रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
लडाखमध्ये राष्ट्रीय महामार्ग 301 च्या 230 किलोमीटर लांबीच्या कारगिल-झंस्कार रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरण सुरू - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Posted On:
12 SEP 2023 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2023
लडाखमध्ये राष्ट्रीय महामार्ग 301 चा एक महत्त्वाचा भाग असलेल्या 230 किलोमीटर लांबीच्या कारगिल- झंस्कार रस्त्याचे नूतनीकरण आणि रुंदीकरण सुरू करण्यात आल्याचे केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
एका ट्विटच्या मालिकेत त्यांनी सांगितले की, 8 पॅकेजेसमध्ये विभागलेला हा विस्तृत प्रकल्प पॅकेज 5 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे तर पॅकेज 6 आणि पॅकेज 7 या आर्थिक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. या 3 पॅकेजेसमध्ये तब्बल 97.726 किमीचा समावेश असून त्यात 13 मोठे पूल, 18 छोटे पूल आणि 620 बॉक्स कल्व्हर्टचा समावेश आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
एका बाजूला खोल दरी आणि दुस-या बाजूला उंच टेकडी असलेला हा भूभाग अतिशय आव्हाने निर्माण करत आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रदेशातील अतिशय विपरित पर्यावरण, विरळ वनस्पती आणि ऑक्सिजनची कमी पातळी, तसेच अत्यंत थंड हवामान, यामुळे अडचणींमध्ये वाढ होते. निम्म्याहून अधिक भागामध्ये वस्ती आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही.
हा पट्टा पूर्ण झाल्यावर, सर्व हवामानासाठी अनुकूल असलेला हा रस्ता सैन्य तुकड्या आणि अवजड तोफांच्या वाहतुकीसाठी सोयीचा झाल्याने अतिशय महत्त्वाची पायाभूत सुविधा म्हणून काम करेल, असे गडकरी म्हणाले. त्याच्या सामरिक महत्त्वाव्यतिरिक्त या प्रकल्पामुळे या प्रदेशातील आर्थिक विकास आणि पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून सीमावर्ती प्रदेशात कार्यक्षम, समस्याविरहित आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून सजग वाहतूक व्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्याची वचनबद्धता प्रदर्शित होत आहे, असे गडकरी यांनी नमूद केले.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956773)
Visitor Counter : 155