रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी विविध राज्यांतल्या 1.60 लाख प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये जमलेल्या तीन हजारहून अधिक शेतकऱ्यांशी आभासी पद्धतीने साधला संवाद

Posted On: 12 SEP 2023 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 सप्‍टेंबर 2023

 

केंद्रीय रसायने आणि खते विभागाचे मंत्री डॉ.मनसुख मांडवीय म्हणाले, “देशात सध्या 1.60 लाख प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे (पीएमकेएसके) कार्यरत आहेत. 2 लाखांहून अधिक केंद्रांचे ‘वन स्टॉप शॉप’ नेटवर्क निर्माण करणे हे पीएमकेएसके संकल्पनेचे उद्दिष्ट आहे.  देशातील शेतकऱ्यांना शेतीविषयक तसेच कृषी पद्धतींविषयी असलेले ज्ञान वाढवण्यासाठी, गुणवत्तेची खात्री असलेली उत्पादन सहजपणे उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.”

विविध राज्यातल्या 1.60 लाख  पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये (पीएमकेएसके) जमलेल्या तीन हजारहून अधिक शेतकऱ्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यक्रमात आंध्रप्रदेश, बिहार,गुजरात,मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. केंद्रीय रसायने आणि खते विभागाचे राज्यमंत्री भगवंत खुबा देखील या आभासी चर्चात्मक कार्यक्रमात उपस्थित होते.

लवकरच पीएमकेएसकेएसना कृषी क्षेत्रातील प्रसारात्मक उपक्रमांसाठी मध्यवर्ती केंद्राचे स्वरूप दिले जाणार असून तेथे कृषी क्षेत्रातील नव्या आणि विकसित होत असलेल्या ज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे, शेतकरी समुदायासोबत संवाद साधणे तसेच कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून इतर विस्तारात्मक उपक्रमांचा प्रसार करणे इत्यादी कार्ये केली जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय यांनी दिली. ते म्हणाले, “हे केंद्र म्हणजे केवळ खते आणि अवजारे इत्यादींचे दुकान नसेल तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारी संघटना असेल.” पीएमकेएसके हे सर्व कृषीविषयक तसेच शेतीशी संबंधित कार्यांसाठीचे एक-थांबा केंद्र नसेल तर ती एक संपूर्ण संस्था असेल असे त्यांनी सांगितले.

उपस्थित शेतकऱ्यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी यांच्या वापराला सुरुवात करावी यासाठी  केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या ऐवजी हळूहळू पर्यायी तसेच सेंद्रिय खतांच्या वापराकडे वळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. “येत्या रबी हंगामात आपण रासायनिक खतांचा वापर 20%नी कमी करण्याचा प्रयत्न करूया आणि त्या ऐवजी पर्यायी/सेंद्रिय खतांचा वापर सुरु करूया,” ते म्हणाले.

शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी राखीव ठेवलेल्या युरिया आणि इतर खतांचा साठा बिगर-शेती वापरासाठी उद्योगांकडे वळवण्यासंदर्भात देखील त्यांनी शेतकऱ्यांना सावध केले. केंद्रीय मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री  किसान समृद्धी केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांचा वापर करताना आलेले अनुभव सामायिक केले.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1956707) Visitor Counter : 115