उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताच्या अवकाश क्षेत्रातील कामगिरीसाठी कोणतीही मर्यादा नसून ही केवळ सुरुवात आहे: उपराष्ट्रपती जगदीप धनखड


अंतराळ क्षेत्रातील कामगिरीने भारताला जगाच्या केंद्रस्थानी पोहोचवले आहे: उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज राज्यसभेत भारताच्या अवकाश क्षेत्रातील गौरवशाली प्रवासावरील चर्चेला केली सुरुवात

Posted On: 20 SEP 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2023

 

इस्रो (ISRO), अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मिळवलेले यश हे केवळ असामान्य नव्हे, तर त्यापेक्षा अधिक असून, चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात भारताच्या अंतराळ संस्थेचे नाव कोरले गेले आहे, असे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. 

"चांद्रयान-3 च्या यशस्वी ‘सॉफ्ट लँडिंग’मुळे चिन्हांकित झालेला भारताचा गौरवशाली अंतराळ प्रवास" या विषयावरील चर्चेला सुरुवात करताना, उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने परदेशी प्रक्षेपण वाहनांवरील अवलंबित्वापासून ते स्वदेशी प्रक्षेपण क्षमतेसह संपूर्णपणे आत्मनिर्भरता प्राप्त करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. ते पुढे म्हणाले की, भारताने केवळ स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमताच विकसित केली नाही तर इतर देशांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी आपल्या सेवांचा विस्तार करत, आतापर्यंत 424 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरण्या व्यतिरिक्त भारताने केलेल्या कामगिरीची प्रशंसा करताना, उपराष्ट्रपती धनखड यांनी सदनाला आठवण करून दिली की, भारताची मार्स ऑर्बिटर मिशन (मंगळयान), 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात या लाल ग्रहावर यशस्वीपणे पोहोचले होते.

अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीने "देशाला जगाच्या केंद्रस्थानी पोहोचवले आहे" असे अधोरेखित करून, उपराष्ट्रपतींनी भारताचा अंतराळ संशोधन प्रवास ही गोष्ट ‘देशासाठी अभिमानाची’ आहे, अशी प्रशंसा केली. “चांद्रयान मोहिमेपासून चंद्रापर्यंत, मार्स ऑर्बिटर मिशन (मंगळयान) आणि आदित्य-एलएलच्या सौर संशोधना द्वारे, भारताने दाखवून दिले आहे की आपल्या कामगिरीसाठी कोणतीही मर्यादा नसून, ही केवळ सुरुवात आहे,” उपराष्ट्रपती म्हणाले.

उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर जाणून घेण्‍यासाठी येथे क्लिक करावे

 

 

 

 

* * *

NM/S.Bedekar/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959060) Visitor Counter : 120