दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सेल ब्रॉडकास्ट अलर्ट यंत्रणा चाचणीच्या माध्यमातून आपत्कालीन संपर्क यंत्रणा वाढवण्यासाठी दूरसंचार विभाग आणि एनडीएमए यांच्यात समन्वय


आपत्कालीन इशारा हा नियोजित चाचणी प्रक्रियेचा अविभाज्य घटक असून तो खरी आपत्कालीन स्थिती दर्शवणारा नसेल

सर्व दूरसंचार प्रदात्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात सेल ब्रॉडकास्टिंगची अंमलबजावणी करण्याची दूरसंचार विभागाची महत्वाकांक्षी योजना

Posted On: 28 SEP 2023 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2023

 

भारतात दूरसंचार क्षेत्राची वाढ आणि व्याप्ती वेगाने वाढवण्यासाठी विकासात्मक धोरणे तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी दूरसंचार विभाग सातत्याने प्रयत्न करत असतो. देशातील सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दरात प्रभावी दूरसंचार सेवा मिळेल, हे सुनिश्चित करणे, या विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचवेळी, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांचे रक्षण करतानाच नवोन्मेषालाही प्रोत्साहन दिले जाते. दूरसंचार संपर्क व्यवस्थेच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापनाला पाठबळ देत, देशबांधवांचे कल्याण साधण्यासाठी, दूरसंचार विभाग अहोरात्र कार्यरत आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी (NDMA) समन्वय साधून, दूरसंचार विभाग, सेल ब्रॉडकास्ट अलर्ट यंत्रणेची सर्वसमावेशक चाचणी करणार आहे. आपत्तीच्या काळात आपत्कालीन संपर्कयंत्रणा मजबूत करणे आणि पर्यायाने, आपल्या नागरिकांची सुरक्षितता आणि कल्याण साधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

भारतातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे या कटिबद्धतेला अनुसरून, विविध दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या माध्यमातून, सेल ब्रॉडकास्टिंग अलर्ट प्रणाली, अत्यंत कठीण चाचण्यांमधून जाणार आहे. या चाचण्या देशभरात विविध प्रदेशात वेळोवेळी केल्या जाणार आहेत, ज्यातून आपत्कालीन इशारा ब्रॉडकास्टिंग क्षमतांची कार्यक्षमता आणि प्रभाव यांची चाचपणी केली जाणार आहे. विविध मोबाईल ऑपरेटर्स आणि सेल ब्रॉडकास्ट यंत्रणा यांच्या माध्यमातून या क्षमता तपासल्या जातील.

ही सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आली असून त्याद्वारे, विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील सर्व प्रकारच्या मोबाईल्सवर एकाचवेळी महत्वाचे आणि योग्य वेळी पोहोचणारे आपत्ती व्यवस्थापन संदेश पाठवणे शक्य होणार आहे. तिथले रहिवासी आणि त्या भागात काही काळासाठी आलेले लोक अशा सर्वांना हा संदेश प्रसारित होऊ शकेल. याद्वारे महत्वाचे आपत्कालीन संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्वरित पोहोचू शकतील. सरकारी यंत्रणा आणि आपत्कालीन सेवा सेल ब्रॉडकास्टचा वापर करून लोकांना संभाव्य धोक्यांची माहिती आणि गंभीर परिस्थितींमध्ये अद्ययावत माहिती पुरवली जाईल. सेल ब्रॉडकास्टच्या सामान्य अॅपमध्ये हवामानाबाबत गंभीर इशारा (उदा. त्सुनामी, फ्लॅश फ्लड (अचानक आलेला पूर), भूकंप), सार्वजनिक सुरक्षा संदेश, परिसर मोकळा करण्याची सूचना आणि इतर महत्वाची माहिती यांसारख्या आपत्कालीन सूचनांचा समावेश असेल.

याच प्रयत्नांचा भाग म्हणून, देशभरात विविध राज्यांमधे चाचण्या केल्या जाणार आहेत. पंजाबमध्ये उद्या म्हणजेच 29 सप्टेंबरला ह्या चाचण्या केल्या जाणार आहेत.

 

* * *

M.Pange/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1961733) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu