पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गतिशीलतेत क्रांतिकारी बदल


केंद्रीय मंत्री हरदीप एस पुरी 25 सप्टेंबर 2023 रोजी पहिल्या हरित हायड्रोजन फ्युएल सेल बसला दाखवणार हिरवा झेंडा

Posted On: 23 SEP 2023 11:58AM by PIB Mumbai

 

हरित गतिशीलतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, 25 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे पहिल्या हरित हायड्रोजन इंधन सेल बसला हिरवा झेंडा दाखवतील.

नवीकरणीय ऊर्जेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या हरित हायड्रोजनमध्ये कार्बनचा कमी वापर करतानाच स्वयंपूर्ण आर्थिक मार्गांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता आहे. हरित हायड्रोजन देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा विविध प्रदेशांमध्ये, ऋतूंमध्ये आणि क्षेत्रांमध्ये इंधन म्हणून किंवा औद्योगिक फीडस्टॉक म्हणून वापर करण्यास सक्षम बनवू शकतो. तसेच पेट्रोलियम शुद्धीकरण, खत उत्पादन, पोलाद उत्पादन इत्यादींमध्ये जीवाश्म इंधन व्युत्पन्न फीडस्टॉक्स ऐवजी देखील वापरता येऊ शकतो.

गतिशीलता नवोन्मेष : इंधन सेल्सची ताकद

इंधन सेल तंत्रज्ञान हे ई-मोबिलिटी मधील एक महत्त्वाचे तंत्रज्ञान  म्हणून उदयास येत आहे. हायड्रोजनचा वापर इंधन सेल साठी  इंधन म्हणून केला जाऊ शकतो. इलेक्ट्रोकेमिकल रिअॅक्शन एनोडवरील इंधन (हायड्रोजन) आणि कॅथोडमधील हवेतील ऑक्सिजनचे पाण्यात रूपांतर करते आणि इलेक्ट्रॉनच्या रूपात विद्युत ऊर्जा मुक्त करते. इतर गतिशीलता पर्यायांच्या तुलनेत इंधन सेल्स अत्यंत कार्यक्षम आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इंधन सेलवर चालणारी  वाहने लांब पल्ल्याचा प्रवास करू शकतात, परिणामी इंधन पुन्हा भरण्यासाठी लागणारा कमी वेळ हा अंतर्निहित फायदा आहे. हायड्रोजन वायू संकुचित केला जातो आणि साधारणपणे 350 बारच्या दाबाने सिलिंडरमध्ये जहाजावर साठवला जातो,

क्रांतिकारी बदल : भारतातील पहिल्या हरित हायड्रोजन-संचालित इंधन सेल बसेस

इंडियन ऑइलने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधील निवडक मार्गांवर हरित हायड्रोजनवर धावणाऱ्या  15 इंधन  सेल बसेसच्या परिचालन चाचण्या घेण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या रचना केलेला कार्यक्रम सुरू केला आहे.  या कार्यक्रमांतर्गत, 25.09.2023 (सोमवार) रोजी इंडिया गेट येथून 2 इंधन सेल बसचा शुभारंभ करण्यात येत आहे. इंधन सेलवरील  बस चालवण्यासाठी 350 बारमध्ये हरित  हायड्रोजन वितरणाचा  हा भारतातील पहिला उपक्रम आहे. इंडियन ऑइलने फरीदाबाद  येथील संशोधन आणि विकास संकुलात  एक अत्याधुनिक वितरण सुविधा देखील स्थापित केली आहे, जी सौर पीव्ही पॅनेल वापरून इलेक्ट्रोलिसिसमधून तयार केलेल्या हरित हायड्रोजनचे इंधन भरू शकते.

पुढील मार्ग : दीर्घकालीन प्रभाव आणि भविष्यातील संधी

या 2 बसेसचा शुभारंभ झाल्यावर, या नवीन तंत्रज्ञानाच्या कार्यक्षमतेचे आणि टिकाऊपणाचे दीर्घकालीन मूल्यांकन करण्यासाठी सर्व बसेस 3 लाख किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करतील. या कठीण  चाचण्यांद्वारे प्राप्त आकडेवारी एक  राष्ट्रीय भांडार म्हणून काम करेल जी हरित हायड्रोजनद्वारे संचालित देशातील शून्य उत्सर्जन गतिशीलतेचे भविष्य घडवेल.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1959893) Visitor Counter : 129