संरक्षण मंत्रालय
इयत्ता सातवीच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमात यावर्षीपासून ‘अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स' हा राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील एक धडा समाविष्ट
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2023 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2023
यावर्षीपासून इयत्ता सातवीच्या एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात ‘अ होमेज टू अवर ब्रेव्ह सोल्जर्स' हा राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे हाती घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश शालेय मुलांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि त्याग ही मूल्ये रुजवणे आणि राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग वाढवणे हा आहे.
अभ्यासाच्या या धड्यामध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा (एनडब्ल्यूएम) इतिहास, महत्त्व आणि संकल्पना यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच सशस्त्र दलातील शूरवीरांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या सेवेत दिलेल्या सर्वोच्च बलिदानाविषयी माहिती देण्यात आली आहे. या धड्यामध्ये, दोन मित्र एकमेकांना पत्र लिहून- त्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करतात आणि शूरवीरांनी दिलेल्या बलिदानामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल त्यांच्या मनात असलेल्या कृतज्ञतेच्या भावना सामायिक करतात. देशाच्या या प्रतिष्ठित वास्तूला भेट देताना मुलांच्या हृदयावर कोरला जाणारा अमिट ठसा आणि मनावर अगदी खोलवर होणारा भावनिक प्रभाव एनसीईआरटीच्या लेखकांनी कल्पकतेने शब्दातून मांडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय युद्ध स्मारक राष्ट्राला समर्पित केले. लोकांमध्ये त्याग आणि राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1953030)
आगंतुक पटल : 197