अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे चांद्रयान-3 मोहिमेला बळ दिले असून, अंतराळ संशोधनासाठी वाढीव निधीची तरतूद - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


पंतप्रधान मोदी यांनी भरीव अर्थसंकल्पीय तरतूद केल्यामुळे अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या 150 वर गेली : डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 20 SEP 2023 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने चांद्रयान-3 मोहिमेला बळ दिले असून, अंतराळ संशोधनासाठी वाढीव निधीची तरतूद झाल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अंतराळ आणि अणु ऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

“त्यांना आवश्यकता असते तेव्हा आम्ही त्यांना निधी उपलब्ध करतो, त्यांना हवे, तसे अनुकूल वातावरण निर्माण करतो, त्यांना आवश्यक असलेले स्वातंत्र्य देतो, त्यांना हवा असणारी  समन्वय साधने  उपलब्ध करून देतो आणि गेल्या नऊ वर्षांच्या काळात आम्ही त्यांना अनेक  बंधनांमधून मुक्त केले आहे.” असे राज्यसभेत आज “चांद्रयान-3 च्या यशस्वी ‘सॉफ्ट लँडिंग’ मुळे भारताचा गौरवशाली अंतराळ क्षेत्रातील प्रवास” या  विषयावरील चर्चेत भाग घेताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी अंतराळ क्षेत्राची अर्थसंकल्पीय तरतूद अनेक पटींनी वाढवली आणि अंतराळ क्षेत्र खुले केले, परिणामी अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या 2014 मध्ये  केवळ 4 होती ती  आता 150 वर गेली आहे.

"आपण केवळ अंतराळ क्षेत्राची अर्थसंकल्पीय तरतूद पहिली, तर गेल्या नऊ वर्षांत यामध्ये 142% वाढ झाली आहे," असे नमूद करून, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभाग यांसारख्या संबंधित क्षेत्रांच्या अर्थसंकल्पीय तरतुदी मध्ये तिप्पट किंवा त्याहून अधिक वाढ करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ष 1990 पासून इस्रोने प्रक्षेपित केलेल्या 424 परदेशी उपग्रहांपैकी 90% म्हणजेच 389 पेक्षा जास्त उपग्रह गेल्या नऊ वर्षांत प्रक्षेपित केले गेले.

“परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून आतापर्यंत आपण 174 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कमावले आहेत; या 174 दशलक्ष  अमेरिकी डॉलर्स पैकी, जवळपास 157 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स हे फक्त गेल्या नऊ वर्षात कमावले गेले. गेल्या 30 वर्षात किंवा त्याहून अधिक वर्षांच्या काळात आतापर्यंत प्रक्षेपित करण्यात आलेल्या युरोपियन उपग्रहांमुळे एकूण 256 दशलक्ष युरो एवढी कमाई झाली आहे. या कमाईपैकी  223 दशलक्ष युरोची कमाई म्हणजेच एकूण कमाईच्या जवळजवळ 90% कमाई ही केवळ गेल्या नऊ वर्षात झालेली आहे, याचाच अर्थ प्रमाण वाढलेले  आहे, कामाचा वेग वाढला आहे आणि त्यामुळेच एवढी मोठी झेप आपण घेऊ शकलो असेही ते म्हणाले.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, स्मार्ट सिटी प्रकल्प, पायाभूत सुविधांचा विकास, रेल्वे रूळ आणि मानवरहित रेल्वे फटकांचे व्यवस्थापन, रस्ते आणि इमारती, टेलिमेडिसिन, प्रशासन आणि 'स्वामित्व' जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीचे नकाशे काढणे यासारख्या जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये भारत स्पेस (अंतराळ-तंत्रज्ञान) ॲप्लिकेशन्सचा वापर करत आहे. डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात भारताची आपत्ती निवारण क्षमता जागतिक दर्जाची बनली आहे आणि आपण शेजारील देशांनाही आपत्तीचा अंदाज देत आहोत.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, आर अँड डी अर्थात संशोधनाने विकास कार्यात खाजगी क्षेत्राला समाविष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन" विधेयक आणले. या माध्यमातून गैर-सरकारी स्त्रोतांकडून बहुसंख्य निधी उभारला जाईल.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, आज जग  भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हे नेतृत्व स्वीकारण्यास सक्षम आहे.

“भारताने घेतलेली उंच भरारी आज जगाने ओळखली आहे.” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

 

* * *

S.Bedekar/Rajshree/Vikas/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1959223) Visitor Counter : 150