संरक्षण मंत्रालय
कर्तव्यादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या सीमा रस्ते संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी असलेल्या सुविधा आता कंत्राटी मोबदला कर्मचाऱ्यांना देखील देण्यात येणार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची प्रस्तावाला मंजुरी
सीमा रस्ते संघटना प्रकल्पांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी मोबदला कामगारांच्या अंत्यसंस्कारांसाठीच्या खर्चात रुपये 1,000 वरून रुपये 10,000 पर्यंत वाढ
अवशेषांची वाहतूक तसेच अंत्यसंस्काराचा खर्च सरकार उचलणार
Posted On:
24 SEP 2023 10:05AM by PIB Mumbai
सीमा रस्ते संघटने (BRO) अंतर्गत कार्यरत असलेल्या सामान्य राखीव अभियंता दलासाठी (GREF) सध्या उपलब्ध असलेली अवशेषांचे जतन आणि वाहतूक करण्याची सुविधा आता कंत्राटी मोबदला कर्मचाऱ्यांना (CPLs) मिळण्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजुरी दिली आहे. कंत्राटी मोबदला कर्मचाऱ्यांच्या अंत्यसंस्कार खर्चातही 1000 रुपयांवरून 10000 रुपयांपर्यंत वाढ करायला त्यांनी मंजुरी दिली आहे. सरकारने हाती घेतलेल्या सीमा रस्ते संघटनेच्या प्रकल्पांवर कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी मोबदला कर्मचाऱ्यांवर कामाच्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाल्यास याचा खर्च सरकार उचलणार आहे.
कंत्राटी मोबदला कर्मचाऱ्यांची नियुक्ती दुर्गम/सीमावर्ती भागात रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी सीमा रस्ते संघटनेमार्फत केली जाते. अत्यंत प्रतिकूल वातावरणात आणि कामाच्या विपरीत परिस्थितीत हे कर्मचारी सीमा रस्ते संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या जोडीने काम करत असताना अशा कठीण प्रसंगात काही वेळा त्यांचा मृत्यू ओढवतो.
आतापर्यंत, शासकीय खर्चाने अवशेषांचे जतन आणि जन्म गावी त्यांच्या पार्थिवाच्या वाहतुकीची सुविधा केवळ सामान्य राखीव अभियंता दलासाठी उपलब्ध होती. याच परिस्थितीशी साधर्म्य असणाऱ्या स्थितीत काम करणाऱ्या कंत्राटी मोबदला कर्मचाऱ्यांना मात्र या सुविधेपासून वंचित राहावे लागत होते. त्यांच्या आकस्मित मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचे तसेच अवशेषांच्या वाहतुकीचा भार त्यांच्या शोकमग्न कुटुंबीयांवर पडत होता. आर्थिक स्रोतांच्या अभावामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना हवाई मार्गाने तसेच अनेकदा रस्ते मार्गानेही वाहतुकीचा खर्च उचलणे शक्य होत नाही. शोकमग्न कुटुंबियांना अंत्यसंस्काराचा तसेच इतर संबंधित बाबींचा खर्च उचलणे अनेकदा अत्यंत कठीण भासते; अशा परिस्थितीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी मोबदला कर्मचाऱ्यांच्या वारसांना देश सेवेसाठी प्राण गमवाव्या लागलेल्या आपल्या नातलगांना आदरांजली वाहण्याची संधीही मिळत नाही.
सीमा रस्ते संघटनेच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी संरक्षण मंत्र्यांनी भेटी दिल्यानंतर कंत्राटी मोबदला कर्मचाऱ्यांची कठीण परिस्थितीत काम करण्याची समस्या त्यांच्या निदर्शनास आली. या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाबाबत काळजी वाटल्याने त्यांनी सीमा रस्ते संघटनेला योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. या कल्याणकारी उपायांमुळे शोकमग्न कुटुंबीयांना आपल्या प्रियजनांवर अत्यंत सुयोग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी यापुढे मदत होणार आहे.
****
Shilpa P/SN/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1960078)
Visitor Counter : 152