कोळसा मंत्रालय

कोळसा मंत्रालयाच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे पोलाद उत्पादनासाठी देशांतर्गत कोकिंग कोळशाची उपलब्धता वाढली, आयातीत घट


कोकिंग कोळशाचे उत्पादन 2030 पर्यंत 140 मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा

Posted On: 29 AUG 2023 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2023

 

देशांतर्गत कोकिंग कोळशाची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पोलाद मंत्रालय आणि कोळसा मंत्रालय यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.देशांतर्गत कच्च्या कोकिंग कोळशाचे उत्पादन 2030 पर्यंत 140 मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, कोळसा धुतल्यानंतर सुमारे 48 मेट्रिक टन वापरण्यायोग्य कोकिंग कोळसा मिळेल.पोलाद उत्पादनासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोकिंग कोळश्याची उपलब्धता वाढली असून देशातील पोलाद उत्पादनावर आधारित  औद्योगिक विकासाची गती राखण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे.

राष्ट्रीय पोलाद धोरण 2017 मधील अंदाजानुसार, कोकिंग कोळशाची वाढती देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने आर्थिक वर्ष 22 मध्ये "कोकिंग कोळसा अभियान" सुरु केले. "आत्मनिर्भर भारत" उपक्रमांतर्गत परिवर्तनात्मक उपायांद्वारे कोकिंग कोळशाची आयात लक्षणीयरीत्या कमी करण्याची संकल्पना या अभियानामध्ये मांडण्यात आली आहे. या उपायांमध्ये उत्खनन, उत्पादनात वाढ, तंत्रज्ञानाचा अवलंब, कोकिंग कोळसा खाणींमध्ये  खाजगी क्षेत्राचा सहभाग, नवीन वॉशरीजची स्थापना, संशोधन आणि विकास   उपक्रमांमध्ये वाढ आणि गुणवत्ता वाढ यांचा समावेश आहे.

पोलाद क्षेत्रासाठी स्वदेशी कोकिंग कोळशाचा पुरवठा बळकट करण्यासाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, अनेक धोरणात्मक उपायोजना  करण्यात आल्या आहेत.

कोकिंग कोळसा खाणींचा  लिलाव :  कोळसा मंत्रालयाने 16 कोकिंग कोळसा खाणपट्ट्यांचे  वाटप करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्यापैकी, 2022-23 मध्ये 4 खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यात आला यामध्ये जेएसडब्ल्यूने दोन खाणपट्टे  मिळवले. या प्रयत्नामुळे कोकिंग कोळसा उत्पादनात भरीव 1.54 मेट्रिक टन योगदानाचा अंदाज आहे.

वापरात नसलेल्या खाणींचे पुनरुज्जीवन करणे : भारत कोकिंग कोल लिमिटेडने (बीसीसीएल) वापरात नसलेल्या किंवा बीसीसीएलच्या मालकीच्या बंद केलेल्या खाणींमधून कोकिंग कोळसा काढण्यासाठी एजन्सी आणि कंपन्यांना आमंत्रित करून नवीन मार्ग खुले केले आहेत. महसूल वाटणी मॉडेलच्या माध्यमातून, या उपक्रमामुळे बंद पडलेल्या 8 निश्चित केलेल्या खाणींचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, 4 खाणींसाठी हमीपत्र (एलओए) आधीच जारी करण्यात आले आहे तर इतर चार खाणी निविदा प्रक्रियेच्या विविध टप्प्यात आहेत.

भारतीय पोलाद प्राधिकरणासह (सेल) धोरणात्मक सहकार्य : कोकिंग कोळशाची उपलब्धता वाढवण्यासाठी भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) आणि बीसीसीएल यांनी 1.8 मेट्रीक टन  धुतलेल्या कोकिंग कोळशाच्या  पुरवठ्यासाठी सामंजस्य करार केला आहे. बीसीसीएल बांधत  असलेल्या 4 नवीन कोकिंग कोळसा वॉशरीज सुरू केल्यानंतर, धुतलेल्या कोकिंग कोळशाचा  पुरवठा आणखी वाढेल.

कच्च्या कोकिंग कोळशाचा लिलाव : बीसीसीएलआणि सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड (सीसीएल) यांनी जून 2023 मध्ये लिलाव आयोजित केले आहेत.

अभिनव ग्रीनफील्ड वॉशरीज : कोकिंग कोळशाची उपलब्धता वाढवण्यासाठी कोळसा मंत्रालय ग्रीनफिल्ड वॉशरीजची स्थापना किंवा विद्यमान बीसीसीएल वॉशरीजचे नूतनीकरण करण्यास प्रोत्साहित करते.

कोकिंग कोळसा भारतातील औद्योगिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतो त्यामुळे हे धोरणात्मक उपक्रम देशांतर्गत कोकिंग कोळसा उत्पादन बळकट करण्याच्या समर्पणावर भर देतात आणि आत्मनिर्भरतेच्या  व्यापक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देतात.

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1953199) Visitor Counter : 117