श्रम आणि रोजगार मंत्रालय
राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) पोर्टलवर नोकरीसाठी उपलब्ध रिक्त पदांमध्ये ऑगस्ट 2023 मध्ये मोठी वाढ
एनसीएस पोर्टलवर 28 ऑगस्ट 2023 रोजी दहा लाखांहून अधिक रिक्त पदांची नोंद
Posted On:
28 AUG 2023 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2023
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) पोर्टलवर 28 ऑगस्ट 2023 रोजी नोकरीसाठी दहा लाखाहून अधिक उपलब्ध रिक्त पदांची नोंद करण्यात आली आहे. या रिक्त जागा एनसीएस पोर्टलवर सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील विविध नियोक्त्यांद्वारे नोंदवण्यात आल्या असून अद्याप भरतीसाठी या जागा खुल्या आहेत. एनसीएस पोर्टलवरील रिक्त जागा नियोक्त्यांद्वारे पोर्टलवर थेट संपर्कांद्वारे आणि विविध खाजगी नोकरी -पोर्टलसह एपीआय एकत्रीकरणाद्वारे एकत्रित केल्या जातात
दहा लाखाहून अधिक उपलब्ध रिक्त पदांपैकी, सुमारे एक तृतीयांश रिक्त पदे नव्या उमेदवारांच्या निवडीसाठी अधिसूचित आहेत,यामुळे अनेक तरुण उमेदवारांना त्यांच्या शिक्षणानंतर रोजगाराची संधी मिळू शकेल.एनसीएसवर नोंदणीकृत रिक्त पदांची लक्षणीय संख्या तांत्रिक सहाय्य अधिकारी, विक्री अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लॉजिस्टिक अधिकारी , सॉफ्टवेअर अभियंता, देखभाल अभियंता इत्यादींच्या नोकरीच्या पदांशी संबंधित आहे.
एनसीएस पोर्टलवर नोंदणीकृत रिक्त पदे विविध क्षेत्रांमधील असून देशभरातील रोजगाराच्या संधींना चालना देणारी आहेत. नोकरीसाठी उपलब्ध रिक्त पदांपैकी 51% वित्त आणि विमा तसेच 13% वाहतूक आणि साठवण क्षेत्रात नोंदवण्यात आली आहेत. एकूण रिक्त पदांमध्ये, परिचालन आणि सहाय्य, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण, उत्पादन इत्यादी इतर क्षेत्रांचे योगदान सुमारे 12% आहे आणि या क्षेत्रांनी जून-ऑगस्ट, 2023 दरम्यान रिक्त पदांमध्ये वाढ नोंदवली आहे. सणासुदीच्या काळात अपेक्षित मागणीसह एनसीएस पोर्टलमधील नोकरीसाठी उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येत वाढ होऊन ती नवीन उच्चांकावर जाऊ शकते.
नोकरीसाठी उपलब्ध एकूण रिक्त पदांपैकी, 38% रिक्त पदे अखिल भारतीय आधारावर उमेदवारांच्या निवडीसाठी तर 18% रिक्त पदे अनेक राज्यांमध्ये आवश्यकतेनुसार नियुक्त करण्यासाठी आहेत. उर्वरित रिक्त पदे राज्य विशिष्ट गरजांसाठी आहेत.
एनसीएस पोर्टलने 1.5 दशलक्षहून अधिक नियोक्ते नोंदणी करण्याचा आणखी एक टप्पा गाठला आहे.बहुसंख्य (68%) नियोक्ते सेवा उपक्रमातील आहेत, त्याखालोखाल उत्पादन क्षेत्रातील (26%) आहेत.
नोकरी शोधणाऱ्यांना आणि नियोक्त्यांना आवश्यक कौशल्य संचासह योग्य उमेदवार शोधण्यासाठी सेवा देण्याच्या अनुषंगाने, नोकरीचा शोध आणि अनुरूप नोकरी, करिअर समुपदेशन, व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती इत्यादी विविध करिअरशी संबंधित सेवा प्रदान करण्याचा एनसीएसचा प्रयत्न आहे.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1953036)
Visitor Counter : 158