ग्रामीण विकास मंत्रालय

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) आणि आयडब्ल्यूडब्ल्यूएजीई तर्फे चौथ्या लिंगभाव संवादाचे सह-आयोजन


चौथा लिंगभाव संवाद हा कार्यक्रम म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे लिंगभेदाबाबत देशभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी सामायिक व्यासपीठ स्थापन करण्याचा अनोखा प्रयत्न

Posted On: 23 SEP 2023 1:03PM by PIB Mumbai

 

दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM), ग्रामीण विकास मंत्रालय आणि अर्थव्यवस्थेत महिला आणि मुलींना प्रगत करण्यासाठीचा उपक्रम असलेल्या आयडब्ल्यूडब्ल्यूएजीई (IWWAGE) यांनी संयुक्तरित्या चौथ्या लिंगभाव संवादाचे आयोजन काल दिल्ली येथे केले होते.

लिंगभाव संवाद, हा दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) आणि आयडब्ल्यूडब्ल्यूएजीई यांचा एक अनोखा संयुक्त प्रयत्न असून या अभियानाद्वारे देशभरात लिंगभेदाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ स्थापन केले आहे. या व्यासपीठाने राज्ये आणि बचतगट सदस्यांच्या मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. दूरदृश्य प्रणालीमार्फत आयोजित या कार्यक्रमात 8000 पेक्षा जास्त जण सहभागी झाले. यात ग्रामीण विकास मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, महिला आणि बाल विकास मंत्रालय, बिहार सरकार आणि राज्य सरकारी अधिकारी, अभ्यासक, लिंगभाव तज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, नागरी संस्थांमधील कलाकार आणि बचत गटांचे सदस्य यांचा समावेश होता.

ग्रामीण विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंग यांनी आपल्या मुख्य भाषणात, लिंग-आधारित हिंसाचाराच्या आकडेवारीबाबत चिंता व्यक्त केली आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी समुदाय आधारित संस्था भूमिका बजावू शकतात, यावर भर दिला. लिंग-आधारित हिंसाचाराचा प्रश्न सोडवण्यासाठी या समस्येसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि संवेदना निर्माण करण्यासाठी विशेषत्वाने माहिती आणि प्रसारण तसेच शिक्षण मंत्रालयांच्या आंतर-मंत्रालयीन एककेंद्राभिमुखतेवर चरणजीत सिंग यांनी भर दिला. 

दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या सहसचिव स्मृती शरण यांनी या अभियानाद्वारे महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लिंगभाव स्रोत केंद्रासारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रारुप संस्था तयार करण्यासाठीच्या प्रयत्नांवर व्यापक प्रकाश टाकला.

लिंग- आधारित हिंसाचाराचा सामना करण्यासाठी स्वीकारलेल्या संस्थात्मक धोरणांबाबतचे अनुभव सामाईक करण्यासाठी, झारखंड, केरळ आणि ओदिशा यासह विविध राज्यांतील समुदाय स्रोत व्यक्तींना (CRP)  आमंत्रित करण्यात आले होते. ओडिशातील रजनी दंडसेना यांनी ग्रामपंचायत स्तरावर प्रेरणा केंद्राच्या (लिंगभाव स्रोत केंद्र) कामकाजाच्या अनुभवाचे कथन केले. प्रेरणा केंद्रांनी लिंगभाव मंचाच्या माध्यमातून इतर विभागांशी मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत आणि ती केंद्रे हिंसेची प्रकरणे हाताळण्यात सक्षम झाली आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या लिंगभाव मोहिमेमुळे लिंग-आधारित हिंसाचाराबद्दल व्यापक जनजागृती झाली आणि महिलांच्या संस्थांमार्फत सार्वजनिक कारवाईची मागणी केली जाते आहे. महिलांनी जादूटोणा, अंमली पदार्थांचे सेवन, लैंगिक हिंसा इत्यादी समस्यांचे निराकरण करण्याचे अनुभव सामाईक केले.

बिहार सरकारच्या जीविका उपक्रमातील महुआ रॉय चौधरी यांनी लैंगिक प्रशिक्षण, अध्यापनशास्त्र तसेच माहिती, शिक्षण आणि संवाद सामग्रीच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले. यामुळे पितृसत्ताक पद्धती आणि सामाजिक नियमांमध्ये खोलवर रुजलेल्या हिंसेचे निराकरण करण्यासाठी लिंगभाव प्रतिसाद संस्था, विशेषत्वाने दीदी अधिकार केंद्रांची निर्मिती झाली असल्याचे सांगितले. त्यांनी राज्यातील प्रभाग सदस्य आणि सरपंच म्हणून महिलांच्या राजकीय सक्षमीकरणावरही भर दिला. महिला सशक्तीकरण कायम राखण्यासाठी त्यांनी या संस्थांच्या शाश्वततेच्या महत्त्वावर भर दिला.

यानंतर महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सहसचिव, लिंगभाव तज्ञ आणि महिला अधिकार वकील यांचा सहभाग असलेल्या एका चर्चासत्रात लिंग-आधारित हिंसाचाराच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे महत्त्व आणि जलदगती न्यायालये, विविध हितधारकांचे बहुआयामी लिंग प्रशिक्षण अशा कायदेशीर उपायांसारख्या प्रणालीशी संबंधित संधींवर आणि बहु-आयामी धोरणांचा अवलंब करणारी विविध मंत्रालयातील एककेंद्राभिमुखता या मुद्द्यांवर भर देण्यात आला. या तज्ञ मंडळाने शाश्वततेसाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा, शक्ती सदन आणि शॉर्ट स्टे होम यांसारख्या महिलांसाठीच्या सुरक्षित जागा, माहिती आधारित प्रशासन आणि महिलांच्या आर्थिक संस्थांना बळकट करण्याबाबत चर्चा केली. या संवादात दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत लिंगभाव स्रोत केंद्रांसह मिशन शक्ती अंतर्गत नारी अदालत यांच्यातील एककेंद्राभिमुखतेची व्याप्ती मांडण्यात आली. प्रतिबंधात्मक उपाय, एककेंद्राभिमुखता तसेच समस्या सोडवण्याच्या नाविन्यपूर्ण आणि स्थानिक पध्दतींवर लक्ष केंद्रित करून महिलांच्या मुख्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्र येण्याची गरज स्पष्ट करत संवाद 2023 चा समारोप झाला.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959891) Visitor Counter : 164