सांस्कृतिक मंत्रालय
काशी हे शहर ज्ञान, कर्तव्य आणि सत्य यांचा खजिना म्हणून ओळखले जात असून ही खऱ्या अर्थाने भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी : पंतप्रधान
आम्हा भारतीयांना आपल्या अजरामर आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे, आपला अमूर्त सांस्कृतिक वारसा आपल्यासाठी अत्यंत मौल्यवान: पंतप्रधान
जी 20 सांस्कृतिक मंत्रिस्तरीय बैठक आज वाराणसी इथे संपन्न
वाराणसी इथे झालेल्या जी 20 सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले संबोधित
Posted On:
26 AUG 2023 5:46PM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे वाराणसी शहरात स्वागत केले. हे शहर काशी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या शहरात ही बैठक होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. काशी हे शहर जगात अस्तित्वात असलेल्या सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे असे सांगत, पंतप्रधानांनी जवळच असलेल्या सारनाथ शहराचा उल्लेख केला, जिथे भगवान बुद्ध यांनी आपले पहिले प्रवचन दिले. “काशी हे शहर ज्ञान, कर्तव्य आणि सत्य यांचा खजिना, म्हणून ओळखले जाते आणि ही खऱ्या अर्थाने भारताची आध्यात्मिक राजधानी आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आणि पाहुण्यांना गंगा आरतीचा लाभ घेण्याचे, सारनाथला भेट देण्याचे आणि काशीच्या खास पदार्थांचा आनंद घेण्याचे आवाहन केले.
संस्कृतीमध्ये, लोकांना एकत्र आणणे आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी तसेच दृष्टिकोन समजून घेण्यास प्रोत्साहित करण्याच्या अंगभूत गुणांना पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, जी 20 सांस्कृतिक मंत्र्यांचे कार्य संपूर्ण मानवतेसाठी अतिशय महत्वाचे आहे. “आम्हा भारतीयांना आपल्या अजरामर आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान आहे. आमचा अमूर्त सांस्कृतिक वारसा आमच्यासाठी अमूल्य आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. भारत आपल्या सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी काम करत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. देशातली सांस्कृतिक संपत्ती आणि कलाकार यांची राष्ट्रीय स्तरावर तसेच खेड्यांच्या स्तरावर माहिती तयार करण्याचे काम सुरू आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. भारताच्या संस्कृतीचा उत्सव करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी विशेष केंद्रे उभारण्याविषयी त्यांनी माहिती दिली आणि देशाच्या विविध भागांत असलेली आदिवासी संग्रहालये हे याचेच उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले. या संग्रहालयांत भारताच्या आदिवासी समुदायातील चैतन्यमयी संस्कृतीचे दर्शन घडते. दिल्लीत असलेल्या पंतप्रधान संग्रहालयाच्या संदर्भाने मोदी म्हणाले की अशा प्रकारचा हा एकमेव प्रयत्न आहे, जिथे भारताच्या लोकशाही वारशाचे दर्शन घडते. ‘युगे युगीन भारत’ राष्ट्रीय संग्रहालय विकसित करण्याच्या निर्णयाचा देखील त्यांनी उल्लेख केला. पूर्ण झाल्यावर, भारताचा इतिहास आणि संस्कृतीच्या 5000 वर्षांच्या इतिहासाचे हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय असेल.
मंत्रिस्तरीय बैठकीच्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सर्व जी - 20 देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांचे, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या चैतन्यमय आणि भारताच्या समृध्द सांस्कृतिक वारशाचे जिवंत उदाहरण असलेल्या या शहरात त्यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत वाराणसी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी संगितले.
गंगा नदीच्या किनारी असलेल्या या शाश्वत शहरात, वाराणसीमध्ये संस्कृती, कला आणि परंपरा अशा सर्वांचा अनोखा मिलाफ असून सांस्कृतिक क्षेत्रासाठीच्या जी - 20 बैठकीसाठी अशी पार्श्वभूमी असलेले शहर निवडणे अत्यंत समर्पक आहे, असे त्यांनी सांगितले.
जी के रेड्डी म्हणाले की सांस्कृतिक वारसा हा भूतकाळाचा आधारस्तंभ आणि भविष्याची पाऊलवाट आहे.
मंत्री म्हणाले की जी 20 च्या संस्कृती कार्यगटाच्या अंतर्गत चर्चेचा प्रवास सर्वसमावेशक आणि सहयोगी आहे. ते म्हणाले की याअंतर्गत संस्कृतीला जागतिक धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून कृती-केंद्रित परिणामांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आम्ही चार प्राधान्यक्रम निवडून आणि विचारमंथन करण्यापासून प्रगती केली आहे.
जी 20 सदस्य देशांचे अमूल्य योगदान, दूरदृष्टी, टिप्पण्या आणि अभिप्राय यामुळे आमचा सामायिक संवाद खूप समृद्ध झाला आहे, असेही ते म्हणाले.
जी. के. रेड्डी यांनी असेही नमूद केले की भारताच्या अध्यक्षीय कार्यकाळात आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही केवळ शब्द नव्हे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या सामूहिक दृष्टीकोनाचा मतितार्थ सार्थ करण्याचा प्रयत्न केला आहे.
बैठकीत आपल्या समारोपाच्या भाषणात मंत्री म्हणाले की संस्कृती कार्यगटाच्या चार बैठकांमध्ये आठ महिन्यांच्या कालावधीत, आम्ही एक सबळ निष्कर्ष दस्तावेज तयार करू शकलो, जे रोम आणि बाली जाहीरनाम्याच्या वारशाचे पुढचे पाऊल ठरते.
त्यांनी असेही सांगितले की या बैठकीतील आमच्या प्रयत्नांमुळे आम्हाला एका अनोख्या वळणावर आणले आहे, जिथे जवळजवळ सर्व मुद्द्यांवर एकमत झाले. आपण ज्या मजकुराचा अवलंब करणार आहोत त्याची महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टी आणि उद्देश याचा आपल्याला अभिमान असायला हवा. संस्कृती सर्वांना एकत्र करते याची ती साक्ष आहे. याच भावनेतून या यशाला काशी संस्कृती मार्ग असे नाव द्यावे असे मी तुम्हाला सांगू इच्छितो, असे ते म्हणाले.
जी. के. रेड्डी पुढे म्हणाले की सांस्कृतिक मालमत्तेची प्राप्ती आणि त्याची परतफेड ही सामाजिक न्यायाची अत्यावश्यक बाब आहे आणि त्या उद्देशाने शाश्वत संवादासाठी परिस्थिती सक्षम करण्याचा मार्ग निवडण्यात आम्ही जी 20 सदस्य म्हणून वचनबद्ध आहोत.
"आम्ही मंजूर केलेला निष्कर्ष दस्तावेज, अध्यक्षीय सारांश आणि संस्कृती कार्य गटाच्या संदर्भाच्या अटी मला प्रतीकात्मकपणे स्वीकारू द्या," असे सांगून त्यांनी संवादाचा समारोप केला.
भारताच्या जी 20 अध्यक्षीय कार्यकाळाअंतर्गत जी 20 संस्कृती कार्य गटाने (CWG) 'जी 20 कल्चर: शेपिंग द ग्लोबल नॅरेटिव्ह फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ' नावाचा एक अग्रगण्य अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भारतीय अध्यक्षीय कार्यकाळात व्यक्त केलेल्या प्राधान्य क्षेत्रावरील जागतिक संकल्पनात्मक वेबिनारमधून घेतलेले मर्मज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा समावेश आहे. अहवालात अंतर्भूत असलेले मर्मज्ञान आमची सामूहिक समज अधिक दृढ करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रतिबद्धतेचे महत्त्व अधोरेखित करते.
विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि विषयातील विक्रमी 159 तज्ञांचा जोमदार आणि वैविध्यपूर्ण सहभाग हे या वेबिनारचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. या व्यापक सहकार्याने केवळ चर्चाच समृद्ध केली नाही तर जागतिक धोरण निर्मितीमध्ये संस्कृतीच्या भूमिकेचे सर्वांगीण आणि बहुआयामी अन्वेषणही केले. जी 20 सदस्य, अतिथी राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि इतर हितधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तज्ञांची सामूहिक सुजाणता ही चर्चा केलेल्या विषयांची सार्वत्रिकता अधोरेखित करते आणि अहवालाची विश्वासार्हता आणि सखोलता वाढवते.
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या संस्कृती कार्यगटा अंतर्गत ‘संस्कृती सर्वाना जोडते’ या उत्कृष्ट मोहिमेचा प्रवास दर्शवणारे एक विशेष टपाल तिकीटही जारी करण्यात आले.
***
M.Pange/R.Aghor/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952563)
Visitor Counter : 182