संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कार्य मंत्रालयाकडून केंद्रीय विद्यालयांसाठी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2022-23 च्या पारितोषिक वितरण समारंभाचे उद्या आयोजन
Posted On:
31 AUG 2023 10:52AM by PIB Mumbai
संसदीय कार्य मंत्रालयाने उद्या 1 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील संसद भवन संकुल येथे केंद्रीय विद्यालयांसाठी 33 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2022-23 च्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले आहे.
संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून त्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान केली जातील. केंद्रीय विद्यालयांसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2022 -23 मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम आलेल्या केंद्रीय विद्यालय क्रमांक 1, छिंदवाडा, मध्य प्रदेशचे विद्यार्थी त्यांच्या "युवा संसद" बैठकीचे पुन्हा सादरीकरण करणार आहेत.
संसदीय कामकाज मंत्रालय अनेक वर्षांपासून केंद्रीय विद्यालयांसाठी युवा संसद स्पर्धा आयोजित करत आहे. केंद्रीय विद्यालयांसाठी युवा संसद स्पर्धेच्या योजनेअंतर्गत, केंद्रीय विद्यालय संघटनेच्या 25 क्षेत्रांमध्ये विस्तारलेल्या 150 केंद्रीय विद्यालयांमध्ये, 2022-23 मध्ये ही 33 वी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, विविध मतप्रवाहांबाबत सहिष्णुता, विचारांची योग्य अभिव्यक्ती आणि लोकशाही जीवनपद्धतीची इतर मूल्ये विकसित करणे हा आहे. याशिवाय, ही योजना विद्यार्थ्यांना संसदीय प्रथा आणि कार्यपद्धती, चर्चा आणि वादविवादाचे तंत्र अवगत करून देते आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्वाची गुणवत्ता आणि प्रभावी वक्तृत्वकला आणि कौशल्य विकसित करते.
33व्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल “नेहरू रनिंग शिल्ड (फिरती ढाल)” आणि चषक केंद्रीय विद्यालय क्रमांक 1, छिंदवाडा, मध्य प्रदेश (जबलपूर क्षेत्र, दक्षिण विभाग) यांना देण्यात येईल. याशिवाय, स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम आलेल्या चार विद्यालयांना विभागीय विजेते चषक देखील प्रदान केले जातील. तसेच, स्पर्धेत प्रादेशिक स्तरावर प्रथम आलेल्या 20 विद्यालयांना प्रादेशिक विजेते चषक प्रदान करण्यात येतील.
***
S.Thakur/S.Kakde/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953658)
Visitor Counter : 171