथे पंतप्रधानांच्या हस्ते, 12600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासप्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


जबलपूर इथे ‘वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यानाचे केले भूमिपूजन

वीरांगना राणी दुर्गावतीच्या 500 व्या जयंतीनिमित्त विशेष नाण्याचे अनावरण

प्रधानमंत्री आवास योजना -नागरीच्या लाईट हाऊस प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या 1000 पेक्षा जास्त घरांचे उद्घाटन

जल जीवन अभियानाअंतर्गत, मंडला, जबलपूर आणि दिंडोरी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पायाभरणी तर सिवनी जिल्ह्यातील जलजीवन प्रकल्पाचे लोकार्पण

मध्यप्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठीच्या 4800 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी

1850 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

विजयपूर -औरैयान -फुलपूर पाइपलाइन प्रकल्पाचे लोकार्पण

मुंबई नागपूर झारसुगुडा पाइपलाइन प्रकल्पाच्या नागपूर जबलपूर विभागाची (317 किमी) पायाभरणी आणि जबलपूरमधील नवीन बॉटलिंग प्लांटचे लोकार्पण

राणी दुर्गावती आपल्याला लोकांच्या कल्याणासाठी जगण्याची आणि मातृभूमीसाठी कार्य करण्याची शिकवण देते

“गेल्या काही आठवड्यांत, उज्ज्वला लाभार्थ्यांच्या गॅस सिलेंडरच्या किमती 500 रुपयांनी कमी झाल्या आहेत”

“जन धन,आधार आणि मोबाईल या त्रिमूर्तीमुळे भ्रष्ट व्यवस्था उद्ध्वस्त करण्यास मदत झाली आहे”

“पुढची पिढी येत्या 25 वर्षात विकसित मध्यप्रदेश बघत मोठी व्हावी, हे सुनिश्चित करणे ही आजच्या 25 वर्षाखालील युवकांची जबाबदारी"

आज देशाचा आत्मविश्वास एका नव्या उंचीवर आहे.खेळाच्या मैदानापासून ते शेतशिवारापर्यंत,भारताचा झेंडा दिमाखात झळकतो आहे

“स्वदेशीची भावना,देशाला पुढे घेऊन जाण्याची भावना आज चहूकडे वाढीला लागली आहे”

“दुहेरी इंजिनाचे सरकार वंचितांना प्राधान्य देते”

Posted On: 05 OCT 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात जबलपूर इथे 12,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रस्ते, रेल्वे, गॅस पाइपलाइन, घरे आणि स्वच्छ पेयजल यासारख्या क्षेत्रांतील विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी  जबलपूरमध्ये ‘वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यान’चे ‘भूमिपूजनही’ केले.

इंदूरमधील लाइट हाऊस प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या 1000 हून अधिक घरांचे उद्घाटन, मंडला, जबलपूर आणि दिंडोरी जिल्ह्यातील अनेक जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी आणि सिवनी जिल्ह्यातील जल जीवन मिशन प्रकल्पाचे लोकार्पण यांचा यात समावेश आहे. मध्य प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 4800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण, 1850 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे रेल्वे प्रकल्प, विजयपूर-औरैयान-फुलपूर पाईपलाइन प्रकल्प आणि जबलपूरमध्ये नवीन बॉटलिंग प्लांट, मुंबई नागपूर झारसुगुडा पाइपलाइन प्रकल्पाच्या नागपूर जबलपूर विभागाची (317 किमी) पायाभरणीही आज पंतप्रधानांच्या हस्ते झाली.

यावेळी, वीरांगना राणी दुर्गावतीच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आणि इथे आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली.

इथे आयोजित सभेत बोलतांना, पंतप्रधान माता  नर्मदेच्या पुण्यभूमीसमोर नतमस्तक झाले. आज आपण एका नव्या स्वरूपातील जबलपूर शहर बघत आहोत, हे शहर आज उत्कटता, आणि उत्साहाने भरलेले आहे, ज्यातून या शहराचे  चैतन्य   प्रतिबिंबित होत आहे,असे पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण देश वीरांगना राणी दुर्गावती यांची 500 वी जयंती उत्साहात आणि उत्साहात साजरी करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

राणी दुर्गावती गौरव यात्रेच्या सांगता समारंभात, बोलतांना ते म्हणाले की, राणी दुर्गावती यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जावी, असे आवाहन आपण केले होते, आणि आज इथे जमलेल्या उत्साही समुदायाकडे बघतांना तीच भावना जाणवते आहे, असे ते म्हणाले. देशाच्या पूर्वजांच्या महान कार्याचे जे ऋण आपल्यावर आहे, त्याची परतफेड करण्यासाठीच आपण आज इथे जमलो आहोत असे पंतप्रधान म्हणाले. वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यान प्रकल्पाविषयी ते म्हणाले, की देशातील प्रत्येक मातेने आणि युवकांनी देखील, या स्थळाला भेट द्यायला हवी, हे स्थळ भविष्यात तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राणी दुर्गावती यांचे आयुष्य आपल्याला इतरांसाठी जगण्याची शिकवण आणि आपल्या मातृभूमीसाठी कार्य  करण्याची प्रेरणा देते.

राणी दुर्गावतींच्या 500 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी संपूर्ण आदिवासी समाज, मध्य प्रदेशातील लोकांना आणि देशातील 140 कोटी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या स्वातंत्र्यानंतर या भूमीच्या पूर्वजांना त्यांचे यथोचित स्थान न मिळाल्याची, तसेच वीरांचे कार्य विस्मृतीत गेल्याची खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली.

आज पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलेल्या सुमारे 12,000 कोटी रुपये खर्चाच्या  प्रकल्पांविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हे प्रकल्प शेतकरी आणि तरुणांसह लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणतील. "या प्रदेशात नवे उद्योग आल्याने, इथल्या तरुणांना आता नोकऱ्या मिळतील", असेही त्यांनी सांगितले.

देशातील माता-भगिनींसाठी स्वयंपाकघरात धूरमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. एका संशोधन अभ्यासाचा दाखला देत पंतप्रधानांनी सांगितले की, धूर उत्सर्जित करणारा एक स्टोव्ह 24 तासांत 400 सिगारेट इतका धूर तयार करतो. महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी आधीच्या सरकारांकडून पुरेसे प्रयत्न झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

उज्ज्वला योजनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी यापूर्वी गॅस जोडणी  मिळण्यात येणाऱ्या अडचणींचे स्मरण केले. रक्षाबंधनाच्या सणासुदीच्या काळात सध्याच्या सरकारने गॅस सिलेंडर 400 रुपयांनी स्वस्त केला. उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी गॅसच्या किमतीत केलेल्या कपातीवरही त्यांनी प्रकाश टाकला. आगामी सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरचे दर 100 रुपयांनी स्वस्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही आठवड्यांत, उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी गॅस सिलिंडरच्या किमती 500 रुपयांनी कमी झाल्या आहेत, असे  पंतप्रधान म्हणाले. राज्यात गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा संदर्भ देत केंद्र सरकार, पाइपलाइनद्वारे स्वस्त गॅस पुरवठा करण्यावर भर देत आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी  यावेळी दिली.

आधीच्या सरकारांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी यावर भर दिला की गरिबांसाठी असलेला निधी भ्रष्टाचारी लोकांच्या तिजोऱ्या भरत होता. विविध घोटाळ्यासंदर्भातले मथळे असणाऱ्या दहा वर्षांपूर्वीच्या ठळक बातम्या ऑनलाईन पाहण्याची देखील सूचना त्यांनी केली.

2014 नंतर, विद्यमान सरकारने या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एक स्वच्छता मोहीम राबवली  हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जे कधीही अस्तित्वात नव्हते अशा 11 कोटी बनावट लाभार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून  सरकारी याद्यांमधून बाहेर काढण्यात आले, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 2014 नंतर पंतप्रधानांनी  हे सुनिश्चित केले की गरिबांसाठी असलेला निधी हा कोणीही लुटता कामा नये. यासाठी त्यांनी पूर्वी अस्तित्वात असलेल्या भ्रष्टाचारी प्रणालीचे उच्चाटन करण्यासाठी जनधन आधार आणि मोबाईल या ट्रिनिटीच्या निर्मितीला श्रेय दिले. आज या त्रिशक्तीमुळे 2.5लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अयोग्य  हातात जाण्यापासून वाचली आहे याचा पंतप्रधानांनी पुनरुचार केला. यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की केंद्र सरकार उज्वला सिलेंडर केवळ पाचशे रुपयात उपलब्ध करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे, तीन लाख कोटी रुपये कोट्यवधी कुटुंबांना मोफत रेशन देण्यासाठी खर्च केले जात आहेत, 70 हजार कोटी रुपये हे देशातील पाच कोटी कुटुंबांना आयुष्मान योजनेअंतर्गत उपचारांसाठी खर्च करण्यात येत आहेत, शेतकऱ्यांना स्वस्त दरात युरिया मिळावा हे सुनिश्चित करण्यासाठी आठ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत छोट्या  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे आणि गरीब कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी चार लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की इंदूरमधील गरीब कुटुंबांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेली 1000 घरे देण्यात आली आहेत.

मध्य प्रदेशसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा असल्याची बाब अधोरेखित करत पंतप्रधानांनी याकडे निर्देश केला की विकासामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास गेल्या दोन दशकांपासून केलेले कष्ट वाया जातील. 25 वर्षे खालील लोकांनी याकडे लक्ष द्यावे अशी सूचना करत पंतप्रधान म्हणाले की पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये त्यांची मुले ही एक विकसित मध्यप्रदेश पाहतील हे सुनिश्चित करण्याची ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी अशी माहिती दिली की विद्यमान सरकारने मध्य प्रदेशला गेल्या काही वर्षात कृषी निर्यातीमध्ये आघाडीवर नेले आहे. तसेच या राज्याचे महत्त्व औद्योगिक विकासामध्येही हे राज्य एक आघाडीचे राज्य बनले आहे यावरही त्यांनी यावेळी भर दिला.

भारताच्या संरक्षण उत्पादनाच्या निर्यातीमध्ये गेल्या काही वर्षात अनेक पटीने झालेल्या वाढीकडे त्यांनी लक्ष वेधले आणि सांगितले की जबलपूरचे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे कारण येथील चार कारखाने संरक्षण संबंधित उत्पादनांची निर्मिती करत आहेत. ते म्हणाले की केंद्र सरकार आपल्या लष्कराला मेड इन इंडिया शस्त्रे उपलब्ध करून देत आहे आणि भारताच्या संरक्षण सामग्रीची मागणी जगभरात देखील वाढू लागली आहे. मध्य प्रदेशला देखील याचा लाभ मिळणार आहे. हजारो नव्या रोजगार संधी या ठिकाणी तयार होणार आहेत असे ते म्हणाले.

आज भारताचा आत्मविश्वास एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. खेळांच्या मैदानापासून ते शेतापासून शिवारापर्यंत सर्वत्र भारताचा झेंडा फडकत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या अभूतपूर्व कामगिरीला त्यांनी अधोरेखित केले आणि म्हणाले की भारतातील प्रत्येक युवकाला असे वाटत आहे की हा काळ त्यांचा आहे. ज्यावेळी युवा वर्गाला अशा संधी मिळतात त्यावेळी विकसित भारत उभारण्याची त्यांची इच्छा अधिक तीव्र होते आणि तिला चालना मिळते, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.त्यांनी जी 20 सारख्या एका भव्य जागतिक उपक्रमाचे आयोजन, भारताच्या चांद्रयान मोहिमेचे यश यांची उदाहरणे दिली. ते म्हणाले की लोकल फोर लोकल हा मंत्र आता सर्वत्र घुमू लागला आहे आणि त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळू लागले आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने ही दिल्लीतल्या दुकानामध्ये सुमारे दीड कोटी रुपये किमतीची खादी उत्पादने विकली गेली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. स्वदेशीची भावना, देशाला पुढे घेऊन जाण्याची भावना आज सर्वत्र वाढीला लागली आहे यावर मोदी यांनी भर दिला.

यावेळी त्यांनी स्टार्टअपच्या विश्वात मिळत असलेल्या यशामध्ये भारताच्या युवा वर्गाच्या भूमिकेची माहिती दिली. देशात एक ऑक्टोबर रोजी राबवलेल्या स्वच्छता अभियानामध्ये नऊ लाख पेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या, ज्यामध्ये सुमारे नऊ कोटी नागरिक सहभागी झाले अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. मध्य प्रदेशला स्वच्छतेमध्ये अव्वल स्थानावर नेल्याबद्दल त्यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला याचे श्रेय दिले.

जगभरात भारत करत असलेल्या कामगिरीच्या चर्चा सुरू असताना भारताची प्रतिमा मलीन करण्याच्या काही राजकीय पक्षांच्या कृतीबाबत पंतप्रधानांनी इशारा दिला. यावेळी त्यांनी डिजिटल इंडिया मोहीम आणि भारताच्या कोविड लसीकरण मोहिमेबाबत अशा पक्षांकडून उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची उदाहरणे दिली. असे राजकीय पक्ष देशाच्या शत्रूंच्या शब्दांवर विश्वास ठेवतात आणि अगदी भारतीय लष्कराच्या क्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत त्यांची मजल जाते, असे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी अमृत महोत्सव साजरा करण्यावर आणि अमृत सरोवरांच्या निर्मितीवर या घटकांकडून होणाऱ्या टीकेची माहिती दिली.

स्वातंत्र्यापासून ते सांस्कृतिक वारशाला समृद्ध करण्यापर्यंत भारतातील आदिवासी समाजाची भूमिका मोदी यांनी अधोरेखित केली आणि अनेक दशके राज्य करणाऱ्यांनी स्वातंत्र्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष का केले असा प्रश्न उपस्थित केला. अटलजींच्या सरकारनेच या समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आणि आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली, असे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या 9 वर्षात त्यांच्यासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत अनेक पटींनी वाढ केली असल्याची माहिती मोदी यांनी दिली. भारताला पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती मिळाल्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. देशातील सर्वात आधुनिक रेल्वे स्थानकांपैकी एकाचे नामकरण राणी कमलापती यांच्या नावाने करण्यात आले, पातालपानी स्थानकाला जननायक तंट्याभिल्ल यांचे नाव देण्यात आले आणि गोंड समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या राणी दुर्गावतीजी यांच्या नावाने आजचा भव्य स्मारकाचा प्रकल्प यांना पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हे संग्रहालय समृद्ध गोंड परंपरेबाबत जागरुकता करण्याच्या उद्देशाने गोंड संस्कृती, इतिहास आणि कला यांचे दर्शन घडवेल, अशी माहिती त्यांनी दिली.जागतिक नेत्यांना गोंड तैलचित्रे भेट म्हणून दिल्याची माहिती देखील पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधानांनी याचा पुनरुच्चार केला की या विद्यमान सरकारनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित महु या स्थानासहित जगातील स्थानांना एक पंचतीर्थ बनवले. यावेळी त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच संत रवीदास यांच्या स्मारकस्थळाचे भूमीपूजन केल्याची आठवण करून दिली.सामाजिक एकात्मता आणि वारसा याबाबतची सरकारची बांधिलकी यातून प्रदर्शित होत आहे, असे ते म्हणाले.

घराणेशाही पोसणाऱ्या  आणि भ्रष्टाचाराला  खतपाणी घालणाऱ्या पक्षांनी आदिवासी समाजाची संपत्ती लुटली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2014 पूर्वी, केवळ 8-10 वनोपजांना हमीभाव  दिला जात होता, बाकीची किरकोळ  किंमतीत  विकली जात होती, तर आज सुमारे 90 वन उत्पादनांना हमीभावाच्या   कक्षेत आणले गेले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी  दिली.

पूर्वी,आदिवासी आणि छोट्या  शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कोडो-कुटकीसारख्या भरडधान्यांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते, मात्र  नुकत्याच झालेल्या जी 20 परिषदेच्या पाहुण्यांसाठी   तुमच्या कोडो-कुटकीपासून खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते, हे त्यांनी अधोरेखित केले. सध्याच्या सरकारला श्रीअन्नच्या  रूपाने कोडो-कुटकी देश-विदेशातील बाजारपेठेत पोहोचवायची आहे, असेही ते म्हणाले.

"डबल इंजिन सरकार वंचितांना प्राधान्य देते",असे  पंतप्रधान म्हणाले. गरिबांच्या आरोग्यासाठी  शुद्ध पेयजल  पुरवठ्याचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी आजच्या प्रकल्पांचा उल्लेख केला यामध्ये  सुमारे 1600 गावांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.यावेळी त्यांनी नारी शक्ती वंदन कायद्याच्या  माध्यमातून महिलांना लोकसभा आणि विधानसभेत त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या विषयालाही  स्पर्श केला. 13 हजार कोटी रुपयांच्या पीएम विश्वकर्मा योजनेचाही  पंतप्रधानांनी उलेख  केला

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी ,मध्य प्रदेशला विकासाच्या बाबतीत अव्वल स्थानावर नेण्याच्या  मोदींच्या हमीबद्दल नागरिकांना आश्वस्त केले . "मोदी आणि सरकारच्या या संकल्पाला मध्य प्रदेशातील महाकौशल बळ देईल,याचा  मला विश्वास आहे असे सांगत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई सी.पटेल आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

राणी दुर्गावती यांची  500 वी जयंती भारत सरकारकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.पंतप्रधानांनी जुलै 2023 मध्ये मध्य प्रदेशातील शहडोल येथे दिलेल्या भेटीदरम्यान ही  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याबाबत  घोषणा केली होती. या घोषणेचा त्यांनी या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी  ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुनरुच्चार केला होता. या उत्सवाच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी ‘वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यान’चे भूमिपूजन केले.

जबलपूरमध्ये सुमारे 100 कोटी रुपये खर्चून   ‘वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यान’ हे सुमारे 21 एकर वर बांधले जाणार आहे. यात राणी दुर्गावतीची 52 फूट उंचीची कांस्य मूर्ती असणार आहे. राणी दुर्गावतीचे धैर्य  आणि शौर्य यासह गोंडवाना प्रदेशाच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे भव्य संग्रहालय येथे असेल. गोंड लोक आणि इतर आदिवासी समुदायांच्या पाककृती, कला, संस्कृती, राहणीमान इत्यादींवरही प्रकाश टाकला जाईल.‘वीरांगना राणी दुर्गावती स्मारक आणि उद्यान’च्या परिसरात औषधी वनस्पती  उद्यान, निवडुंग उद्यान आणि रॉक गार्डनसह अनेक उद्याने आणि बागा असतील.राणी दुर्गावती 16 व्या शतकाच्या मध्यात गोंडवानाची सत्ताधारी राणी होती. मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणारी एक धाडसी , निर्भीड  आणि शूर योद्धा म्हणून राणी दुर्गावतीचे  स्मरण केले जाते.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे लाईट हाउस  प्रकल्पाच्या उद्घाटनाने ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोकोनाला   बळ मिळाले आहे .प्रधानमंत्री आवास योजना - शहरी अंतर्गत सुमारे 128 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचा लाभ 1000 हून अधिक लाभार्थी कुटुंबांना होणार आहे.प्री-इंजिनिअर्ड स्टील स्ट्रक्चरल यंत्रणेसह  प्रीफेब्रिकेटेड सँडविच पॅनेल यंत्रणा वापरून लक्षणीयरीत्या कमीत कमी वेळेत बांधकाम करून सर्व मूलभूत सुविधांसह दर्जेदार घरे बांधण्यात आली आहेत . 

प्रत्त्येक घरात नळ जोडणीद्वारे  पिण्याचे सुरक्षित आणि पुरेसे  पाणी उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत मंडला, जबलपूर आणि दिंडोरी जिल्ह्यात 2350 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या  अनेक जल जीवनअभियान प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. पंतप्रधान सिवनी जिल्ह्यातील 100 कोटी खर्चाचा जल जीवन अभियान  प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. राज्यातील चार जिल्ह्यांसाठीच्या  या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशातील सुमारे 1575 गावांना फायदा होणार आहे.

मध्य प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 4800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय महामार्ग  346 च्या झारखेडा-बेरासिया-ढोलखेडी यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या सुधारणेसह  राष्ट्रीय महामार्ग  543 च्या बालाघाट - गोंदिया विभागाचे चौपदरीकरणरुधी आणि देशगावला जोडणाऱ्या खांडवा बाह्यवळण रस्त्याचे  चौपदरीकरण; राष्ट्रीय महामार्ग  47 च्या टेमागाव ते चिचोली विभागाचे  चौपदरीकरण ; बोरेगाव ते शहापूरला जोडणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण;आणि शहापूर ते मुक्ताईनगरला जोडणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. राष्ट्रीय महामार्ग  347 सी  च्या खलघाट ते सरवर्डेवला जोडणाऱ्या सुधारित रस्त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण झाले.

पंतप्रधानांनी 1850 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे  रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.यामध्ये कटनी - विजयसोटा (102किमी ) आणि मारवासग्राम - सिंगरौली (78.50किमी ) यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा समावेश आहे.हे दोन्ही प्रकल्प कटनी - सिंगरौली विभागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या प्रकल्पाचा भाग आहेत. या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधा सुधारतील आणि राज्यातील व्यापार आणि पर्यटनाला फायदा होईल.

पंतप्रधानांनी  विजयपूर-औरैयां-फुलपूर गॅस पाइपलाइन प्रकल्पाचे राष्ट्रार्पण केले. 352 किलोमीटर लांबीची ही पाइपलाइन 1750 कोटी रुपयांहून अधिक खर्चून बांधण्यात आली आहे. मुंबई -नागपूर -झारसुगुडा गॅस पाईपलाईन प्रकल्पाच्या नागपूर जबलपूर विभागाची (317 किमी) पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. हा प्रकल्प 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक  खर्च करून बांधण्यात येणार आहे. हा  गॅस पाइपलाइन प्रकल्प उद्योगांना आणि घरांना स्वच्छ तसेच किफायतशीर  नैसर्गिक वायू उपलब्ध  करेल आणि पर्यावरणातील उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने एक पाऊल ठरेल. सुमारे 147 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या  जबलपूर येथील  नवीन बॉटलिंग प्रकल्पाचेही  पंतप्रधानांनी  लोकार्पण केले.

 

N.Chitale/Radhika/Shailesh P/Sonal C/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964840) Visitor Counter : 106