माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंधराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीयांचा सहभाग – एक दृष्टीक्षेप
या वर्षी 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जाणाऱ्या भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व राज्यमंत्री डॉ एल मुरुगन करणार
गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर, 2023 मध्ये होणाऱ्या 54 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) सहभागाला आणि आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीसाठी भागीदारीला चालना देण्याकरता, 'टी आय एफ एफ इ एस टी' हे एक व्यासपीठ
उझबेकिस्तानचे मंत्री आणि या चित्रपट महोत्सवात सहभागी होत असलेल्या तुर्की आणि रशियाच्या चित्रपट प्रतिनिधीमंडळांसोबत बैठका नियोजित
Posted On:
28 SEP 2023 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2023
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, या वर्षी 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत उझबेकिस्तानात ताश्कंद इथे होणाऱ्या 'टी आय एफ एफ इ एस टी' म्हणजेच ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी जाणाऱ्या भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत. चित्रपट विषयक भागीदाऱ्या निर्माण करणे, कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे, चित्रपट निर्मितीला खतपाणी घालणे, विविध संस्कृतीमधील सेतू म्हणून भूमिका बजावणे, हे या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यामागील उद्दिष्ट आहे. रेशीम मार्गावरील मोती (पर्ल ऑफ सिल्क रूट) म्हणून प्रसिद्ध असलेला हा ताश्कंद चित्रपट महोत्सव 1968 मध्ये सुरू झाला आणि भारतीय चित्रपट आम्रपाली या पहिल्या महोत्सवात दाखवण्यात आला.
भारतीय चित्रपटाने जगाच्या नकाशावर स्वतःचे नाव कमावले ते भारतीय चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात, जेव्हा राज कपूर यांच्या चित्रपटांना जगभरातून, विशेषतः उझबेकिस्तान आणि मध्य आशियातूनही अलोट प्रेम मिळाले. भारतीय चित्रपट आजही आपले आकर्षण टिकवून आहेत, कारण कथाकथनाची आपली सांस्कृतिक पद्धत आणि कला प्रकार आपल्या चित्रपटांच्या कथाकथनात देखील आढळतात आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात याचे कौतुक होते. राजामौली यांच्या 'आर आर आर' चित्रपटातील “नाटू नाटू” गाण्याने अलीकडेच गोल्डन ग्लोब चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळवून जगभरातील चित्रपटप्रेमींचे मन जिंकले, हे याचे उत्तम उदाहरण आहे.
उझबेकिस्तान आणि भारतामधील संबंधांची मूळे इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, अलीकडच्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय घनिष्टता निर्माण झाली आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पावर काम करत, एक समृद्ध चित्रीकरण परिसंस्था आणि भविष्याच्या दृष्टीने सज्ज अशा उद्योग जगताच्या निर्मितीसाठी, भारतातील विकास वृद्धीच्या पार्श्वभूमीवर, भारत, चित्रपटांची सहनिर्मिती करण्यास, तसेच चित्रपटाचे तंत्र, चित्रपट विषयक जाण यांची देवाणघेवाण करण्यास आणि आपला चित्रपट/उद्योग सर्वसमावेशक बनवण्याचे मार्ग विकसित करण्यास उत्सुक आहे. या वर्षी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) या शांघाय सहकार्य संघटनेच्या अध्यक्षपदाच्या वर्षात, भारताने जानेवारी 2023 मध्ये मुंबई इथे SCO चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते.
भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था जगासमोर मांडणे, या केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या संकल्पनेवर, भारताचा, ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सहभाग बेतलेला आहे. हा सहभाग, उत्साहवर्धक आणि अर्थपूर्ण चर्चेला गती देणारा उत्प्रेरक ठरेल याची खात्री आहे.
भारतासाठी जागतिक चित्रपट विषयांचे केंद्र बनण्याचा आणि एक सहयोगी चित्रीकरण परिसंस्था तयार करण्याचा मार्ग मोकळा होत असताना, ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, उझबेकिस्तान आणि इतर सहभागी देशांमधील चित्रपट विषयक भागीदारीसाठी व्यासपीठ प्रदान करेल. अधिकाधिक चित्रपट निर्मात्यांना भारतात येण्याकरता आकर्षित करण्यासाठी परदेशी चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहनपर योजना पुरवणाऱ्या घोषणांवर भर दिला जाईल.
गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर, 2023 मध्ये होणाऱ्या 54 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) सहभागाला आणि आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीसाठी भागीदारीला चालना देण्याकरता, 'टी आय एफ एफ इ एस टी' हे एक व्यासपीठ ठरणार आहे.
* * *
M.Pange/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961859)
Visitor Counter : 119