शिक्षण मंत्रालय

स्त्री-पुरुष समानतेला चालना आणि युवावर्गाच्या सक्षमीकरणासाठी निर्माण केलेल्या 'सी आर आय आय ओ 4 जी ओ ओ डी' या ऑनलाईन अध्ययन संचाचे, धर्मेंद्र प्रधान यांनी केले उद्घाटन


हे अध्ययनसंच म्हणजे मुलींचे सक्षमीकरण आणि स्त्री- पुरुष समानतेबाबत जागृतीच्या प्रसाराचे माध्यम - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 28 SEP 2023 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2023

 

स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी जीवनोपयोगी कौशल्ये शिकवणाऱ्या, 'सी आर आय आय ओ 4 जी ओ ओ डी' या नवीन ऑनलाईन अध्ययन संचाचे उद्घाटन, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आय सी सी), युनिसेफ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बी सी सी आय) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा कार्यक्रम गुजरातमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रीडागारात झाला.

गुजरातचे आदिवासी विकास तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि प्रौढ शिक्षण मंत्री डॉक्टर कुबेर दिंडोर, संसदीय कार्य राज्यमंत्री आणि शिक्षण खात्याचे राज्यमंत्री प्रफुल्ल पनशेरीया, युनिसेफच्या प्रतिनिधी सिंथिया मॅकफ्रे, बीसीसीआयचे सचिव जय शहा, भारतीय महिला क्रिकेटपटू आणि आयसीसी-युनिसेफ अध्ययन संचाच्या दूत स्मृती मानधना, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार,  शिक्षण मंत्रालय आणि युनिसेफचे अधिकारी तसेच हजाराहून जास्त मुले या कार्यक्रमाला उपस्थित होते.

स्त्री-पुरुष समानता आणि समान संधी या मूलभूत तत्त्वांवर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ने दिलेला भर, धर्मेंद्र प्रधान यांनी या कार्यक्रमात बोलताना अधोरेखित केला.

सी आर आय आय ओ 4 जी ओ ओ डी या अध्ययन संचाच्या माध्यमातून खेळांची ताकद आणि क्रिकेटची लोकप्रियता यांचा मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि स्त्री पुरुष समानतेबाबत जागृतीचा प्रसार करण्यासाठी उपयोग करता येईल, असे ते पुढे म्हणाले. नारीशक्ती वंदन अधिनियम कायदा संमत करत भारताला महिला संचलित विकासाच्या आघाडीवर केंद्रस्थानी घेऊन जाताना इतिहास घडत असलेला या देशाने पाहिला आहे, असे त्यांनी नमूद केले.

स्मृती मानधना यांनी या कार्यक्रमात 1000 हून अधिक शालेय मुलांसोबत सी आर आय आय ओ 4 जी ओ ओ डी च्या पहिल्या अध्ययन संचाची ओळख करुन देत संवाद साधला. हे संच अत्यंत खिळवून ठेवणारे आहेत आणि क्रिकेटच्या गारुडाचा वापर, आवश्यक जीवनोपयोगी कौशल्ये आणि स्त्री-पुरुष समानतेबद्दल मुली आणि मुलांमध्ये खेळीमेळीने परस्परसंवाद घडवून आणण्यासाठी चालना देणारे आहेत, असे त्या यावेळी म्हणाल्या.

हा अध्ययन संच, क्रिकेटवर आधारित 8 ॲनिमेशन ध्वनीचित्रफितींची मालिका आहे. या संचाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेला चालना देऊन मुलींना जीवनोपयोगी कौशल्याने परिपूर्ण करण्याचा आणि त्यांचा खेळांमधला सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. क्रिकेटची लोकप्रियता आणि युवामनावर असलेला प्रभाव लक्षात घेत आयसीसी आणि युनिसेफने हे संच तयार केले आहेत. या संचांच्या माध्यमातून मुले आणि युवा वर्गाला महत्वाची जीवनोपयोगी कौशल्ये अंगिकारायला लावून स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रेरीत केले जाणार आहे. criiio.com/criiio4good या संकेतस्थळावर ही अध्ययन संचाची मालिका विनामूल्य पाहता येईल. ही मालिका इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत उपलब्ध आहे.

नेतृत्व, समस्यांचे निराकरण, आत्मविश्वास, निर्णय क्षमता, वाटाघाटी कौशल्य, सांघिक भावना, समजूतदारपणा, आणि उद्दिष्ट निश्चिती अशी या अध्ययन विषयक संचाची संकल्पना आहे. अत्याधुनिक अशा ॲनिमेशनच्या माध्यमातून क्रिकेट विषयक उदाहरणांचा वापर करून या संकल्पना मांडल्या आहेत. स्थानिक बारकाव्यांबाबत सखोल संशोधन करून या ध्वनीचित्रफिती बनवल्या असल्यामुळे त्या खूप वास्तवदर्शी आणि आपल्याशा वाटणाऱ्या झाल्या आहेत.

 

* * *

M.Pange/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1961811) Visitor Counter : 208