कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्किल इंडिया डिजिटल या सर्वसमावेशक डिजिटल मंचाचा केला शुभारंभ
स्किल इंडिया डिजिटल हा सर्व कौशल्य उपक्रमांना एकत्र आणण्यासाठीचा एक अत्याधुनिक मंच आहे: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
स्किल इंडिया डिजिटल सर्वांचा कुठेही, कधीही कौशल्य विकास साधण्यासाठी आपल्याला सक्षम करेल असा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा विश्वास
Posted On:
13 SEP 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2023
प्रत्येक भारतीयाला दर्जेदार कौशल्य विकास, काल सुसंगत संधी आणि उद्योजकतेसाठीचे सहाय्य खात्रीलायकपणे मिळावे, यासाठी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज स्किल इंडिया डिजिटल (SID) या सर्वसमावेशक डिजिटल मंचाचा शुभारंभ केला. भारताच्या कौशल्ये, शिक्षण, रोजगार आणि उद्योजकतेच्या परिप्रेक्षात समन्वय साधणे आणि परिवर्तन घडवणे, हे याचे उद्दिष्ट आहे. हा मंच औद्योगिक क्षेत्राशी संबंधित कौशल्य विकास अभ्यासक्रम, रोजगाराच्या संधी आणि उद्योजकीय पाठबळ देत असल्यामुळे, चांगल्या संधी आणि उज्ज्वल भविष्याचा शोध घेणाऱ्या लाखो भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांना मूर्त रूप देईल. या कार्यक्रमाला कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे देखील उपस्थित होते.
स्किल इंडिया डिजिटल ही भारतातील कौशल्य, शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता परिसंस्थेसाठीची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि उद्योग 4.0 कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून कौशल्य विकास अधिक नवोन्मेषी, सहज उपलब्ध आणि व्यक्तीसापेक्ष बनवण्याच्या दृष्टीने, हा आगळा वेगळा मंच कुशल प्रतिभेची नियुक्ती, आजीवन प्रशिक्षण आणि करियर मध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरेल. हा मंच डिजिटल कौशल्ये आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डिजिटल अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याबाबत G20 च्या पथदर्शक आराखड्यात स्पष्ट केलेल्या दृष्टीकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे. हे सर्व सरकारी कौशल्य आणि उद्योजकता उपक्रमांसाठी सर्वसमावेशक माहिती देणारे, आणि करिअरमध्ये प्रगती आणि आजीवन शिकत राहण्याची इच्छा बाळगणाऱ्या नागरिकांसाठी एक गो-टू हब, म्हणजेच आवडते केंद्र ठरेल.
यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की स्किल इंडिया डिजिटल हा सर्व कौशल्य उपक्रमांना एकत्र आणण्यासाठीचे एक अत्याधुनिक मंच आहे. ते म्हणाले की, जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच कौशल्यांमधील तफावत दूर करण्यासाठी भारताने उपस्थित केलेल्या मुद्द्यावरील एकमत हा भारताच्या यशस्वी G20 अध्यक्षपदाचा केंद्रबिंदू ठरला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने आणखी एक झेप घेत, MSDE ने भारताच्या वैविध्यपूर्ण लोकसंख्येच्या कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक मुक्त-स्रोत मंच निर्माण केला आहे. स्किल इंडिया डिजिटल हे आपल्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा उपयोग करण्याच्या आणि भारताला जागतिक कौशल्य केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे, असेही ते म्हणाले. शिक्षण आणि कौशल्य विकासातील क्रांती द्वारे, स्किल इंडिया डिजिटल सर्वांचा कुठेही, कधीही कौशल्य विकास साधण्यासाठी आपल्याला सक्षम करेल, असेही ते म्हणाले जी-20 शिखर परिषदेच्या यशानंतर अवघ्या काही दिवसांनंतर बोलताना राजीव चंद्रशेखर म्हणाले की, या शिखर परिषदेतील सर्वात महत्त्वपूर्ण करारांपैकी एक करार डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPIs) संदर्भात होता. कौशल्य भारत डिजिटल ही तरुणांसाठी नक्कीच सर्वात महत्त्वाची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) आहे तसेच पंतप्रधानांच्या नवभारताच्या दृष्टीकोनाच्या कौशल्य भारत आणि डिजिटल भारत या दोन महत्त्वाच्या घटकांचा छेदनबिंदू आहे. या अत्यंत सशक्त योजना असून तरुणांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करणे हा या योजनांचा एकमेव उद्देश आहे. यामुळे तरुणांसाठी अनेक संधी निर्माण होण्यास मदत होईल. कोविडनंतरच्या आजच्या जगात डिजिटल कौशल्यांबद्दल प्रचंड जागरूकता निर्माण झाली आहे. नवउद्योजकता आणि भविष्यासाठी तयार असलेले कर्मचारी कौशल्य भारत डिजिटल हा उपक्रम सक्षम करेल, असेही ते म्हणाले.
खालील घटक कौशल्य भारत डिजिटल (SID) मंचाचा विकास करतील आणि असंख्य फायदे मिळवून देतील :
1.आधार/ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चेहऱ्याची ओळख.
2.डिजिटल व्हेरिफायेबल क्रेडेंशियल (DVC).
3.कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) शिफारशी.
4.आधार आधारित ई-केवायसी.
5.डिजिटल शिक्षण.
6.नागरिक-केंद्रित दृष्टीकोन.
7.मोबाइल-प्रथम दृष्टीकोन.
8.प्रमाण आणि गती.
9.सुरक्षा उपाय.
10.आंतर परिचालकता.
11.व्हॉट्सॲप चॅटबॉट.
12.व्यवसाय सुलभीकरण.
देशातील परिवर्तन आणि सक्षमीकरणाला गती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कौशल्य भारत डिजिटल व्यासपीठाच्या निर्मितीमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या तंत्रज्ञांच्या चमूबरोबर कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संवाद साधला. या मंचाचा प्रत्येक विभाग नागरिकांच्या विविध गरजा पूर्ण करतो.
या कार्यक्रमात, डिजिटल कौशल्य, उद्योग सहभाग वाढवण्यासाठी आणि शिकणाऱ्यांच्या सहभागामध्ये वाढ करण्यासाठी एआयसीटीई, सीबीएसई, नाईलइट, इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, एडब्ल्यूएस (ॲमेझॉन) रेड हॅट वाद आणि फाउंडेशन युनिसेफ फ्युचर स्किल प्राईम, सॅप, टेक महिंद्रा फाउंडेशन यांच्यासह अनेक आघाडीच्या संस्थांसोबत अनेक सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली.
व्यक्तिगत शिक्षण आणि सुरक्षित प्रमाणीकरणापासून ते व्यवसाय सुलभीकरण आणि राष्ट्रीय एककेंद्राभिमुखतेपर्यंत, कौशल्य भारत डिजिटल नाविन्यपूर्णतेचा आणि प्रगतीचा दीपस्तंभ आहे. हा उपक्रम भारतीय शिक्षण आणि कौशल्य विकासावर कायमस्वरूपी प्रभाव टाकून आपला प्रवास प्रेरणादायक आणि सशक्त बनवत आहे.
S.Patil/R.Agashe/S.MukhedkarP.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1957183)
Visitor Counter : 168