वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केमिस्ट्री ऑफ सिमेंटवरील 17 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे भारताला मिळाले यजमानपद
Posted On:
21 SEP 2023 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023
इंटरनॅशनल काँग्रेस ऑन द केमिस्ट्री ऑफ सिमेंट(ICCC) या प्रतिष्ठेच्या परिषदेचे 2027 साली नवी दिल्लीत आयोजन करण्यासाठी भारताच्या दावेदारीला मान्यता मिळाली आहे. थायलंडमध्ये बँकॉकमध्ये सुरू असलेल्या 16 व्या काँग्रेसदरम्यान (ICCC) परिषद सदस्यांच्या सुकाणू समितीसमोर नॅशनल कौन्सिल फॉर सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्स(NCCBM) या भारतातील आघाडीच्या संशोधन आणि शैक्षणिक संस्थेने आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने यशस्वी पद्धतीने भारताची दावेदारी सादर केली. भारताव्यतिरिक्त स्वित्झर्लंड आणि यूएईने देखील यजमानपदासाठी दावेदारी सादर केली होती. थायलंडमध्ये बँकॉक येथे 20 सप्टेंबर 2023 रोजी 16 व्या काँग्रेसदरम्यान हा निर्णय जाहीर करण्यात आला. भारताच्या वतीने एनसीसीबीएमचे महासंचालक डॉ. एल. पी. सिंग, एनसीसीबीएमचे संयुक्त संचालक डॉ. एस. के. चतुर्वेदी आणि आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक(स्थापत्य अभियांत्रिकी) डॉ. शशांक बिश्नोई यांनी भारताचा दावा सादर केला.
सिमेंट आणि काँक्रिटच्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या संशोधनाच्या प्रगतीचा आढावा घेणारी केमिस्ट्री ऑफ सिमेंटवरील आंतरराष्ट्रीय परिषद हा या क्षेत्राशी संबंधित एक सर्वात मोठा आणि अतिशय प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. या क्षेत्रातील शैक्षणिक विश्व आणि सिमेंट उद्योग यांमध्ये एक भक्कम आणि फलदायी दुवा निर्माण करणाऱ्या या परिषदेचे 1918 पासून साधारणपणे चार ते सहा वर्षांच्या अंतराने आयोजन केले जाते. 1992 मध्ये नवी दिल्ली येथे एनसीसीबीएम ने 9 व्या परिषदेचे आयोजन केले होते आणि सध्या थायलंडमध्ये बँकाक येथे 18-22 सप्टेंबर 2023 दरम्यान ही परिषद सुरू आहे.
भारतात या प्रतिष्ठेच्या परिषदेचे आयोजन केल्यामुळे आपल्याला जगभरातील सिमेंट क्षेत्रातील आघाडीचे नेते, तज्ञ आणि नवोन्मेषकांना एकत्र आणण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण संधी उपलब्ध होते. नवी दिल्ली हे यजमान शहर म्हणून 2027 मध्ये 17 व्या ICCC ला उपस्थित राहणाऱ्या सर्वांना भारत मंडपम आणि यशोभूमी यांसारख्या जागतिक दर्जाच्या कॉन्फरन्स सुविधांसह, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि अतिशय जिव्हाळ्याच्या आदरातिथ्याद्वारे एक अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सज्ज असेल.
नॅशनल कौन्सिल फॉर सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्स(NCCBM) ही केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली सर्वोच्च संशोधन आणि विकास संस्था आहे. सिमेंट, संबंधित बांधकाम सामग्री आणि बांधकाम उद्योग यांसाठी संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि हस्तांतरण, शिक्षण आणि औद्योगिक सेवांसाठी एनसीसीबीएम समर्पित आहे.
पार्श्वभूमीः
भारत आज जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि पुढील पाच वर्षांपर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे आणि 600 दशलक्ष टनांच्या स्थापित सिमेंट क्षमतेसह भारतातील सिमेंट उद्योग हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग आहे.
भारतातील सिमेंट उद्योग विविध औद्योगिक कचऱ्याचा वापर करून देशातील चक्राकार अर्थव्यवस्थेच्या चौकटीत महत्त्वाची भूमिका बजावतो आणि जगातील सर्वात कमी कार्बन फूटप्रिंटचा ठसा असलेला आणि सर्वाधिक ऊर्जा कार्यक्षम असलेला उद्योग आहे.
Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959346)
Visitor Counter : 153