राष्ट्रपती कार्यालय

भारतीय रेल्वेच्या परिवीक्षाधीन अधिका-यांनी  राष्ट्रपतींची घेतली भेट


रेल्वे, रस्ते, हवाई आणि जल वाहतूक सेवांचा स्‍वतंत्र विचार करण्‍यापेक्षा सर्वसमावेशक दृष्टीकोनातून हाताळली जावी : राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 15 SEP 2023 1:20PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेच्या 213 प्रोबेशनर म्हणजेच परिवीक्षाधीन अधिका-यांच्या समूहाने  (2019, 2020 आणि 2021 तुकडीचे) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज (15 सप्टेंबर, 2023) राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रामध्‍ये  भेट घेतली.

प्रोबेशनर अधिका-यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, कोणत्याही व्यावसायिक संस्थेप्रमाणे भारतीय रेल्वे ही देशाची सामाजिक जीवनरेखा आहे. सामान्य माणसांची अनेक स्वप्नेही रेल्वेशी निगडित असतात. रेल्वेची देशव्यापी कनेक्टिव्हिटीअसल्यामुळे देशाची विविधता यामधून दिसते. भारतीय रेल्वे लोकांना अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव देते. भारतीयांना आणि परदेशी पाहुण्‍यांना वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या सेवांमध्ये आधुनिक सुधारणा करत आहे, हे जाणून आपल्याला आनंद वाटला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, रेल्वेने केलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे. हरित तंत्रज्ञानाचा वापर करून अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणे आणि जागतिक दर्जाच्या सुविधांचा त्यामध्‍ये समावेश करणे, हा एक उत्तम लोककेंद्रित उपक्रम आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला आणि आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन मिळेल. आधुनिक हरित भारतीय रेल्वे आणि विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवा अधिकारी, महत्वपूर्ण भूमिका बजावतील, असा आपल्याला विश्वास आहे.

अधिकाऱ्यांनी काम करताना संपूर्ण वाहतूक परिसंस्थेमध्ये आवश्यक असणारी कौशल्ये आणि त्याविषयीचे विशेष ज्ञान प्राप्त करण्याचा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. त्या म्हणाल्या की, त्यांनी रेल्वेच्या कामाच्या बाबतीत देशातील आणि इतर देशांतील सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा अवलंब आपल्या कामामध्‍ये करावा. राष्‍ट्रपतींनी सांगितले की, देशाला कार्यक्षम मल्टी-मॉडलवाहतूक व्यवस्थेची गरज आहे. रेल्वे, रस्ते, हवाई आणि जलवाहतूक यांचा स्‍वतंत्रपणे विचार न करता, सर्वांगीण दृष्टिकोन समोर ठेवून वाहतूक व्यवस्था हाताळली पाहिजे. आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी इतर विभागांच्या अधिकाऱ्यांशीही समन्वय साधून काम करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण पाहण्‍यासाठी कृपया य‍ेथे क्लिक करावे

***

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1957708) Visitor Counter : 104