मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला, 15 सप्टेंबर 2023 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या (PMMSY) 3 ऱ्या वर्धापनदिनानिमित्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या "मत्स्य संपदा जागरुकता अभियान" च्या सहा महिने चालणाऱ्या जनसंपर्क उपक्रमाची करणार सुरूवात
Posted On:
13 SEP 2023 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2023
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला 15 सप्टेंबर 2023 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर मधील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटर येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या (PMMSY) अंमलबजावणीची यशस्वी तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला संबोधित करतील. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री मत्स्यव्यवसाय विभागाच्या "मत्स्य संपदा जागरुकता अभियान" या सहा महिने चालणाऱ्या जनसंपर्क उपक्रमाचाही शुभारंभ करतील. मत्स्य संपदा योजनेची कार्यक्षम अंमलबजावणी करणे आणि संभाव्य भागधारकांपर्यंत पोहोचणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या अभियानांतर्गत, सप्टेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत, देशभरात 108 मत्स्य किसान संमेलने आयोजित केली जाणार आहेत. संभाव्य लाभार्थ्यांना या योजनेबद्दल अधिक जागरूक करणे हा या योजनेचा उद्देश असून अभियानाच्या माध्यमातून 2.8 कोटी मत्स्य शेतकरी आणि समुद्र किनाऱ्यावर असलेल्या 3477 गावांपर्यंत पोहण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाद्वारे मत्स्यपालन क्षेत्राच्या बहुआयामी क्षमतेबद्दल आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) मच्छीमारांना आणि मत्स्यशेतकऱ्यांना कशी मदत करू शकते, याबाबत जनजागृती केली जाणार आहे. यासोबतच, मत्स्यव्यवसाय विभाग आणि त्याच्या क्षेत्रीय संस्थांची नऊ वर्षांची यशस्वी वाटचाल आणि विविध यशोगाथांबद्दल माहिती आणि ज्ञानाचा प्रसार करणे हे देखील या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
उत्पादन आणि उत्पादकता वाढ, पीक काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा आणि मूल्य शृंखला वाढीचे इतर उपाय यासंबंधात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने (PMMSY) अंतर्गत मंजूर केलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन देखील परशोत्तम रुपाला यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या (PMMSY) तिसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणजे मत्स्यव्यवसायावरील प्रदर्शनाचे उद्घाटन होय. या प्रदर्शनात स्टार्टअप्स, महाविद्यालये, विद्यापीठे, मत्स्य शेतकरी उत्पादक संघटना आणि मत्स्य सहकारी संस्थाद्वारे दर्शविलेल्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील नवकल्पना, उपक्रम आणि प्रगती लोकांना पाहायला मिळेल. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या (PMMSY) यशोगाथा उपस्थितांसमोर मांडण्यात येतील. या सत्रात विविध मत्स्य व्यवसायाशी संबंधित लाभार्थी आणि मत्स्यपालकांना आपली यशोगाथा कथन करण्याची संधी मिळेल. हा कार्यक्रम, प्रत्यक्ष उपस्थिती आणि दूरदृश्य प्रणालीमार्फत उपस्थिती अशा मिश्र स्वरूपात आयोजित केला जात असून देशभरातील 20,000 हून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. मच्छीमार, मत्स्य शेतकरी, मत्स्य उद्योजक, इतर भागधारक, सरकारी अधिकारी तसेच मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील उत्साही सहभागी यांना एकत्र आणणारा हा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरणार आहे. भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसह (PMMSY) इतर विविध योजनांचे यश प्रदर्शित करणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे गेल्या नऊ वर्षातील योगदान आणि कामगिरी यावरही या कार्यक्रमात प्रकाश टाकला जाईल.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1957073)
Visitor Counter : 135