वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत 54 व्या नेटवर्क नियोजन गट बैठकीत चार पायाभूत सुविधा प्रकल्पांची शिफारस


सुमारे 7600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे दोन रस्ते प्रकल्प आणि दोन रेल्वे प्रकल्प यांचे मूल्यमापन

Posted On: 24 AUG 2023 11:09AM by PIB Mumbai

नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी) 54 वी बैठक उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) दळणवळण खात्याच्या विशेष सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली येथे झाली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालय यांचे सदस्य विभाग तसेच मंत्रालये यांचा या बैठकीत सक्रिय सहभाग दिसून आला. एकूण 7, 693.17 कोटी रुपयांच्या चार प्रकल्पांचे बैठकीत मूल्यमापन करण्यात आले. यात, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या दोन आणि रेल्वे मंत्रालयाच्या दोन प्रकल्पांचा समावेश होता.

गतीशक्ती राष्ट्रीय बृहत पोर्टलचा वापर करणे आणि पायाभूत सुविधांचे नियोजन तसेच अंमलबजावणीसाठी 'संपूर्ण सरकार' हा दृष्टिकोन स्वीकारण्याच्या महत्त्वावर डावरा यांनी भर दिला. या क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक संपर्काच्या दृष्टीने प्रकल्पांच्या महत्त्वावर भर देत, क्षेत्र विकास दृष्टीकोनाचा अंगीकार करण्यावर त्यांनी जोर दिला.

भारतमाला प्रकल्पा अंतर्गत, केरळमध्ये 4,767.20 कोटी रुपयांच्या चार-पदरी तिरुवनंतपुरम बाह्य वळण मार्गाची (ओआरआर) नेटवर्क नियोजन गटाने पडताळणी केली. हा प्रकल्प कॉरिडॉर, मुंबई-कन्याकुमारी आर्थिक कॉरिडॉरचा एक भाग आहे. हा प्रकल्प उत्तरेपासून पूर्वेकडील प्रदेशाला सुरळीत आणि जलद संपर्क व्यवस्था प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशांमध्ये तो आर्थिक विकासाला चालना देईल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, वाहनासंबंधित खर्च वाचेल आणि विझिंजममधील नवीन आंतरराष्ट्रीय सागरी बंदरासाठी शेवटच्या टोकापर्यंत संपर्क व्यवस्था मिळेल.

दाहोद-बोडेली-वापी कॉरिडॉर या 1,179.33 कोटी रुपयांच्या आणखी एका रस्ते प्रकल्पाचे मूल्यमापन एनपीजीने केले. नवीन वडोदरा-दिल्ली द्रुतगती मार्गाच्या जंक्शनपासून हा प्रकल्प रस्ता सुरू होतो आणि मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गावर संपतो.  बोडेली, देवलिया, राजपिपला, नेत्रंग, व्यारा, धरमपूर, वापी आणि पुढे दक्षिणेकडे मुंबई ते वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गाने यामुळे महत्त्वाची संपर्क व्यवस्था तयार होते. या प्रकल्पामुळे रस्त्यांचे जाळे सुधारेल, प्रवासाचा वेळ, प्रवासाचे अंतर तसेच वाहतूक खर्च कमी होऊन स्थानिकांना फायदा होईल. प्रकल्प मार्गामुळे सामाजिक-आर्थिक विकास आणि पर्यटनालाही चालना मिळेल.

राजस्थानमधील पुष्कर-मेर्टा दरम्यान 799.64 कोटी रुपयांच्या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गावरील प्रकल्पावरही एनपीजीने चर्चा केली. प्रस्तावित नवीन मार्गामुळे मध्य भारत ते उत्तर भारत तसेच पश्चिम सीमेपर्यंत थेट संपर्क व्यवस्था प्रदान केली जाईल. यामुळे गर्दी कमी होईल तसेच महामार्गावरील ताणही कमी होईल.

राजस्थानमधील आणखी एक रेल्वे प्रकल्प, मेर्टा सिटी-रास रेल्वे स्थानकांदरम्यान 947 कोटी रुपयांच्या नवीन ब्रॉड-गेज मार्गाचेही एनपीजीने मूल्यमापन केले. राजस्थानातील पाली आणि नागौर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या प्रदेशात जलद मालवाहतूक सुलभ करणे, औद्योगिक तसेच सर्वांगीण विकासाला चालना देणे यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे.

******

Sonal T/Vinayak g/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1951642) Visitor Counter : 134