संरक्षण मंत्रालय
संरक्षण सचिवांनी एमडीएल, मुंबईला दिली भेट; भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी प्रयत्न करण्याचे केले आवाहन
"युद्धनौका बांधणीत वाढणारी स्वदेशी सामग्री भारताच्या प्रगतीत योगदान देईल"
Posted On:
26 SEP 2023 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023
सध्या सुरू असलेल्या 'स्वच्छता ही सेवा' या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईतल्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला (एमडीएल) भेट दिली. त्यांनी एमडीएलच्या सुरक्षा संकुलाचे उद्घाटन केले आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणात, संरक्षण सचिवांनी राष्ट्र उभारणीत स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छतेची व्याख्या केवळ परिसर स्वच्छ करण्यापुरती मर्यादित नसून नैतिक, आर्थिक आणि बौद्धिक अशा सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून मुक्त होण्यावर लक्ष केंद्रित करते, असे त्यांनी सांगितले.
भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या गरजेवर गिरीधर अरमाने यांनी भर दिला आणि यासाठी सर्व संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. युद्धनौका बांधणीत स्वदेशी सामग्री वाढवल्यास देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असे ते म्हणाले.
संरक्षण सचिवांनी मनुष्यबळाची भूमिका आणि समकालीन मनुष्यबळ धोरणे सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कर्मचार्यांनी केवळ आहे त्यावर संतुष्ट न राहता अधिक प्रगती करण्यासाठी प्रेरित असायला हवे, यावर त्यांनी भर दिला. आपण अधिक योगदान देऊ शकतो, असा विश्वास कर्मचाऱ्यांनी बाळगला पाहिजे, असे ते म्हणाले.
एमडीएलची 1774 मध्ये स्थापना झाल्यापासून 250 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय टपाल सेवेने जारी केलेल्या सानुकूलित कॉर्पोरेट एमडीएल टपाल तिकिटाचे अनावरण संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी केले. आगामी दक्षता जागरुकता सप्ताहासाठी एमडीएलच्या दक्षता विभागाने तयार केलेल्या 'माहिती देणाऱ्यांचे संरक्षण आणि सार्वजनिक हिताचे प्रकटीकरण' याबाबत विविध पैलूंवरील एका पुस्तिकेचे प्रकाशनही अरमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
जहाज कारखान्याचा समृद्ध वारसा प्रदर्शित करणाऱ्या ‘धरोहर’ या एमडीएलच्या हेरिटेज गॅलरीलाही संरक्षण सचिवांनी भेट दिली. त्यानंतर पाणबुडी कारखाना, नवीन पाणबुडी विभाग असेंब्ली वर्कशॉप आणि बांधकामाधीन युद्धनौका आणि पाणबुडी यासह यार्ड सुविधा यांची पाहणी संरक्षण सचिवांनी केली.
S.Kane/S.Kakade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1960873)
Visitor Counter : 114