संरक्षण मंत्रालय

संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्करप्रमुख टांझानिया भेटीवर

Posted On: 02 OCT 2023 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑक्‍टोबर 2023

 

भारतीय लष्कराचे प्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे 2 ते 5 ऑक्टोबर 2023 या कालावधीत टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. लष्करप्रमुखांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संरक्षण संबंधांना बळकटी मिळेल.

लष्कर प्रमुख टांझानियाची राजधानी दार ए सलाम, ऐतिहासिक शहर झांजीबार आणि अरुशा यांना शहरांना भेट देणार आहेत. ते टांझानियातील अनेक मान्यवर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करतील आणि बैठका घेतील. लष्करप्रमुख त्यांच्या या भेटीदरम्यान टांझानियाच्या केंद्रीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्ष महामहीम सामिया सुलुहू हसन यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

जनरल पांडे यांच्या भेटीत टांझानियाचे संरक्षण मंत्री डॉ. स्टेर्गोमेना लॉरेन्स टॅक्स आणि संरक्षण दलाचे प्रमुख जनरल जेकब जॉन मकुंडा यांच्याशी नियोजित बैठकांना प्राधान्य देण्यात आले आहे. लष्करप्रमुख जनरल पांडे झांजिबारलाही भेट देतील आणि झांजिबारचे राष्ट्रपती महामहीम डॉ. हुसेन अली मविनी यांचीही भेट घेतील. याशिवाय, 101 व्या इन्फन्ट्री ब्रिगेडचे कमांडर जनरल सैदी हमीसी सैदी यांच्याशी देखील लष्कर प्रमुखांची भेट नियोजित आहे.

जनरल मनोज पांडे टांझानियाच्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत तसेच मेजर जनरल विल्बर्ट ऑगस्टिन इब्यूज कमांडंट आणि प्राध्यापकांशीही संवाद साधणार आहेत. याशिवाय, दौऱ्यादरम्यान दुलुती येथील कमांड अँड स्टाफ महाविद्यालयात कमांडंट ब्रिगेडियर जनरल स्टीफन जस्टिस मनकांडे यांची भेट घेण्याचेही नियोजन आहे.

भारताच्या स्वदेशी संरक्षण उद्योग संकुलाच्या वाढत्या पराक्रमाचे प्रदर्शन करणाऱ्या, दार-ए-सलाम येथे आयोजित, दुसऱ्या भारत टांझानिया लघु संरक्षण प्रदर्शनादरम्यान लष्कर प्रमुखांची ही भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.  

भारत आणि टांझानियामधील द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत आणि समृद्ध आहेत. ऑक्टोबर 2003 मध्ये संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करुन दोन्ही देशांनी या संबंधांची मजबूत पायाभरणी केली आहे. या वर्षी 28 आणि 29 जून रोजी टांझानियामधील अरुशा येथे झालेल्या भारत-टांझानिया संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या दुसऱ्या बैठकीत हे सहकार्य आणखी दृढ झाले आहे.

भारत आणि टांझानिया दोन्ही देशांची सैन्य दले व्यावसायिक लष्करी अभ्यासक्रमांमध्ये एकमेकांसाठी जागा रिक्त ठेवतात. यामुळे दोन्ही देशांतील कर्मचार्‍यांना मजबूत बंध निर्माण करण्यास, विचारांची देवाणघेवाण करण्यास आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास मदत झाली आहे. टांझानियन सैन्य दल गेल्या पाच वर्षांपासून भारतात आयोजित संयुक्त राष्ट्र शांतता स्थापन प्रशिक्षणात सातत्याने सहभागी होत आहे. त्याचप्रमाणे, 2017 पासून कमांड अँड स्टाफ कॉलेज, दुलुटी येथे भारतीय लष्कराचे प्रशिक्षण पथक तैनात करण्यात आले आहे.

दोन्ही देशांमधील गहन लष्करी सहकार्याचे प्रतीक म्हणून टांझानियन लष्करी शिष्टमंडळे नियमितपणे भारताला भेट देत आहेत. अलीकडच्या काळात, टांझानियन शिष्टमंडळांनी एरो इंडिया 23, इंडो आफ्रिका आर्मी चीफ्स कॉन्क्लेव्ह-23 आणि AFINDEX-23 मध्ये लक्षणीय उपस्थिती दर्शवली. टांझानियातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनीही डेफ एक्स्पो 22 दरम्यान भारताला भेट दिली तर अलीकडेच त्यांनी 13 व्या IPACC, 47 व्या IPAMS आणि 9 व्या SELF 23 चा समारोप समारंभात हजेरी लावली होती.

लष्कर प्रमुखांची ही भेट भारत आणि टांझानिया दरम्यान स्थापित उच्च-स्तरीय द्विपक्षीय संरक्षण प्रतिबद्धता आणि घनिष्ठ संरक्षण संबंधांना आणखी मजबूत करेल. या भेटीमुळे केवळ विद्यमान सहकार्याला बळकटीच मिळत नसून भविष्यातील मजबूत भागीदारीसाठी मार्ग खुला करण्याची हमी मिळत आहे.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1963251) Visitor Counter : 104


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu